Subscribe Us

गुंतलेले प्राण या रानात माझे!


गुंतलेले प्राण या रानात माझे!

प्रिय माता भगिनी, बुजुर्ग व माझ्या तरुण मित्रांनो.
अनेक दिवसांपासून माझ्या मनात तुमच्यांशी संवाद करावा हा विचार  घोळत होता. मनामनांशी संवाद केल्याने हृदयाशी हृदयाची सुखदुःखे समजुन घेण्याची धारणा वाढीस लागते. अहंकार,मत्सर व द्वेषभावना गळुन पडतात. निकोप मनाला एक ऊर्जा मिळुन कांही तरी भव्यदिव्य करावे हा विचार मनात पक्का होतो व त्या रचनात्मक कार्याकडे आपसूकच पावले वळतात. तुमचे मनचं परद्वेष,अहंकार व सूडाच्या भावनेने गच्च भरलेले असेल तर त्यात सदविचारांना जागाच मिळणार नाही. अगोदरच पाण्याने भरलेल्या घटात अधिकचे पाणी असे ओतता येईल!म्हणून पूर्वग्रहदूषित भावनेला मुळीच थारा देवु नये. शेती हा माझा जीवकीप्राण असला तरी शेतकी व मजुरांसाठी मला खुप काम करण्याची संधी मिळाली.शेती व निसर्गाच्या अतुट नात्याने मानवी जीवन अधिक प्रगल्भ व संपन्न होते पण राजकीय धोरणाने त्याचे पुर्ण कंबरडेच मोडले आहे. शेती व मजुरांच्या समस्या मला त्यांच्यात राहूनच कळल्या. विमुक्त व पालांवर राहणाऱ्या भटक्या समाजाच्या समस्या वेगळ्या होत्या. त्यांचे जगणेच असह्य होते. ऊन, वारा व पावसाशी तो संघर्ष तर होताच पण शिक्षणाची किरणेच त्यांच्या वस्तीवर पडली नव्हती. मोलमजुरी साठी सदैव भटकंती असल्यामुळे त्यांच्या मुलामुलींना शिक्षणाची गरज असल्याचे मला जाणवले व त्या दिशेने माझी पावले पडायला लागली. यातुनच आश्रमशाळा जन्माला आल्या. ज्याला शिक्षण मिळत नाही, मिळाले नाही त्यांच्यासाठी माझे हे पहिले शैक्षणिक धोरण ! पोटात अन्न नसेल तर काय चाटायचे ते शिक्षण !भुकेने अस्वस्थ असलेल्यांच्या डोक्यात ज्ञानाचे डोस कसे पचतील म्हणून
प्रथिनेयुक्त आवश्यक कॅलरी असलेले भोजन, निवास, पुस्तके या सर्व सुविधांसह पब्लिक स्कुल बेस असलेल्या आश्रमशाळा राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला,अनेकांनी ती ज्ञानमंदिरे आदर्शवत केली.शासकिय अनुदानाची तरतुद केली,कांही ठिकाणी सोयी सुविधा दिल्या जात नसल्याचे व कांही ठिकाणी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे मीडियात छापून आले.यात शासकिय शाळांचाही समावेश आहे.कोण खातय त्यांच्या ताटातले ?काय झाले या शाळांचे?पोरांची पोट पाठीला टेकली.कोणाची मुले आहेत ती?कोणत्या सोयीसुविधा त्यांना आपण देतोय?दोष कुणाला देणार?याचे चिंतन कोणी करावे?आत्मपरीक्षण करा! माझा रस्ता चुकला की,तुम्ही चुकीच्या रस्त्याने भरकटत जावून या पवित्र कार्याला नासवले!भारत देशातील विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी महाराष्ट्रात राबविण्यात आलेले माझे हे पहिले "शैक्षणिक धोरण" आहे. ज्यांच्या हातात ते सोपविले त्यांच्या कडून उत्तमोत्तम परिणाम यावयास हवे होते.प्राधिकरण मध्ये घडविलेले,घडलेले सामाजिक व राष्ट्रीय योगदान देत असलेल्यांची नावे समाजासमोर यावीत व त्यातुन अनेकांना प्रेरणा मिळेल.मुलांची काळजी घेण्यासाठी जो नियुक्त केयर टेकर आहे तो आज घरगडी बनला आहे. आपण निर्माण केलेल्या व्यवस्था आपणच दुरुस्त करायच्या आहेत.टिकवायचा आहेत, अंतर्गत प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतील व एक आदर्श रोल मॉडेल म्हणून पुढे यावे लागेल. शेजाऱ्यांकडून अपेक्षा करणार आहात काय?प्रश्न इथेच संपत नाही तर अशा प्रवृत्तीवर वेळीच आवर घातला गेला  पाहिजेत!पण तो सुद्धा अहिंसक मार्गाने!पाप होता कामा नये. जी चांगली प्राधिकरने आहेत,त्यांचे आदर्श समाजापुढे ठेवले पाहिजेत.ही सर्व संस्कार केंद्रे आहेत,येथेच देश व समाज अविरतपणे घडत असतो.याच संकल्पनेतुन १४ वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी शालेय पोषण आहार,गर्भवती व स्तनदा मातांसाठी सकस आहार योजना भारतात तर सुरू झाल्या पण जगाला सुद्धा बाळांसाठी शिक्षणा बरोबर आहार गरजेचा आहे हे पटले म्हणून सरकार अनुदान देते.