Subscribe Us

माझे अंतरीचे बोल


माझे अंतरीचे बोल

तिसरे वसंतवादी साहित्य संमेलनातील प्रा जयसिंग द जाधव यांचे अध्यक्षीय भाषण

------------------------------------

दि १२ ऑगस्ट२०२३रोज शनिवार नागपूर

------------------------------------

माझ्या उपस्थित बंधु- भगिनींनो!सर्व प्रथम महानायक वसंतराव नाईक यांचे विचारांना अभिवादन करून माझे अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करत आहे,गोर बंजारा साहित्य संघ भारत द्वारा आयोजित तिसरे साहित्य संमेलन नागपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे,याचा मनस्वी आनंद आहे. वसंतराव नाईक साहेबांचे शिक्षण याच नगरीत झाले असून जीवनसाथी सुद्धा येथेच मिळाली त्यामुळे या नगरीसी नाईक साहेबांचे पारिवारिक ऋणानुबंध अधिक घट्ट झाले आहेत. मध्यप्रांत सरकारमध्ये विधानसभा सदस्य व महसुल उपमंत्री म्हणून राजकीय जडणघडण येथेच झाली आहे. गोर बंजारा साहित्य संघ भारताचे राष्टीय अध्यक्ष मा नवलकिशोर उर्फ नामा नायक, मुख्यसंयोजक मा पृथ्वीराज चव्हाण, मा सीताराम राठोड, राष्ट्रीय संघटक मा मनोहर भाऊ चव्हाण,मा राजगुरू, नागपुर महानगरीचे नायक आत्माराम चव्हाण,मा राठोड ,मा नंदुभाऊ पवार, सत्कार मूर्ती कुंदनजी शेरे,स्वागताध्यक्ष मा श्रीकांत राठोड, मा होमसिंग पवार मा राजुसिंग चव्हाण (जलसंधारण मंत्री यांचे स्वीय सहाय्यक) मा संजय महाराज,मा पंकजपाल महाराज व त्यांचे सर्व सहकारी,मा श्रावण भाऊ जाधव, मा डॉ शांतीलाल चव्हाण,मा नारायण चव्हाण, मा अशोक पवार अभिनंदनास पात्र आहेत. साहित्य संमेलनाचे उदघाटक आदरणीय माजी खासदार हरिभाऊ दादा राठोड,आदरणीय व्यासपीठ व उपस्थित सर्व बंधु भगिनी व पत्रकार मित्रांनो!

वसंतराव नाईक साहेब यांचे स्मरण करत असतांनाच त्यांच्या बहुअंगी कर्तृत्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न परिससंवादाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. अनेक विचारवंत व अभ्यासकांना नाईक साहेबांच्या कार्याच्या विविध पैलूंवर बोलण्याची संधी दिली गेली आहे.संमेलनाचे निमित्ताने विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेले विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे सत्काराचे आयोजन सुद्धा केलेले आहे, ही विशेष अभिनंदनीय बाब आहे. खरेतर हा त्रिवेणी वैचारिक मंथनाचा सोहळा आहे असे मी मानतो.आपण सर्व वसंतराव नाईक साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे लोक आहोत.या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वसंतराव नाईक साहेबांचा"अन टोल्ड वसंतराव नाईक"आपल्या समोर मांडण्याची संधी आपण मला दिली आहे.महाराष्ट्र हिंडत असतांना खेड्यापाड्यातील, तांड्यातांड्यातील गोरगरीब लोक व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यात आल्या व त्या सोडविण्यासाठी नाईक साहेबांनी कसा जीवाचा आटापिटा केला होता,हे त्या गोरगरीब लोकांकडून ऐकायला मिळाले. अनेक पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्या पण ज्या हरणीवासी लाकडाची मोळी विकणाऱ्या महिला हयात आहेत त्या महिलांनी हृदयद्रावक प्रसंग कथन केला,बैलजोडी व टिनपत्रे वाटप तसेच वरोली ता मानोरा येथील विश्वनाथराव पवार यांच्या"नवाटी"या शेताचा हस्तांतरण प्रसंग !विनोबाजींच्या भूदान चळवळीतून मिळालेली हजारो एकर जमीन भूमिहीनांना हस्तांतरण करण्याचे प्रसंग मी माझ्या"भूमीपुत्राचं देणं"या पुस्तकात नोंदविले आहेत."पेरणी ते कापणी"व वाजतगाजत धान्य शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचविण्याच्या घटना, हा शेतकऱ्यांच्या प्रति "कृतज्ञतेचा सोहळा"नाईक साहेबांनी घडवुन आणला याचे वर्णन शब्दात कसे करता येईल! "वैष्णव जण तो तो तेणे कहिये,जो पिड पराई जाणे रे!पर दुःखे उपकार करे तो मन अभिमान न आने रे"मनाला अहंकाराचा स्पर्शही न होवु देता नाईक साहेबांनी जनतेची सेवा केली.अनेक प्रसंगाचा संदर्भ घेवून त्यांचा अन्वयार्थ लावण्याचा मी प्रयत्न केला आहे. स्थळ काळाच्या कसोटीवर तपासून व कांही प्रत्यक्ष मुलाखती घेवून आपल्यासमोर मांडत आहे.

