Subscribe Us

बंजारा संस्कृतीचे गलिच्छ व बीभत्स प्रदर्शन


बंजारा संस्कृतीचे गलिच्छ व बीभत्स प्रदर्शन

निवडणुक असो वा सत्कार सोहळा!गळ्यात डफडे लटकवून, फेटा व गळ्यात पट्टा लटकवून बंजारा आपल्या संस्कृतीचे बीभत्स प्रदर्शन करण्यात मागे राहिला नाही.संस्कृतीच्या नावाखाली महिलांना पारंपरिक वेषात १-२की मी आपल्या नेत्याच्या समोर नाचवत जाणारा गाव पुढारी समाजाला कोठे नेवून ठेवत आहे याचे चिंतन करण्याची वेळ केंव्हाच निघून गेली आहे. तरीपण अशा तथाकथित लोकांची नावे जाहीररीत्या समाजासमोर येणे आवश्यक आहे. मनाच्या नाहीतर जनांच्या लाजेखाली ही मंडळी असे धाडस करणार नाहीत.एक किलो मटण, एक दारूची बॉटल द्या व बंजारा समाजाची मते घ्या अशी निवडणुकीतील उमेदवाराची जाहीर भाषणे काय सांगतात? बंजारा बायांना नाचवणे हा आता इतर समाजासाठी प्रतिष्ठेचा नवा ट्रेन्ड सुरू झाला आहे.जि प/प स उमेदवारी मिळविण्यासाठी तर कांही बुद्धीहीन लोक व्यवसाय म्हणून आता हा नवा पायंडा पाडत आहेत. महाभारतातील द्रौपदी प्रसंगा पेक्षाही हा खतरनाक व बीभत्स आहे. येणाऱ्या पिढ्यांनी हा व्यवसाय म्हणून पुढे आणला तर त्याचे वाईट वाटण्याचे कांही कारण नसावे?असे वाटते.इतर समाजाकडून १-२रुपये बंजारा महिला फगवा मागत असत, दारूचे व्यसन खुप होते. समाजातील धुरीणांनी महत्प्रयासाने ही प्रथा बऱ्याच अंशी बंद केली पण आता नव्या रुपाने महिलांना पेहेरावात आणुन पुढारी व रॅलीतील लोकांसमोर भर उन्हात नाचविले जात आहे. तेही आपल्याच लोकांकडून. "टाळेस रे मोतीवाळा!"असे म्हणण्याची वेळ आली आहे. याचसाठी संस्कृती टिकविण्याचा ठेका काय फक्त महिलांनीच घेतलाय?वाटेल तेथे, वाटेल त्या कार्यक्रमात महिलांनी मुजरा नृत्य करत राहावे याला पुरुषप्रधान मानसिकता जास्त जबाबदार आहे असे वाटते.
थोडे थांबा, वाट पहा!लेंगी स्पर्धा, भजन मुकाबला याचेही आयोजन इतर अन्य समाजाकडून केल्या जाण्याचा काळ दुर नाही.
"गड्या अपुला तांडाच बरा होता."पण आता असे वाटते, कुठे नेवून ठेवलाय तांडा?

प्राचार्य जयसिंग द जाधव

Post a Comment

0 Comments