Subscribe Us

पाटनूरचा जंगल सत्याग्रह व उमरी बँक ऍक्शन


 हैदराबाद मुक्ती संग्राम

पाटनूरचा जंगल सत्याग्रह व उमरी बँक ऍकन


हैदराबाद स्टेट अर्थात निजाम स्टेट भारतीय संघराज्यात विलिन करा या जनतेच्या मागणीसाठी हैदराबाद स्टेट काँग्रेस वर निजाम सरकारने बंदी घातली,म्हणून कार्यकर्त्यांनी कौन्सिल ऑफ ऍक्शनची स्थापना करुन जंगल सत्याग्रह घडवून आणला. सर्व आंदोलनकर्ते कुऱ्हाडी घेवून नागोलीच्या पारावर जमले. पत्रकार अनंत भालेराव यांनी लढ्याचे नेतृत्व केले. सात-आठ हजार लोकांचा जमाव कुऱ्हाडी घेवून सज्ज झाला होता. तीन-चार तास जंगल तोडण्याचा कार्यक्रम चालु होता.१,२२,००० शिंदी, ताड, मोह व सागाची झाडे तोडण्यात आली.५५८८ लोकांना अटक झाली.५५० खेड्यांनी सरकारी कर देण्याचे नाकारले,२७० खेड्यांनी लेव्ही देण्यास नकार दिला,अशारितीने कायदेभंग करण्यात आला.७२३पाटलांनी राजीनामे दिले,२९२खेड्यातील पंचांनी राजीनामे दिले,२८७वकिलांनी कोर्टावर बहिष्कार घातला,४४००विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला,६०पाटील व कुलकर्णी यांनी दप्तरांची होळी करुन असहकार आंदोलन पुकारले. रजाकार केंद्रावर हल्ले केले.निजामशाहीच्या विरोधात बंड करणारे व रजाकार यांच्याशी सशस्त्र लढणारे आंध्रप्रदेशचे जाठोत ठानु नायक आघाडीवर होते.देवु नायक, हामु नायक, मंगली बाई, फुली बाई तेलंगणा(आंध्रप्रदेश)यांनी रजाकार व निजामी पोलीस यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकुन धारदार विळ्याने हल्ला करुन बंजारा महिला तुकडीचे नेतृत्व केले होते.या मुक्तीसंग्रामात लढ्यात वेगवेगळ्या भागात १७काँग्रेस सैनिक धारातीर्थी पडले,३०कार्यकर्ते शत्रूच्या अमानुष गोळीबारात मृत्युमुखी पडले. निजाम स्टेट बरोबरच विदर्भातील मध्यप्रांतात सुद्धा याचे पडसाद उमटले व धुंदी घाटोडीच्या जंगलात सत्याग्रह होवून झाडे तोडण्यात आली. यामध्ये लोकनायक बापुजी अणे, रामसिंगजी भानावत,बाबूसिंग दगडूसिंग राठोड, ठाकुरसिंग राठोड, बाबासाहेब नाईक,वसंतराव नाईक,मांडवीचे बळीराम हिरामण पाटील,इंगलवाडीचे बदुसिंग पांडुसिंग राठोड,वरोली येथील समाज सुधारक रामजी रामसिंग नाईक पवार,गहुलीचे रामधन नाईक, सोनबा चंदू नाईक,सखाराम मुडे गुरुजी,कनिराम रामु वडते, चंदु हरसिंग राठोड धुंदी,वकील चंदूसिंग राठोड गहुली यांनी पुढाकार घेवुन असंख्य लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला. पोलीस अधिकाऱ्यांनी जीव वाचविण्यासाठी बंदुका खाली ठेवल्या"वंदे मातरम व भारत माता की जय"चा घोष करुन एक महिनाभर या परिसरामध्ये फिरकले सुद्धा नाहीत.