......महात्मा ज्योतिबा फुले पुणे महानगरपालिकेच्या कौन्सिलर पदाच्या निवडणुकीला उभे राहिले पण त्यांना दोन मतांनी पराभव पत्करावा लागला. महापालिकेच्या स्थायी समितीला भटकंती करणाऱ्या समुदायाला आरक्षण देण्याची पहिली मागणी एका निवेदनाद्वारे त्यांनी केली.फुलेंच्या विचारांचा प्रभाव नाईक साहेबांवर कसा होता हे अनेक बाबींवरून दिसून पडते.

जॉर्ज पंचम, इंग्लंडचे राजे भारत भेटीवर आले होते. मुंबई स्थित गेट वे ऑफ इंडियाच्या कमानीतून त्यानी भारत भूमीवर पाय ठेवला. कमानीच्या एका कोपऱ्यात मुंडासे बांधून व हातात कागद घेवून बसलेली व्यक्ती त्यांना दिसून आली, कुतूहल म्हणून जॉर्ज पोलिसांच्या गराड्यातुन बाहेर आले व निवेदन स्वीकारले.कोण होती ती व्यक्ती?काय लिहिले होते निवेदनात?ती व्यक्ती म्हणजे"महात्मा फुले"!निवेदनात लिहिले होते:-

१)पावसाचा थेंब न थेंब साठविण्यासाठी तलाव, धरणं बांधा.

२)ज्वारीचं संकरित वाण पाठवा.हायब्रीड वाण.

३)शेतीला जोड धंदा-संकरित गाय द्या, वळू पाठवा. अधिक दूध देणाऱ्या गायींची पैदास होईल.

जरा आठवा!हाच विचार नाईक साहेबांनी रुजवला. म फुले यांनी सांगितलेला भटक्या विमुक्त जातीच्या आरक्षणाचा विचार ४%आरक्षण देवून पूर्ण केला. नाईकसाहेब कोणत्या राजकीय परिस्थितीतून घडले हे ज्ञात नसले तरी महात्मा फुले यांच्या संबधी वाचल्याच्या नोंदी आढळतात.नाईक साहेब अभिजन, बहुजन वा दलितही नव्हते!असे चतुरस्त्र या ग्रंथाच्या प्रस्तावनेत अरुण साधु यांनी नमूद केले आहे.त्यामुळे कोणतीही दणकट लॉबी त्यांच्या पाठीशी नव्हती तरीही ते साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिले. यशवंतराव चव्हाण पाठीशी असल्याचे सांगितले जाते. पण मराठा लॉबीचे खंबीरपणे समर्थन तरी कुठे होते चव्हाण साहेबांना!वसंतराव नाईक म्हणजे दुबळे नेतृत्व असे थोडेच म्हणता येईल!ते ठोस व निर्णायक विचाराचे सशक्त नेते होते.कायद्याचे शिक्षण त्यांनी घेतले होते म्हणून ते कायदे तज्ज्ञ सुद्धा होते.केंद्राला  अनेक निर्णय घेण्यास त्यांनी भाग पाडले. कृषी विध्यापीठे व बियाणे महामंडळ ही त्याची उदाहरणे! महाराष्ट्रात अनेक जनकल्यानाचे निर्णय त्यांनी घेतले.प्रारंभीच्या राजकीय जीवन प्रवासात ते महाराष्ट्राला म्हणावे तेवढे परिचित नसले तरी आपल्या अफाट कर्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्राला व देशाला आपली ओळख करून दिली.नेपोलियन बोनापार्ट यांचे फ्रान्स मधील पुनरागमन व त्याबद्दल फ्रेंच वर्तमानपत्राचा बदलत गेलेला पवित्रा यांचा जसा अभ्यास झालेला आहे तशीच स्थिती वसंतराव नाईकांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेमणुकीलाही लागु पडते.

