Subscribe Us

आंतरराष्ट्रीय 'बंजारा' दिनाच्या निमित्ताने....!


 वाते मुंगा मोलारी

                my swan song


आंतरराष्ट्रीय 'बंजारा' दिनाच्या निमित्ताने....!


आजही जिप्सी बंजारा भटकतो आहे तर भारतीय गोरमाटी संविधानिक ओळखी पासून वंचित आहे..!


'बंजारा'गानप्रिय रानोमाळ भटकणारा हाच अर्थ अरबी फारसी भाषेलाही अभिप्रेत आहे'


तारा तेरा मेरा नही गुजारा..

तु ठहरी घरवाली मै ठहरा बंजारा..!


तेरी बंजारन रास्ता देखे.. कब आएगा मेरे बंजारे...!

  बंजारा हे नाव गोरमाटी गण समाजाला कावेबाज मुघलांनी दिलेले आहे आणि तो 'बंजारा'या उच्चाराला सार्थक आहे. गोरमाटी गण समाज बंजारा या नावाने कधीच आपली ओळख देत नाही. 

 जिप्सी,बंजारा,लमाणी,लंबानी,लंबाडी,सुगाली अशा विविध नावांनी जगभर प्रचलित असलेला गोरमाटी भाषिक गण समाज हा भटका कसा? 

           सिंधू संस्कृतीतील या गोरमाटी गण समाजाची 'समाज रचना'लक्षात घेता या गण समाजाला वसाहतवाद्यांनी सिंधू संस्कृतीतून हाकलून लावून यांना 'भटके'केले,मूळात हा गण समाज भटका नाहीच. 

            इंग्रजांनी तर स्वातंत्र्यासाठी बंड पुकारणाऱ्या  गोरमाटी गण समाजाला चोर गुन्हेगार ठरवून एका गावात तिन दिवसा पेक्षा जास्त दिवस  थांबता येऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली. दाखल्याशिवाय यांना फिरता येत नसे.जंगल कायदा करून जंगलातूनही यांना हुसकून लावले.आपल्या साम्राज्याला धोका पोहोचू नये यासाठी आखलेली ही कुटनिती होती. 

              सिंधू संस्कृतीच्या पतनानंतर चंद्रगुप्त मौर्य काळात या लोक गणांचा लदेणी व्यवसाय भरभराटीला आलेला असला तरी कांही तांडे स्थिर होऊ पाहत होते.सिंधू संस्कृतीत शेती आणि व्यापार ही उदीम व्यवस्था गोरमाटी गण समाजांच्या अदिन होती. 

           इंग्रजांच्या राजवटीत यांच्या लदेणी व्यवसायावर गदा आली.या लोकगणांना जगणे मुस्कील झाले. 

        इंग्रजा विरुद्ध बंडाळी करणाऱ्या या गण समाजाच्या देशनिष्ठेची दखल न घेता इथल्या राज्य कर्त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 'विमुक्त/भटक्या'या असंवैधानिक प्रवर्गात ढकलण्याचे षडयंत्र रचून या लोक गणांचे मूळत्व नाकारले. 

         हरप्पा पतनानंतर विखुरलेला हा गण समाज पुन्हा स्थिर होऊ पाहत होता.शेतीसाठी योग्य ठिकाण तांडे शोधत होते. वसाहतवाद्यांनी यांना स्थिर होऊ दिले नाही.जरकीन (जरकणी) नायकणच्या तांड्यावर 'बंजारा,बंजारा'म्हणत दगडफेक करून तिचा तांडा हुसकावून लावल्याचे विदारक सत्य गोर्की यांनी आपल्या 'मेरा बचपन' या हिंदी आवृतीच्या  आत्मकथनात नमूद केलेले आहे.वाजणा गीताचा नायक भोजीया आणि नंतरच्या काळातील सामतदादा,रामचंदसात,मीटू भूकीया,ठाणू नायक असे अनेक वेराळू वसाहतवाद्यांचे (साम्राज्यवादाचे) बळी ठरले.


सीता बरडी रक् भोजीयारी बेसका...!


