Subscribe Us

सुधाकरराव नाईक-बियॉन्ड दी कर्टन (चॅलेंज अँड चॅरिटी)


 सुधाकरराव नाईक-बियॉन्ड दी कर्टन               

  (चॅलेंज अँड चॅरिटी)

वसंतराव नाईक प्रदीर्घ काळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले, अनेक धोरणात्मक निर्णय घेवून त्यांनी महाराष्ट्राचा चौफेर विकास घडवून आणला. पण त्याच वेळेस सुप्त विरोध करणारी राजकीय महत्वाकांक्षी मंडळी डोके वर काढत होती.पण नाईकांच्या जनसमर्थन व लोकप्रियतेपुढे त्यांचे कांही चालत नव्हते. अखेर  मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कांही मोजकीच मंडळी नेतृत्व बदलासाठी आटोकाट प्रयत्न करत होती.असंतुष्ट पुढाऱ्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कडे तक्रारी, कागाळ्या करण्याचे सुरूच होते. अखेर फेब्रुवारी १९७५ मध्ये वसंतराव नाईक साहेबांना इंदिरा गांधी यांचे सूचनेवरून मुख्यमंत्री पद सोडावे लागले.पुण्यात नाईक साहेबांचे भाषण सुरू होते, इंदिराजींचा इमर्जन्सी फोन आला"नाईकजी आप सीएम पद से इस्तीफा दे दो"नाईक साहेबांनी तात्काळ माईक वरून लोकांना सांगितले,मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे." इंदिरा गांधींना सुद्धा कर्तबगार नाईकांना असा आदेश देण्याची मानसिकता होत नव्हती म्हणून त्यांनी आंध्रप्रदेशचे राज्यपाल होण्याचा त्यांना प्रस्ताव दिला व तो स्वीकारण्याचा सल्ला दिला. यावर वसंतराव नाईक यांनी  इंदिराजींना दिलेले उत्तर त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन घडविते."मी राजकारणात मागच्या दाराने नव्हे तर समोरचे दार ठोठावून प्रवेश करेल."हे ते उत्तर होते,वाशिम लोकसभेत विजयश्री प्राप्त करुनच त्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये प्रवेश केला. करारी बाणा हे नाईक साहेबांचे तेजाने तळपळणारे आभूषण होते,हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

बीड जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीचे बबनराव ढाकणे सभापती होते. १९७१-७२ चा तो काळ होता. नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्य दुष्काळाने होरपळुन निघत होते. दुष्काळाशी लढण्याची नाईक साहेबांची झुंज सुरू होती. कांही झाले तरी बेहत्तर पण प्रजा जगवली पाहिजे या निर्धाराने ते लढत होते,लढत राहिले. या नैसर्गिक संकटात त्यांनी संधी शोधली व लोकांना रोजगार उपलब्द करुन दिला. मजुरीचे अर्धे दाम व अर्धे धान्य देवून लोकांना जगविले. हीच ती रोजगार हमी योजना!नाईकांनी सुरू केली,अन जगाने स्वीकारली.१५-१५ लाख लोक दर दिवशी रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असत. याच काळात बीड जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात या योजनेतून अनेक कामे सुरू झाली.बबनराव ढाकणे यांचे नेतृत्व उदयास आले. नाईक साहेबांनी त्यांना शक्ती दिली. उपकारांची परतफेड म्हणून बबनराव ढाकणे यांनी लोकसहभागातून जिवंतपणीच वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा पाथर्डी येथे उभा केला.याच सहानुभूतीने बबनराव ढाकणे व मनोहरराव नाईक यांना वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेने अकोल्यातील वसंत व्याख्यान-मालेला निमंत्रित केले होते. ढाकणे साहेबांनी आपल्या व्याख्यानातून नाईक साहेबांच्या अनेक स्मृती जाग्या केल्या होत्या.वसंतरावांना त्यांनी पुतळ्याचे अनावरणासाठी निमंत्रण दिले पण ते येवु शकले नाहीत असेही त्यांनी सांगितले.वसंतरावांना त्यांनी दैवत संबोधले व मानले.