नागपूर, मध्यप्रांताच्या राजधानीचे शहर!अनेक सामाजिक चळवळीचे केंद्र!बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्म परिवर्तन चळवळीचे केंद्र!१९५६मधील धर्म परिवर्तनाची ही घटना!लाखो अनुयायांचा जनसागर !नाईक साहेबांचे शिक्षण याच नगरीत झालेले!१९५२ ते१९५५ पर्यंत याच प्रांताचे विधिमंडळ सदस्य व राजस्व उपमंत्री राहिलेल्या नाईक साहेबांचा या चळवळीशी संबंध आल्याचे दिसुन येत नाही.मात्र वसंतराव नाईक साहेबांचे खंदे समर्थक व समाज सुधारक पदमश्री रामसिंगजी भानावत हे नाईकांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्ली स्थित निवासस्थानी भेटुन दोघांमध्ये सामाजिक चळवळ व आरक्षण याबाबत चार वेळा चर्चा झाल्याचे पदमश्री रामसिंगजी भानावत यांनी जवाहर आश्रमशाळा बावी तांडा उस्मानाबाद येथील सभेत सांगितले होते."पहले आप अपने बिरादरीसे बात करो."असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याचे भानावतजी यांनी सांगितले होते.भारतीय घटनेचा आधार घेवून महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांना वसंतराव नाईक यांनी चार टक्के आरक्षण मिळवून दिले.त्याव्यतिरिक्त या याबाबत कोठेही कांहीही वाचण्यात आलेले नाही.शिक्षण व नोकरीतील आरक्षणामुळे भटक्या व विमुक्त प्रवर्गातील मुलांना संधीचा लाभ घेता आला. याचे सर्व श्रेय नाईक साहेबांना जाते. छत्रपती शिवराय,राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामावळीत वसंतराव नाईक साहेबांना बसविणे उचित की अनुचित हे मी सांगणार नाही.कारण ती महान उंचीची व्यक्तमत्वे होती!पण भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या व शेतीच्या उत्थानासाठी नाईक साहेबांनी केलेले कार्य नजरेत भरावे एवढया उंचीचे निश्चितच आहे.ग्रामिण विकासाचा रोडमॅप त्यांच्याच काळातला!आजही राज्याला व किंबहुना देशालाही याच विचारांच्या मागोवा घ्यावा लागतो.याचा वैचारिक राजकीय विश्लेषक व अभ्यासक यांनी या अंगाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक व सामाजिक वास्तव अभ्यासून वसंतराव नाईक यांचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व व राजकीय नेतृत्व यांचा अभ्यास करायला हवा!महात्मा गांधीजी यांच्या ग्रामस्वराज्य या ग्रामविकासाच्या संकल्पनेवर त्यांचा भक्तिभाव होता.बलवंतराय मेहता समितीने सुचविलेल्या पंचायत राज मसुद्यात जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सुचविला होता. परंतु ही बाब लोकप्रतिनिधी कायद्याला विसंगत असल्यामुळे महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरण नाईक समिती नेमल्या गेली. १५मार्च १९६१ रोजी वसंतराव नाईक यांनी २९३ पानांचा अहवाल मंत्रिमंडळाला सादर केला. वसंतराव नाईक यांनी ज्या शिफारसी केल्या होत्या त्याच आधारावर १मे १९६२ रोजी जिल्हा परिषदांची निर्मिती करण्यात आली. हाच अहवाल देशाने जशाचा तसा स्वीकारला. महाराष्ट्रात व देशाने स्वीकारलेल्या पंचायत राज या थ्री टियर व्यवस्थेची त्यांनी पुनर्रचना केली.वास्तविकता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मुळातच पंचायत राज व्यवस्थेला विरोध होता परंतु संविधान सभेतीलआक्रमक भूमिका पाहता"I have accepted this!"असे उत्तर त्यांना द्यावे लागल होतेे. शाम बेनेगल यांनी निर्मिती केलेल्या संविधान एपिसोड भागात हा उल्लेख केलेला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध का केला होता,याचे उत्तर मला देता येणार नाही. त्यावर विद्वानांनी मते व्यक्त करावी. परंतु असे सांगितले जाते की,जातीयता जोपासणारी अज्ञानी व मागास खेडी पंचायत राज आल्याने उच्च जातीच्या वर्चस्वाखाली जातील. गरीब अस्पृश्य व दलितांचे पुन्हा शोषण होईल म्हणून खेड्यांच्या पुनर्रचित पंचायत राज या व्यवस्थेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. परंतु आज हिवरे बाजार, लेखामेंढा,राळेगणसिद्धी इत्यादीसह अनेक गावे  पाहिली की,असे वाटते की ही भिती निराधार ठरली आहे.अनेक मागासवर्गीय तरुणांना,महिलांना नेतृत्व करण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे.सामाजिक अभिसरण वेगाने घडून स्पृश्य अस्पृश्यतेच्या,भेदाभेदीच्या भिंती खिळखिळ्या होऊन ध्वस्त होण्याला मदतच झाली आहे.ग्रामीण भागातून अनेक राज्य व देशपातळीवरील नेते घडले आहेत. सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, आबा पाटील ही महाराष्ट्रातील त्याची उदाहरणे आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था नेतृत्व निर्माण करणाऱ्या पाठशाळा ठरल्या आहेत. आपल्या वसंतराव नाईक काकांनी महाराष्ट्रात पंचायत राज या थ्री टियर व्यवस्थेची निर्मिती केली त्या व्यवस्थेला अधिक शक्ती देण्याचे काम सुधाकरराव नाईक यांनी केले आहे. जिल्हापरिषदेचा अध्यक्ष यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देवून लाल दिव्याचे वाहन दिले,सन्मान दिला.व राज्य शासनाच्या अखत्यारीतील ग्रामीण विकासाशी निगडित जवळपास वीस विषय जिल्हापरिषदेकडे वर्ग केले.जिल्हापरिषद आज मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते याचे सर्व श्रेय वसंतराव नाईक साहेबांना जाते हे आपण समजून घेतले पाहिजे.