सेवा व समर्पण या भावनेतूनच पुढे जाता येते. पण हे सर्व सरकारनेच करावे व आपण आपली जबाबदारी झटकून मोकळे व्हावे,ही मनाला न पटणारी गोष्ट आहे.आपलेही राष्ट्रीय योगदान ठळकपणे दृष्टीस पडावे.व्यवस्थापनात विश्वास व पारदर्शकता ठेवून ही ज्ञान मंदिरे तीर्थक्षेत्र बनावीत ! त्यासाठी आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात असलेला समाजसेवक सदैव जागा असु द्या.लोक तुम्हाला डोक्यावर घेवून नाचतील. लोकसहभागातून कामे तडीस जातात व विश्वास वाढतो. वादळानंतर स्मशान शांतता येईल पण हे सर्व दुरुस्त झालेले तुमच्या नजरेस पडल्या शिवाय राहणार नाही.भटक्या जमाती व विमुक्त जाती प्रवर्गातील मुलांचे भविष्य बदलेल यात तिळमात्र शंका नाही.
बंजारा समाजाची ओळख शासन दरबारी व्हावी, भारतभर विखुरलेल्या बंजारा समाजाची एकसंघ शक्ती राज्यकर्त्यांना दिसावी म्हणून"ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. वेगवेगळ्या प्रांतात अधिवेशने घेतली. देशाचे नेते, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांना समाजाच्या सांघिक शक्तीचे दर्शन घडविले,समाजाच्या समस्यांचे ठराव मांडले. माझ्या मृत्योपरांत ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांना अधिवेशनासाठी निमंत्रित करुन समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करुन संघशक्ती जिवंत ठेवली. त्यानंतर मात्र ऑल इंडिया बंजारा सेवा संघाला अवकळा आल्याचे ऐकण्यात आले याचे दुःख झाले.महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. मला आठवते!पुण्यातील प्रिन्स आगाखान यांनी त्यांच्या मालकीचा आगाखान पॅलेस राष्ट्राला अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता आणि ही मालमत्ता राष्ट्राला अर्पण होत असल्याने या समारंभाला केंद्रीय नेत्याने येणे हा राजशिष्टाचार असतो. मी राष्ट्रीय नेता नसल्याने मला तो पॅलेस स्वीकारणे राजशिष्टाचारात बसने शक्य नव्हते. परंतु राष्ट्राच्या वतीने तो मी स्वीकारावा म्हणून महामहिम राष्ट्रपती यांचा आग्रह होता म्हणून त्यांनी मला प्राधिकृत केले व राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे पत्र  प्राप्त झाल्यामुळे मला राष्ट्रीय अधिकार प्राप्त झाला व आगाखान पॅलेस स्वीकृतीचे सर्व सोपस्कार मी पार पाडले.
आज मी ऐकतोय,बंजारा समाजाच्या अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत व त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षांची संख्या सुद्धा खुप मोठी आहे. गल्लोगल्ली जर तुम्ही संघटना बांधत बसलात तर समाजात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. परस्परात द्वेष भावना वाढीस लागेल व त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतील.संघटनेत जात फॅक्टर कीस्टोन मानला तरी आयडिओलॉजी मुलभुत घटक असतो हे आपण समजुन घेणे आवश्यक आहे.सामाजिक प्रश्नांसाठी तुम्ही एकीकृत लढा उभारुन सरकारचे लक्ष वेधून त्याची दखल घेतली गेली पाहिजे अन्यथा लढ्याचे हे शस्त्र बोथट होण्याला वेळ लागणार नाही.फोटो आंदोलनाला या जगात विचारतो तरी कोण!शिवी हासडून भंपकबाज भाषणाने तुम्हाला टाळ्या मिळवता येतील.समोर बसलेल्या लोकांना गृहीत धरू नका,कारण अशांना समाज पूर्णपणे ओळखुन असतो.महात्मा गांधी च्या"चलो जाव"या दोनच शब्दांनी राष्ट्रीय उठाव घडवुन आणला. हे लक्षात घ्या!तरुणांनी खुप मोठे व्हावे,समाजासाठी अधिक काम व कष्ट करण्याची तयारी ठेवावी. तुमचे काम त्या योग्यतेचे झाले की,तुम्हाला कोणी रोखु शकणार नाही. संघर्षातून तावून सुलाखून निघालेला कार्यकर्ताच यशस्वी नेता म्हणून पुढे येतो.प्रश्नांचे काय?