Subscribe Us

भूक माणसाला गुन्हेगार बनवते !


 भूक माणसाला गुन्हेगार बनवते !


एका अल्पवयीन मुलाने चोरी केली. पोलिसांनी त्याला पकडले.  पोलिसांनी त्या मुलाला न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयात न्यायाधीश होते मा. मानवेंद्र मिश्र. त्या अल्पवयीन व निष्पाप मुलाला पाहून न्यायाधीशाला वाटले हा निष्पाप मुलगा चोरी कशी करू शकतो. याने चोरी केली, यामागे नक्कीच काही खास कारण असले पाहिजे. त्यांनी पोलिसांना या अल्पवयीन व निष्पाप दिसणाऱ्या मुलाने चोरी कां केली यामागचे कारण शोधून काढण्याचे आदेश दिले. पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा आढळून आले की, त्याची आई घरी भुकेने तडफडत होती. तिला अन्न उपलब्ध करून देता येईल यासाठी त्याने चोरी केल्याचे कारण उघड झाले.


त्या मुलाच्या वडीलाचा मृत्यू झालेला होता. आई मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. हा अल्पवयीन मुलगा मोलमजुरी करून कसेबसे आई व भावाचा सांभाळ करीत होता. लॉकडाऊन मुळे काम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे आई व भावाला दोन वेळचे अन्न द्यावे यासाठी तो चोरी करण्यास प्रवृत्त झाला होता.


त्याचा परिवार एका झोपडीवजा घरात राहत होता.  ज्याला झोपडीही म्हणता येत नव्हती. घरावर छपराचे नावाने सडलेले गवत टाकलेले होते. घरात झोपण्यासाठी साधी खाटही नव्हती. त्यांचेसमोर जिवंत राहण्यासाठी खाण्यापिण्याची कोणतीही सोय नव्हती, त्यामुळे अर्धपोटी-उपाशी ते दिवस काढत होते.


मा. न्यायाधीशाने त्याला शिक्षा देण्याऐवजी  खाद्यपदार्थ व अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचे शासनाला निर्देश दिले. मानसिकरित्या विक्षिप्त असलेल्या आईला स्वतः न्यायाधीशाने कपडे उपलब्ध करून दिले.. तालुक्याच्या तहसीलदार व बिडीओ  यांना त्यांना प्रत्येक प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्यांना ज्या-ज्या शासकीय योजनांचा लाभ देता येणे शक्य आहे, त्या योजनांचा लाभ देण्याचेही आदेश दिले. न्यायालय एवढ्यावरच थांबले नाही, तर दर चार महिन्यांनी या मुलाच्या कुटुंबाच्या स्थितीबाबत न्यायालयात अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले. बिडीओंना मुलाच्या कुटुंबाला शिधापत्रिका (रेशन कार्ड), कुटुंबातील सर्व सदस्यांना आधार कार्ड, आईला विधवा पेन्शन आणि घरबांधणीसाठी अनुदान मिळणेसंबंधाने आवश्यक सर्व दस्तऐवज तयार करण्यासंबंधाने आदेश दिले.


बिहार मधील नालंदा जिल्ह्यातील ही घटना आहे. हे प्रकरण मानवता व न्यायाचे अनोखे उदाहरण आहे. निकाल देण्यापूर्वी मा. न्यायाधीशाने एखादा गुन्हा घडला परंतु तो कां व कोणत्या परिस्थितीत घडला याचे मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. एखाद्या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय खरेच खरा न्याय होत नाही. एखाद्या सधन कुटुंबात तो मुलगा जन्माला आला असता तर कदाचित शिकून सवरून प्रतिभावंत झाला असता. परंतु, भुकेने त्याला चोरी करण्यासाठी मजबूर केले.


करोनाने आपल्या विकासाची व पुरोगामीत्वाची लक्तरे टराटरा फाडली आहे. जी अनेक वर्षे झाकून ठेवण्याचा प्रयत्न हेतूपूर्वक केला जात होता. देशातील करोडो लोकांसमोर पोट भरणे ही एकमेव समस्या आहे. काम मिळणे बंद झाले तर पोट कसे भरायचे हा प्रश्न करोडो लोकांसमोर निर्माण होतो आणि आपण विश्वगुरू झाल्याबाबत गप्पा मारतो.


भूक खरोखरच माणसाला गुन्हेगार बनवते.

राम पवार

अमरावती

भ्रमणध्वनी :9284196496

Post a Comment

0 Comments