    पुढे१९९१-९२मध्ये सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. वरील दोन्ही घटना त्यांच्या विस्मृतीतून कशा सुटणार होत्या?वसंतराव नाईक साहेबांच्या कुशीतुन घडलेले ते करारीबाण्याचे नेतृत्व होते.माजी केंद्रिय मंत्री मोहन धारिया यांचे ट्रस्टची अनेक कामे वादांच्या विळख्यात असल्याची चर्चा त्या काळी मिडियात रंगत होती पण कारवाईची हिम्मत कोणी दाखविली नाही. तो हातोडा त्या ट्रस्ट वर सुधाकरराव नाईक यांनी चालविल्याचे बोलले जाते.त्यामुळे धडक कारवाई करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक उजळल्याचे लोकांच्या चर्चेतुन जाणवत होते.ट्रस्टची अनेक  कागदोपत्री चालणारी कार्यालये टाळेबंद केल्याचे व कागदोपत्री अनुदान लाटण्याचे मार्ग बंद करुन धडक कारवाई सत्र चालु केल्याचे दृकश्राव्य माध्यमातुन कळत होते. अशा पद्धतीने नेतृत्व बदलाची मोहीम चालविणाऱ्या नेत्यांचा बुरखा फाडुन महाराष्ट्रातील जनतेसमोर नागडा उघडा पाडल्याची खमंग चर्चा गावा-गावातील चावडी-चावडीवर झडत होत्या.अशा प्रकारचे त्याकाळी जनमानसातील हा चर्चेचे  विषय होता. पुढे सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर विलासराव देशमुख यांचे कार्यकाळात मोहन धारिया आमरण उपोषणाला बसले होते. या उपोषणाची टिंगल उडविताना,मिडियासमोर न आणण्याच्या अटीवर पत्रकारांना दिल्ली मुक्कामी त्यांनी सांगितलेला, तो किस्सा असा"हे कसले आमरण उपोषण दररोज सकाळ संध्याकाळ दहा-दहा हजार रुपयांचे इंजेक्शन सरकारला द्यावी लागतात."पण देशोन्नतीच्या जॉबाज पत्रकाराने ही बातमी छापलीच होती.असे अनेकानेक किस्से त्याकाळी लोकचर्चा व प्रेस मीडियातून नावानिशी वाचावयास मिळत असत.सुधाकरराव नाईक यांनी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे वाचण्यात आले नाही.का कुणास ठाऊक त्यांचे मौन ही मुक संमतीच होती ?ते काहीही असो मात्र त्यांनी दहशतवाद व भ्रष्टाचारा विरुद्धचे "चॅलेंज"स्वीकारले होतेच!औरंगाबादच्या सभेत "सावज टप्प्यात आल्याशिवाय गोळी झाडत नाही" असे शरद पवार यांना आव्हान देणारे बाणेदार उत्तर दिले होते.