उमरी, नांदेड व धर्माबाद रेल्वे लाईन बंद पाडून उमरी बँकेचा संपर्क तोडण्यात आला. दि२९ जानेवारी १९४८ रोजी अंधारात प्रवास करुन, पहाटे तीन-चार चे सुमारास न्याहऱ्या उरकून उमेरीहून कार्यकर्त्यांनी तीन रिकाम्या बैलगाड्या आणल्या. एका गाडीत उमरीचे उत्तरवार, दुसऱ्या गाडीत शंकर शर्मा तर तिसऱ्या गाडीत *बाबा लमानी* होते.उमरीचे धनजी भाई जय्यत तयारीत होते. सर्वप्रथम रेल्वे स्टेशन मास्टर यांचे कडील तिकीट विक्रीतुन आलेली रक्कम आंदोलन कर्त्यांनी हिसकावून घेतली. दुसऱ्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ला करुन स्टेशन ताब्यात घेतले.अनंत भालेराव, आबासाहेब व बन्सीलाल लक्ष देवून उभे होते. लगेच ते बँकेत घुसले. तीन गाड्या रक्कम घेवून २२ मैलांचे अंतर कापुन सर्वजण उमरखेड विदर्भाच्या हद्दीत पोहचले.पुढे जीपमधून सर्व पैसा पुसद येथील गोदाजीराव मुखरे यांच्या हवेलीवर आणण्यात आला. स्थानिक न्यायाधीश यांना साक्ष ठेवून नोटांची मोजणी झाली. लुटलेली रक्कम निजामाच्या शिक्क्यात २०लक्ष,६३ हजार,७१९ रुपये१५ आणे होती तर हीच रक्कम सुर्ती मध्ये १७ लक्ष, ६८ हजार, ९०२ रुपये १३आणे भरली. ही सर्व रक्कम मोजल्यानंतर सोलापूर येथील कृतीसमितीच्या हवाली करण्यात आली. पुण्याचे ऑडिटर एल एम जोशी आणि कंपनी चार्टर्ड अकाऊंट यांनी हिशोब तपासले.

३० जानेवारी१९४८ रोजी दिल्लीत महात्मा गांधी यांची हत्त्या झाली त्यामुळे सर्वत्र निर्बंध लावण्यात आले२५ जुलैच्या मद्रास येथे जाहीर सभेत पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, जरूर पडेल तर आम्ही हैदराबादेत लष्करी कारवाई करु!.७ सप्टेंबर १९४८ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकसभेत भाषण केले,आम्ही कांही तत्व व मूल्याना अनुसरुन वागत आलो, शेवटपर्यंत शांतता व सलोख्याचे मार्ग चोखाळीत गेले पाहिजे असा आमचा प्रयत्न होता, परंतु शेवटी आदर्श आणि वास्तव यांच्यात परस्पर विरोध झाला व आम्हाला सत्त्याकडे वळावे लागले. सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री होते. शेवटी लष्करी व निमलष्करी दलाने"१३सप्टेंबर१९४८रोजी भारत सरकारचे सैन्य चारही बाजूने निजामाच्या सरहद्दीत घुसले.तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने भारतीय सैन्याने तुळजापूर सर केले.सैन्याचा वेग काळापेक्षाही वेगवान होता.विदर्भ- निजाम सीमेवरील जंगल परिसरात भारतीय सैन्याच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. झरंडी, सावरगाव व नायगाव देशमुखच्या जंगल भागात लष्करी छावण्या होत्या.रखरखत्या उन्हात रेखा भावसिंग राठोड, दगडू अर्जुन जाधव, देवसिंग गेमा राठोड,नानु मनसु राठोड, मेघा थावरा,थानू हेमला राठोड,लछु फत्तूसिंग जाधव,चतरु केळुत गावंडगाव,कारभारी थावरा राठोड,झामा हरी राठोड अनवाणी पायाने ५-६  मैलावरील जंगलात असलेली भारतीय सैन्य दलाची छावणी पहावयास गेले होते. परिसरातील अनेकांनी सुद्धा छावणी पाहिली.झरंडीचे दलपत बालू जाधव, कनिराम दगडू राठोड, मनिराम दगडू राठोड,गिरधारी धनसिंग जाधव, शामा जाधव, इत्यादी.आजही बंजारा होळी गीतात त्याचा उल्लेख होत राहिला आहे."ला लसकर(लष्कर) पडो झरंडी न को ये"१७ सप्टेंबर ला हिंदी लष्कर सिकंदराबाद पासून पाच मैलावर येवून ठेपले होते. जनरल राजेंद्रसिंह यांनी हैदराबाद लष्कर प्रमुख जनरल अल इदृस यास शरण येण्यास सांगितले. जनरल इदृस एका रक्षकासह भारतीय सैन्यापुढे आले व हैदराबाद शरण आल्याचे १७ सप्टेंबर १९४८ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास जाहीर केले.अशा तऱ्हेने उस्मान अली सातवे यांचे निजाम सरकार बिनशर्त भारतीय संघ राज्यात विलिन झाले.स्वामी रामानंद तीर्थ, पत्रकार अनंत भालेराव,गोविंद भाई श्राफ यांनी नेतृत्व केले.हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात अनेकांनी भाग घेतला बंजारा समाजातील अनेक तरुण या लढ्यात सैनिक होते.


प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला

(संदर्भ-मराठवाड्याचे मानकरी खंड२ व बंजारा समाजातील लोकगीते)

Post a Comment

0 Comments