वसंतराव नाईक साहेबांचे एकंदरीत कर्तृत्व यावर नजर टाकली तर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. आधुनिकता स्वीकारून सर्व घटकांच्या हितांची जपवणूक करण्याचे सूत्र सापडते. म्हणून म फुले यांचे विचार वसंतराव नाईक साहेबांना गुरुस्थानी असल्याचे दृष्टीस तर पडतातच पण आपल्या अंगीभूत असलेल्या तळमळीने कार्य सिद्धीचा निर्धार सुद्धा प्रकट होतो व महाराष्ट्राला एका विकास उंचीवर नेण्याचे स्वप्न फलद्रुप होते,म्हणून नाईक साहेब जनमाणसाचे महापुरुष व महानायक ठरतात.विधान मंडळाने प्रकाशित केलेला"चतुरस्त्र"ग्रंथ व महानायक !वसंत तु!या चित्रपटात अशा स्वरूपाचा ओझरता उल्लेख आलेला आहे.नाईक साहेबांच्या कर्तृत्वाची,दीनदुबळे यांच्या जिव्हाळ्याच्या भेटीची महाराष्ट्र व देशातील अज्ञात शिल्पे शोधुन जमेल तशी मांडण्याचा प्रयत्न करत आहे.कठोर परिश्रमावर असणारा प्रचंड विश्वास, योग्य वाटणाऱ्या गोष्टींचा न डगमगता घेतलेला निर्णय आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, दूरदृष्टी या गुणांमुळे सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करून राज्याला व देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून हरितक्रांतीचे शिल्पकार म्हणून वसंतराव नाईक साहेबांचे कार्य चिरकाल स्मरणात राहणारे आहे.परंपरागत शेतीला नवतंत्रज्ञाची नवदृष्टी दिली.नाईक साहेबांचे ६६ वर्षांचे आयुष्य, त्यांचे यशापयश, चिकाटी, सहनशीलता, सभ्यता व उच्च दर्जाचे विचार यातून खुप काही शिकण्यासारखे आहे. येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक आहेत. श्रमाला प्रतिष्ठा व मूल्य मिळवून देणाऱ्या रोजगार हमी योजनेमुळे ते जगाच्या इतिहासात अग्रस्थानी असल्याचे मान्य करावेच लागेल.