    बबनराव ढाकणे, वंजारी समाजाचे पुढारी व पाथर्डी पंचायत समितीचे सभापती होते.त्यांनी वसंतराव नाईक यांचा जिवंतपणी पुर्णाकृती पुतळा उभा केला.त्याला वंजारी समाज व परिसरातील लोकांचे समर्थन मिळवावेच लागले. ही पूर्वपीठिका या नेत्यांनी आधीच करुन ठेवली होती. त्याची परतफेड करणे आवश्यक होते म्हणून बबनराव ढाकणे व लोकनेते गोपीनाथ मुंढे या वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करून विमुक्त जाती प्रवर्गातील चार टक्क्यांची मर्यादा वाढवून सहा टक्के केली व वंजारी समाजाचा समावेश विमुक्त जाती प्रवर्गात केला.या निर्णयाने पुतळ्याचे रूपाने केलेल्या उपकाराच्या ऋणातुन मुक्त तर होता आलेच पण त्याही पुढचे पाऊल म्हणजे वंजारी समाजातील अनेक पिढ्यांसाठी प्रगतीचा मार्ग मोकळा करून दिला व तोही बंजारा समाजाला कोणताही धक्का न लागु देता!ही"चॅरीटी"रक्तात असावी लागते हे आपण समजुन घेतले पाहिजे.त्यावर राजकिय वाद प्रतिवाद झाले व होत आहेत,परंतु वस्तुस्थिती अशी आहे!वंजारी-बंजारा एक नाहीत त्यामुळे वंजारी समाजाला विमुक्त जातीत समावेश करु नये,या मागणीसाठी मखराम पवार, हरिभाऊ राठोड व मधुकर पवार यांचेसह अनेकांनी सुधाकरराव नाईक व सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर रान पेटवले.मेळावे घेतले, मोर्चे निघाले वंजारी-बंजारा एक नाहीत!दोन्ही समाजाच्या भाषा अलग आहेत."नसाब म्हणजे काय?घुंडीवाळो हाडका म्हणजे काई!ई वंजारीन समजच काई!अशारीतीने जनमत पेटविण्याचे काम सुरू होते. तेंव्हापासून तर आजपर्यंत सुधाकरराव नाईकांना समजुन न घेता  त्यांच्यावर आरक्षण घटनेचे खापर फोडले जात आहे.कोणी मान्य करो वा ना करो, बंजारा समाजाला आरक्षण विलगिकरणाचा फायदाच झाला आहे.मखराम पवार व हरिभाऊ राठोड या नेत्यांनी विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अ, ब, क व ड सब कॅटेगरायजेशन करुन विमुक्त जाती प्रवर्गाला स्वतंत्र तीन टक्के आरक्षण मिळवुन घेतले. शरद पवार यांचे उपस्थितीत मुंबई निवासस्थानी हरिभाऊ राठोड यांनी सुचवलेला सब कॅटेगरायजेशन हा पर्याय सर्वसंमत झाला.हरिभाऊ राठोड यांचे अभ्यासु वृत्तीला व आरक्षणविषयक पेचप्रसंग निर्माण झाल्यास ते सोडविण्याचे कसब त्यांच्याकडे निश्चितच आहे.

या सर्व घटना"चॅलेंज व चॅरीटी"म्हणून सुधाकरराव नाईक यांचा करारीबाणा दर्शविण्यासाठी पुरेशा नाहीत काय?जिल्हापरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेतील फक्त अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेले समाजकल्याण विषय समितीचे सभापतीपद विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुद्धा राखीव असावे, अशी तरतुद मुळ अस्थापनेला कोणताही धक्का न लावता आपल्या दुरगामी धोरणात्मक प्रशासकीय अनुभवाने करुन घेतली त्यामुळे विमुक्त जाती प्रवर्गातील अनेकांना या समाजकल्याण विषय समितीचे सभापती होण्याची संधी मिळाली आहे.अशा अनेक घटनांनी त्यांचे आयुष्य ओतपोत भरलेले दृष्टीस पडते.या कृतींचा त्यांना प्रसिद्ध साठी उपयोग करुन घेता आला असता किंवा वंजारी-बंजारा आरक्षणाचा प्रतिवाद समाजासमोर करता आला असता, मात्र केलेल्या कामाचे मार्केटिंग न करणे ही थोर पुरुषांची व भल्या माणसांची आदरस्थाने आहेत,तेच नाईक परिवाराचे बलस्थान राहिले आहे.स्थल- कालाचा विचार करुन जनमानसात ऐकलेल्या घटनांचा मीडिया व लोक वदंता यांचा अन्वयार्थ लावून लेखन केले आहे. 


प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला

Post a Comment

0 Comments