Subscribe Us

चेंजिंग कल्चरल हेरिटेज ऑफ गोर बंजारा


 चेंजिंग कल्चरल हेरिटेज ऑफ गोर बंजारा


अकोला जिल्ह्यातील पातूर ते आलेगाव रोडवर जामरून हे छोटेसे खेडे आहे. रस्त्याच्या कडेला पारधी समाजाची लहानशी वस्ती आहे. या मार्गावरून प्रवास करतांना ओळखीचा एक म्हातारा पारधी गृहस्थ दिसला व मी माझी गाडी थांबवून त्याच्याशी गप्पागोष्टी करु लागलो तेव्हड्यात एक २२ सेक वर्षाची मुलगी लगबगीने माझ्याकडे येवुन तिने माझे चरणस्पर्श करुन दर्शन घेतले.माझ्याच कॉलेज मध्ये ती शिकलेली असल्याने माझ्याप्रती तिने आदरभाव व्यक्त केल्यामुळे मलाही आनंद झाला.सलवार कमीज घातलेली पारधी समाजाची मुलगी बी एस्सी कृषी विषयात नुकतीच पदवीधर झाली होती.या घटनेने मला आठवला तो काळ!६०-६५ वर्षापूर्वी डोंगराच्या पायथ्याशी, मैदानी प्रदेशात, गावाजवळ पारधी समाज राहत होता. शिकार करुन तर कधी भीक मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे. महिला मणी, डोरले, सुया विकुन कुटुंबाला हातभार लावत असत. कधीकधी भाकरीच्या बदल्यात आपल्या जवळील वस्तु गिऱ्हाकाना देवुन टाकत. हातात काठी, कडेवर तान्हबाळ, डोक्यावर कापडाची मोठी पिशवी असा एकंदरीत डामडौल!

"मणी ss डोरले ss सुया ss दाभनss अशी हाक देत गावभर हिंडणे!