१९७३-७४मध्ये अमेरिकेतील प्रिस्टन विद्यापीठात ग्रामिण विकास या विषयाची तासिका घेत असतांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त प्रा आर्थर लुई यांनी रोजगार हमी योजना कशी राबवावी, हे महाराष्ट्राकडून शिकावे असे आवर्जून नमूद केले होते. विशेष म्हणजे त्यावेळेस वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यावरून असे स्पष्ट होते की,नाईक साहेबांनी राज्यात जे जे निर्णय घेतले ते सर्व देशाने स्वीकारले व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याची दखल घेतली गेली. नाईक समितीने सुचविलेली पंचायत राज व्यवस्था देशाने स्वीकारली. नाईक साहेब म्हणजे नियतीने जाणीवपूर्वक घडविलेले व राज्याला पडलेले एक विलोभनीय स्वप्न होते.आज गोरगरिबांना निवासी घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य शासनाकडून केले जाते, शबरी आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल,पी एम आवास योजना असेल! पण १९६९-७०मध्ये औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीत सर्वप्रथम महाराष्ट्रात दुर्बल घटकातील लोकांना २०,०००घरे बांधून देण्याचा कोणी निर्णय केला असेल तर ते होते मुख्यमंत्री वसंतराव नाईक!म्हणून विचारवंतांच्या चरित्रात व चारित्र्यात कांही शाश्वत मूल्ये आणि पुरोगामी आशय आढळून येतात म्हणूनच ते राष्ट्राचे प्रेरणास्थान व समाजाच्या अस्मितेचे मानबिंदू ठरतात. त्यांनी सार्वजनिक व सामुहिक जीवन अधिक परिपक्व, सहिष्णु व मानवतावादी व्हावे यादृष्टीने सरळ सोप्या भाषेत तत्वज्ञानाची मांडणी केली आहे. म्हणून ते समाजाचे दीपस्तंभ ठरतात. आभूषण प्रिय असलेल्या बंजारा महिलांचा सौभाग्य अलंकार, हस्तभर बांगडया, डोक्यावरील शिंगे समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीने काढावयास लावली, त्याची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या परिवारापासून झाली. पेहेराव परिवर्तनाच्या या घटनेने परिवर्तन स्वीकारण्याची मानसिकता बंजारा समाजात तयार झाली.त्याचा परिणाम असा झाला की, सामाजिक अभिसरण वेगाने घडून आले. जातिजाती मध्ये सलोखा व सौदार्हपुर्ण संबंध स्थापित झाले. असे आव्हानात्मक परिवर्तन घडवून आणणे ही साधी सुलभ घटना नाही, त्याच्या मागे दूरदृष्टी होती हे आपण समजुन घेतले पाहिजे.महिलांच्या हस्तभर बांगडया जावून मनगटावर घड्याळ व हातात पुस्तक व लॅपटॉप येणे यामागे नवमतांची मांडणी करणारे चेहरे, रुढीवादी विचारांना धक्के देणारे साहस आहे,म्हणूनच बंजारा समाज शिक्षणाच्या प्रवाहात गतीने पुढे आल्याचे चित्र निर्माण होवू शकले.मुलींना १२ पर्यंतचे मोफत शिक्षण हा सुधाकरराव नाईक यांनी घेतलेला निर्णय नाईक साहेबांच्या धोरणाला शक्ती देणारा निर्णय होता, हे आपल्या ध्यानात येईलच.त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात मुलींना झाला व अनेक कर्तृत्ववान मुली उच्च शिक्षित होवून नोकरीच्या विविध आस्थापनेवर विराजमान झाल्या.भटक्या विमुक्तांच्या  आश्रमशाळा,वसतिगृहे,अनेक शिक्षण संस्थांना मुख्यमंत्री निधीतून मदत व विशेष बाब म्हणून शाळा महाविद्यालय सुरू करण्यासाठीची शासनाची परवानगी प्रदान केली.