ते तर परिस्थिती व कालानुरूप बदलत राहतात. समाजाच्या राष्ट्रव्यापी प्रश्नांसाठी एकमत करुन ते सोडविण्यासाठी लढा उभारणे शहाणपणाचे ठरणार आहे.त्यातुन तुमच्या नेतृत्वाला आकार येईल, दुसऱ्याचे दावणीला समाजाला बांधुन तुम्ही काय मिळविणार आहात. तुम्ही एकवेळ संघशक्तीने उभा राहिला की मित्रत्वाचे मार्ग खुले होतात. या जगात एकट्या दुकट्याला विचारतो तरी कोण!आणि अशा असंघटित तत्वांशी मैत्री तरी कोणी का म्हणून करावी!म्हणून संघटित रहा.यवतमाळ जिल्ह्यातील गहुली माझे जन्मगाव तेथील लोकसंख्या मोजुन १८२ आदिवासी व बंजारा बहुल!पण तरीही मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होवु शकलो. या राज्यात, देशात राहण्याचा, उपजीविका करण्याचा व समान संधीचा लाभ घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. या अधिकाराचा संकोच होता कामा नये, ही माझी सुस्पष्ट धारणा आहे,म्हणुन सर्व जातीधर्माच्या लोकांचा  माझ्याबद्दलचा विश्वास मी वृद्धिंगत केला.मैत्रीचे बंध जोडले. म्हणून जनतेनेही माझ्यावर उदंड विश्वास टाकला.मी एकटाच बंजारा समाजाचा असुनही २८८ विधिमंडळ सदस्यांचा नेता होवून राज्याचा कारभार हाती घेतला. प्रत्येकाने आपापल्या जातीचा विचार केला तर समग्र महाराष्ट्राचा विचार कोणी करायचा! महाराष्ट्राला मी माझे मानले,इथे नांदत असलेल्या जातींना आपलेपणाच्या भावनेने विश्वास दिला. जनतेच्या डोळ्यातील अश्रूंना जाणले म्हणून साडेअकरा वर्षे त्यांनी महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मला दिली, हे मी विसरु शकणार नाही. बंजारा समाजासाठी लढत असतांना ही भूमी इथे नांदणाऱ्यांची सुद्धा आहे, याचे सुद्धा भान असु द्या.विवाहादी बाबी ह्या संस्कार स्वरुप न राहता भव्यदिव्य सोहळा इव्हेंट बनत आहेत. या भव्यदिव्यते मुळे गरीब माणुस भरडला जात आहे. शिक्षण व अनुरूपतेला प्राधान्य न देता शारीरिक सौंदर्य व हुंड्यासाठी आग्रही भूमिका घेतली जात आहे. मृत्युभोज मोठा समारंभ होत आहेत त्यामुळे सामान्य माणुस दारिद्र्यात ढकलला जात आहे. हा खर्च मुलामुलींच्या शिक्षणावर  व्हावा.राजकारणा बरोबरच साहित्य,कला,क्रीडा,विज्ञान ही समाजाची प्रभावशाली विविध अंगे आहेत त्यामुळे या सर्वंकष क्षेत्रात जाणीवपूर्वक व जबाबदारीने काम करावे लागेल, भारतीय सेनादलात"गोर बंजारा रेजिमेंट"असावी म्हणून मी१९६२व१९७२च्या चीन व पाकिस्थान युद्धाच्या वेळी बंजारा समाजातील तरुणांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन केले होते.शेती व संरक्षण ही देशाची महत्वाची अंगे आहेत.असे मी मानतो.साहित्यामुळे नवे विचार व नवी दृष्टी विकसित होण्यास सहाय्यभूत ठरते व नवनिर्मितीची दालने खुली होतात,समाजाच्या जाणिवा विकसित होवुन तो अधिकाधिक प्रगल्भ होत जातो.मी तुमचा व तुम्ही माझे आहात म्हणून हा वडीलकीचा सल्ला दिला आहे.भविष्यातील बंजारा समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या अधिक सुजलाम सुफलाम व्हावा,हेच माझे प्रयत्न होते. ही स्वप्ने आपल्याला पडावीत!पडतही असतील! महात्मा गांधीजींच्या अहिंसक लढ्याने व सत्याग्रहाने या जगात क्रांती केली आहे, हा ताजा इतिहास आहे. शब्दांचे सामर्थ्य हेच त्यांचे सर्वोत्तम शस्त्र होते.विस्कटलेली घडी व तुटलेली मने सांधायला इतिहासाला पुन्हा रिपीट व्हावे लागते.प्रश्न व परिस्थिती बदलत जाते म्हणून कोणत्याही समाजाला व संस्थेला पुढील पाच पंचविस वर्षांचा संभाव्य सामाजिक बदलांचा अंदाज बांधुन निर्धास्तपणे पावले टाकता आली पाहिजे.हे माझे अनुभव व अभ्यासाने प्रकटलेले अंतरीचे बोल आहेत!समाज व संघटनेप्रती सेवा,समर्पण व त्यागाने----हे शक्य आहे.

हे नवे जग व या नव्या जगाची स्वप्नेही आपल्याला पडावीत. ती साकारण्यासाठी आत्मबळ,मानवतेने ओतपोत भरलेली एकसंघ भावना व संघशक्ती उभी करु या! 

 प्रा.जयसिंग.द.जाधव पातूर जि अकोला

Post a Comment

0 Comments