'सखुची माय ओ, भाकर तुकडा दे ओ" अशी आर्जव करून मिळेल ते बाळाला खाऊ घाली व स्वतःही आडोशाला बसुन खाई. त्याच घरी तांब्याभर पाणी पिऊन पुढे निघे. पुरुष मंडळी शिकारीत आणलेले बटेर,तितर, ससा घेवुन गावात येत असत.डोक्याला मळका रुमाल,अंगात कांही नाही, केश वाढलेले, लज्जा रक्षणासाठी दोन्ही मांड्या मधुन कमरेला खोचलेली कापडी पट्टी असा पारधी गावातील गल्ल्या गल्ल्यातुन हिंडे. कुत्र्यांना हकालण्यासाठी हातात जाडजूड काठी राहत असे. शिकारी शिवाय जगण्याचे दुसरे कोणतेही साधन नसलेल्या हा पारधी!याचा जंगलावरचा हक्क कोणी हिरावून घेतला?सदैव कापडी पालाचे बिऱ्हाड घेवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करणारा पारधी समाज शिक्षणापासून दीर्घकाळ कोसोदूर होता. आजही ज्या गतीने तो पुढे यावयास हवा होता तसा बदल जाणवत नाही.सरकारचे धोरण, शिक्षणाच्या सुविधेमुळे हळूहळू अनेक बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. बिऱ्हाडा बरोबर त्यांचे देव सुद्धा भटकंती करत राहिले.पशूंचा बळी देणे व नवस फेडणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा हे देवीदेवताच जाणो!एक मात्र प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे त्यांच्या चालत आलेल्या रूढी परंपरा या समाजाने अजूनही सोडलेल्या नाहीत. त्यांची बोलीभाषा, रुढीपरंपरा, लोकजीवन यांनाच त्यांची संस्कृती समजायचे का?हीच संस्कृती त्यांनी का म्हणून जतन करून ठेवायची!बदल स्वीकारून पुढे जाणे गरजेचे आहे. काळा बरोबर चालण्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत.अर्ध नागडा पारधी आज वस्त्रे परिधान करु लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यात राहणारा माडिया, मेळघाट मधील कोरकु,भिल्ल यांची अवस्था देखील वेगळी नव्हती. आदिम देवीदेवतांची पूजाअर्चा, जादूटोणा यावर विश्वास असलेला हा समाज पण हळूहळू  बदलतो आहे.गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्याच्या सीमेवरील इंद्रावती नदीवरील कधीही न ओलांडलेल्या पुलावरुन माडिया आता आत्मविश्वासाने शहराकडे चालु लागला आहे. भामरागड तालुक्यातील कांदोली येथील माडिया जमातीच्या डॉ कन्न्ना मडावी या तरुणाने माडियाला नागरी प्रवाहात आणण्यासाठी मौलिक कामगिरी केली आहे. आता नागरीकरणाच्या वेगवान बदलांमुळे त्याचे जीवन सुद्धा बदलत आहे. विवाहादी व इतर धार्मिक रीतिरिवाज व परंपरावर हा बदल स्पष्टपणे जाणवायला लागला आहे. परंतु ही बदलाची प्रक्रिया संथपणे होत आहे. एकूणच काळाबरोबर चालण्याचे सर्वच मागास समाजात जाणवते आहे.बंजारा समाज सुद्धा गतीने सर्वच क्षेत्रात बदलतो आहे. पण त्याची मुळ बेसिक स्ट्रक्चर बदलु नये असे मनोमन वाटते.गोरबंजारा समाजामध्ये हिंदुत्व की बौद्ध या बाबत अनेक लोक लिहित आहेत. परंतु ह्या विचाराचे भोवती राजकीय गंध असल्याचे सामान्य माणसाला सुद्धा कळायला लागले आहे.निसर्गाच्या उपासनेशी जोडल्या गेलेल्या नाळेला खंडित होवु देता कामा नये पण या समाजाला मुस्लिम, बौद्ध,ख्रिश्चन वा अन्य धर्माच्या विचारधारेशी जोडण्याचे काम होतांना स्पष्टपणे जाणवत आहे.मोगल सत्ताकाळात अनेक बंजारांना सत्ता शक्तीने मुस्लिम व्हावे लागले.अनेक परिवार ख्रिस्त झालेले आहेत.बंजारा समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे. २१ व्या शतकात चौकट जरी विस्तारली असेल तरी परंपरागत शाश्वत मुल्ये नव्या चौकटीत बसवावे लागतील."गोरपीठ"हा नवा सर्वोत्तम पर्याय आहे.म्हणूनच धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी संतश्रेष्ठ सेवालाल महाराज ते संत रामराव महाराज या संत परंपरेतील संतांनी मोलाचे योगदान दिले आहे. ज्या दिवशी हा समाज धार्मिक स्थित्यंतराचा विचार करेल त्याक्षणी गोर संस्कृतीची मृत्यु पंथाकडे लयाला जात असल्याची वाटचाल प्रारंभ झाली आहे असे ठामपणे समजावे.बाबा लखिशा बंजारा,संत सेवालाल महाराज, वसंतराव नाईक ही बंजारा समाजाची जागतिक सर्वोत्तम प्रतिके आहेत.ती लोकांसमोर अधिक ठळकपणे मांडली जावीत कारण कोणत्याही समाजाची आदर्श प्रतिके नष्ट झाली की, तो समाज सैरभैर व दिशाहीन होतो. त्यामुळे राजकीय हेतुने लिखाण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की,धर्मांतराचे परिणाम पिढ्यानपिढ्या भोगावे लागतात.मोगल काळाचा इतिहास वाचा म्हणजे या विधानाला पुष्टी मिळु शकेल.वर्णव्यवस्था ही श्रम विभागणी आहे. वर्ण म्हणजे रंग!आजही नोकरदार वर्गात वर्ग १,२,३ व ४ असे श्रम विभाजन दिसुन पडते. पुर्वी असलेली खुली द्वार श्रमव्यवस्था हळूहळू ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र अशी बंद द्वार होत गेल्यामुळे तीचे दुष्परिणाम दिसायला लागले.बंदिस्त व्यवस्थेमुळे जातीची उतरंड तयार होवून श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्य-अस्पृश्यतेची दरी निर्माण झाली. नोकरदार वर्गाची खुली श्रम विभागणी असल्याने वर्गांतर होवून कर्तृत्त्वाला न्याय मिळाला आहे.आज कोणतीही व्यक्ती कोणताही व्यवसाय करु शकतो याचे स्वातंत्र्य त्याला आहे. आपल्या पात्रतेनुसार नोकरी सुद्धा त्याला मिळवता येते. वसंतराव नाईक साहेब यांच्यामुळे विमुक्त भटक्या प्रवर्गाला १९६६-६७मध्ये आरक्षण मिळाले हे कोणी नाकारु शकत नाही.नाईक साहेबांच्या राजकीय प्रवासामुळे समाजाला सन्मानाचे स्थान सुद्धा मिळाले आहे. शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणामुळे अनेक पिढ्या प्रगत झाल्या.१९५२ मध्ये महाराष्ट्रात विधान सभेच्या निवडणुका होवून संयुक्त द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली. खरेतर ती त्रिभाषिक राज्याची निर्मिती होती. कारण कर्नाटक राज्यातील कन्नड भाषिक जिल्ह्याचाही त्यामध्ये समावेश होता. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने निवडणुकीत सपाटून मार खाल्ला होता. मराठा समाजातील कांही लोक कर्तबगार यशवंतराव चव्हाण यांना लाखोली वाहत होते.आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्या नेत्याने भारत सरकार मधील अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून देशाचे उप-पंतप्रधान पदही सांभाळले होते.यशवंतराव चव्हाण यांचे वडील कोर्टात बेलीफ होते. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती म्हणून देवराष्ट्रे येथे मामाकडे राहून कांही काळ शिक्षण घेतले. भाऊ व वडील प्लेगने वारले, आई अशिक्षित अशी एकंदरीत कौटुंबिक, राजकीय व सामाजिक परिस्थिती होती पण विदर्भ त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला होता.