धारणीचे ज्ञानेश्वर चंद्रभान भिसे आजचे मेळघाट महर्षी नानासाहेब भिसे यांना विशेष बाब म्हणून महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली. १४ जुलै १९७४ रोजी कुसुमकोट धारणी येथे महाविद्यालय सुरू झाले. मुख्यमंत्री निधींतून २५००० रुपये मदत सुद्धा नाईक साहेबांनी केली. वसंतराव नाईक साहेबांसारखा मुख्यमंत्री हजारो वर्षे होणार नाही असे१००वर्षाचे नानासाहेब भिसे यांनी माझ्याशी संवाद साधतांना उद्गार काढले होते.त्यामुळे महाराष्ट्रात विमुक्त भटके प्रवर्गातून अनेक संस्थाचालक उदयास आले. या सर्वांचे राज्यस्तरीय "विमुक्त जाती शिक्षण महामंडळ"निर्माण करून नाईक साहेबांच्या कार्याची"कर्तृत्व शिल्पे"उभी करता येतील व विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी सांघिक प्रयत्नाचा नवा मार्ग निर्माण करता येवू शकेल,या महामंडळा मार्फत समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे कोचिंग वर्ग सुरू केल्यास अनेकांना शासकीय सेवेत जाण्याची संधी निर्माण होवू शकणार आहे.हा विचार कठीण वाटत असला तरी अशक्य मात्र मुळीच नाही. शाळा महाविद्यालये"पब्लिक स्कुल"या दर्जाची व्हावीत, म्हणूनच मान्यता देतांना"पाप करू नका"असे सुधाकरराव नाईक सांगायचे कारण नाईक साहेबांचा शिक्षण व व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पवित्र होता.वसंतराव नाईक साहेबांच्या चिंतनाचा, संशोधनाचा व दूरदृष्टीचा हाच मुख्य गाभा आहे.राजस्थान मधील जयपूर जवळील सांभर येथील दरबार हायर सेकंडरी शाळेच्या प्रांगणात आयोजित  बंजारा मेळाव्यात नाईक साहेबांनी शिक्षणावर आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, "अपने बच्चो को खूब पढावो-लिखावो, यह मत समझो, मेरा बेटा रोज दो रुपये कमा रहा है!उसे पढा लिखाकर योग्य बनावो!बडा होकर वह बिस रुपये कमायेगा !सरकारी योजनाओका लाभ उठावॊ!राजाओके राज चले गये है!वोट की किमत पहचानो!बाल मजदूर, बालविवाह और मृत्यु भोजन बंद करो!"मृत्यूनंतर पंगती उठवण्यापेक्षा हा खर्च शिक्षण व शेतीकडे वळविला तर घरात समृद्धी येईल. वसंतराव नाईक साहेबांचे हे विचार मौलिक तर आहेतच पण चीर स्वरूप व त्रिकाला बाधित सत्य आहेत.या कार्यक्रमास रामसिंगजी भानावत,अजमेरचे मदनसिंग चौहान, खड्गसिंग गोराम, बाघसिंग सोळंकी सुद्धा उपस्थित होते.आपण या विचाराचे प्रवासी होऊन वाटचाल करणे आवश्यक आहे असे वाटते. अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती विरुद्ध लढणारे विचार कालांतराने पुर्ण सत्य म्हणून मान्यता पावले कारण या विचारांना  माणुसकीचे उबदार अस्तर होते. प्रत्येक महापुरुषाला काळानेच घडविले नव्हे तर प्रत्येक महापुरुषाने आपला काळही घडविला आहे,अनेक व्यक्तींनी समाजातील दोष काढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली त्यात वसंतराव नाईक साहेब मला अधिक ठळकपणे दिसतात.