विदर्भ व मराठवाड्यात काँग्रेस आमदार बहुसंख्येने निवडून आलेले होते.मात्र पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता.फाजल अली कमिशनच्या वेगळ्या विदर्भाच्या अटीनुसार वसंतराव नाईक यांनी विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात विलीन होण्याचा निर्णय घेवून गुजरातसह यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात मोठी कामगिरी बजावली होती,हे विसरुन कसे चालेल!मराठा नेत्यांच्या प्रभावाखाली जावून विदर्भातील वसंतराव नाईक व मारोतराव कन्नमवार या नेत्यांना विमुक्त भटक्यांसाठी असंवैधानिक आरक्षण देवून मराठयांनी फसवणूक केली असे कसे म्हणता येईल ?

विमुक्त जाती व भटक्या जमातीचे आरक्षण हे फक्त वसंतराव नाईक साहेब यांनी कौशल्य पणाला लावून मिळवून दिले आहे. पुढे अनुसुचित जमातीच्या (एस टी) आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे जोरकस प्रयत्न सुद्धा केले. पुढील ईतिहास आपणा सर्वांना माहीतच आहे. आरक्षणाचे श्रेय मात्र आपण भलतीकडेच वळवतो याचे दुःख वाटते.१९६९-७०मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्रातील दुर्बल घटकांसाठी विस हजार घरे बांधुन देण्याचा निर्णय नाईक साहेबांनी घेतला व त्याची अंमलबजावणी तात्काळ केली. आजही ती घरे कांही गावात दृष्टीस पडतात. मात्र हीच योजना आज विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना म्हणुन राबविण्यात येत आहे.मुक्त वसाहत योजनेला वसंतराव नाईक यांचे नाव देता आले असते तर मनाला अधिक आनंद झाला असता. कारण या योजनेची पाळेमुळे त्यांनीच महाराष्ट्राच्या मातीत रोवली आहेत.हा त्यांचा दूरदृष्टीचा निर्णय होता. बेघरांना घरांची मालकी देण्याचा तो निर्णय होता, हे आपण समजुन घेतले पाहिजे.कालानुरूप सर्वच पातळ्यांवर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक बदल होत राहतात,ते आपण रोखु शकत नाही. राहणीमान, पोशाख पद्धती जागतिक पातळीवर ग्लोबलायझेशनच्या युगात जलद गतीने बदललेल्या गेल्या आहेत.स्थित्यंतरे वेगाने घडत आहेत. ती स्वीकारण्याची आपली मानसिक तयारी असणे गरजेचे वाटते.समाजातील अनिष्ट प्रथांचा त्याग करून नव्या मूल्याधिष्ठित परंपरा निर्माण कराव्या लागतील.संस्कृतीचे नुसते जतन किंवा जोपासनेचा विचार करुन चालणार नाही तर तीचे संवर्धन सुद्धा करावे लागणार आहे. नव्या युगातला "नवा नायक नवा कारभारी"त्याच तोलामोलाचा ज्ञानसंपन्न असेल तो विधिज्ञ,न्यायाधीश,प्रांत वा मामलेदार दर्जाचाही किंबहुना असु शकेल.त्याला तांड्याची सामाजिक, शैक्षणिक व राजकिय दिशा यांचा अचुक वेध घेवून पुढे पावले टाकता आली पाहिजे.अशा वेळेस तांडा हा तांडा न राहता तो  "ग्लोबल तांडा"असेल! हीच तर वसंतराव नाईक साहेबांच्या खडतर प्रवासातील उमटलेली पदचिन्हे प्रकर्षाने दिसुन पडतात.सुधाकरराव नाईक,मनोहरराव नाईक याच मार्गावरचे माईल स्टोन व दीपस्तंभ आहेत.मंत्री संजय राठोड व सभागृहातील युवा विधिमंडळ सदस्य व आरक्षणाचे गाढे अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड,वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अमर राठोड,उद्योगपती किसनराव राठोड यासह अनेक दिग्गज हाच मार्गफलक वाचुन समाजाला पुढे नेण्यासाठी धडपड करत असल्याचे जाणवत आहे तर पत्रकार मनोहर चव्हाण, प्रबोधनकार श्रावण जाधव,विलास राठोड रामावत व "गहुली ते दिल्ली तांडा लदेणी २२ डिसेंबर २०२३" टीम इतिहासाची पुनरावृत्ती करुन स्वाभिमान,सन्मान व बंजारा संघशक्ती जागृतीचा एक नवा अराजकीय इतिहास लिहिण्यास कटिबद्ध झाली आहे.आपणही याच मार्गावरचे प्रवासी होवु या!

प्राचार्य जयसिंग द जाधव

 पातूर जि अकोला

Post a Comment

0 Comments