माती व पाणी यावर जीवापाड प्रेम करणारा, मानवतेने ओतपोत भरलेल्या या महापुरुषाला,त्यांच्या कार्याला साहित्य क्षेत्राने अधिक उजागर करावे,वसंतवादी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गोर बंजारा साहित्य संघ हे कार्य करत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या मातीत रुजलेले कर्तृत्वाचे "वसंत कण" वेचून, शब्दबद्ध करून येणाऱ्या पिढ्यांसमोर दस्तऐवज म्हणून प्रकर्षाने मांडावेत.येणाऱ्या पिढ्यांना हा महान भाग्यविधाता या अवनितलावर होवून गेला यावर विश्वास बसणार नाही,एवढे उत्तुंग कार्य नाईक साहेबांनी केले आहे. २०१३या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या धोरणाला, संकल्पनेला व निर्णयाला मूर्त रूप देण्यासाठी आपण कटिबद्ध होवू या!साहित्य चळवळ समाजाला दिशा देण्याचे एक सशक्त व्यासपीठ आहे.संघटना समाजाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरील आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधत असतात तर लोकप्रतिनिधी सभागृहात लढण्यासाठी समाजाचा आवाज बनत असतात. मात्र साहित्य हे नवे विचार,नव्या संकल्पना, नवी मते, समाजात पेरतात म्हणून समाज वैचारीकदृष्ट्या अधिक प्रगल्भ होत असतो.साहित्य हे"थिंक टॅंक" तर साहित्यिक हा समाजाचा आरसा व आसूड असतो.समाजाचे खरे प्रतिबिंब त्याच्या लेखणीतून प्रकटते.आनंद, दुःख, विनोद, मनोरंजन, प्रवास वर्णन, आत्मकथन, मनोराज्य इत्यादींमधून व्यक्तींचे भावविश्व लेखणीने तो साकारत असतो त्यामुळे समाजाच्या परिवर्तनाची स्पंदने जाणवतात."पुढच्यास ठेच, मागचा शहाणा"या युक्तीने आपण ठेचा खातच चाललो तर आपला अंगठा व पायाची बोटे तरी सुरक्षित कशी राहणार!म्हणून आपल्या महानायकांनी व समाज सुधारकांच्या पहिल्या पिढीने खस्ता खावून समाजासाठी आडवळणाचा व खाचाखळग्याचा जो मार्ग होता त्याला सरळ व सुकर बनविला आहे, त्या मार्गावरून जाण्यातच समाजाची प्रगती व उज्ज्वल भविष्य आहे असे मला वाटते. संकटे येतील,जिवाच्या आकांताने मुसळधार पाऊस कोसळेल, सडक थोडीफार वाहूनही जाईल पण"भराव"टाकण्याचे काम अविश्रांत चालले पाहिजे. एक गेला की, दुसऱ्याने हे काम हाती घ्यावे. अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघाने हे आव्हान आलिंगन म्हणून स्वीकारले आहे त्यामुळे साहित्य संघ आर्थिक दृष्ट्या सशक्त व्हावा, त्यासाठी राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून किमान पाच क्रियाशील साहित्यिक किमान वार्षिक सदस्य शुल्क घेवून सहभागी करून घ्यावे लागतील कारण आर्थिक ताकदी शिवाय पुढे जाणे असंभव आहे. माझ्यासारख्या एका लहान माणसाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संधी दिली याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे.विशेषतः मनोहर भाऊ चव्हाण यांनी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधून साहित्य संमेलनाबाबत अवगत केले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो व अंतःकरण पूर्वक आभार मानतो.पुनश्च आपले सर्वांचे आभार मानून मी माझे अध्यक्षीय भाषण संपवितो.

जय वसंत!


प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला


Post a Comment

1 Comments