सीता बरडीच्या परिसरात (सीता > पशुचे पालनपोषण करणारी गोरमाटी भाषिक गण समाजाची सिंधू संस्कृतीतील देवता/सीताबर्डी > नागपूर. )भोजीया स्थायी होऊ पाहत होता,वसाहतवाद्यांनी (साम्राज्यवाद्यांनी)त्याला हुसकावून लावले.'पेली लडायी,दुसरी लडायी'असे इतिहासपूर्व काळातील लढाईचे् स्पष्ट संकेत 'वाजणा'नावाच्या साहित्यातून मिळतात.

          भटक्या विमुक्त या नावाने आरक्षणाचा फायदा घेताना आम्हाला जराही लाज वाटत नाही. अजूनही आम्हाला  अस्मिता व अस्तित्वाची जाणीव झालेली नाही किंवा होऊ दिली नाही.'राज लायेर छ'अशी बिन बुडाची पोकळ वल्गना आमचे नेते जेते करताना दिसतात ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

         'राज लायेरो'म्हणजे लोक संखेच्या प्रमाणात राजकीय सत्तेत भागिदारी असा अर्थ अभिप्रेत आहे.'अनुसूचित जमात'हे संविधानीक पासवर्ड जवळ असल्याशिवाय लोक संख्येच्या प्रमाणात सत्तेत भागिदारी मिळणे अशक्य आहे.याची जाणीव असताना गोरमाटी गण समाजाच्या चळवळींनी या मूलभूत हक्काकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केलेले दिसते.

              काहींना धर्म सत्तेच्या नावाखाली तर काहींना संघटनेच्या बळावर तर काहींना विविध राजकीय पक्षाच्या दयाबुद्धीवर अश्रीत राहून आपला राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा आहे.हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. 

            सत्ता,संपत्ती आणि प्रतिष्ठेतील आपली मक्तेदारी धोक्यात येऊ नये याची घेतलेली ही काळजी होय.

        स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटली तरी गोरमाटी भाषक गण समाजाला केंद्र सरकारच्या मंत्री मंडळात एकदाही स्थान मिळालेलं नाही. (अपवाद फक्त पि.बलराम अर्धा मंत्री),पुढेही मिळणार नाही. 

             या देशाचा नेटिव्ह सन्स असलेला गोरमाटी गण समाज हा संविधानिक ओळखी पासून वंचित ठरतोय.ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. 

               परकीयांच्या सत्ते प्रमाणे स्वकीयांच्या सत्तेतही  गोरमाटी भाषिक गण समाज अपराधी भावनांचा शिकार ठरलांय... 

          स्वातंत्र्य,समता,बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही मूल्य व्यवस्था जोपासणाऱ्या  प्रजासत्ताक गण राज्यात या लोक गणांना ताठ मानेने जगण्याची संधी मिळेल कधी? 

         याची तांडा वाट पाहतो आहे. 

           जो पर्यंत या गोरमाटी भाषिक गण समाजाला या देशाचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून वागणूक मिळणार नाही तो पर्यंत या लोक गणांच्या मातृभाषेचे अस्तित्व धोक्यात राहणार आहे.ही वास्तविकता नाकारता येणे शक्य नाही.

              तांडा हा साम्राज्यवादी,वर्चस्ववादी मुळीच नाही,तांड्याची स्वतंत्र अशी लोकशाही पद्धतीची समांतर शासन व्यवस्था आहे. ही गण जीवनशैली आज नामशेष झालेली आहे. 

          प्रत्येकाला आपली संस्कृती/धाटी आणि मातृभाषा जतन करून ठेवण्याचा संविधानिक हक्क आसताना या मूलभूत हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढण्यासाठी समाज सिद्ध होऊ शकला नाही किंवा या गण समाजाचे नेते यांना सिद्ध होऊ देत नाही हे या समाजाचे मोठे दुर्दैव होय. 

              आपली अस्मिता,अस्तित्व आणि ऑयडिलाॅजी हरवून बसलेल्या गोरमाटी भाषिक गण समाजला आपल्या मूलभूत हक्कासाठी एका धोळो झेंड्याखाली संघटीत करणे आवश्यक आहे..!! 

         याशिवाय आता पर्याय नाही..... 

               लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या नंतर राष्ट्रीय पातळीवर गोरमाटी भाषिक गण समाजाचे महा अधिवेशन घेऊन राष्ट्रीय पातळीवर एक लिपी,एक भाषा,जात आणि धर्माचा एक नामकरणाचा डाटा (गोरमाटी)निश्चित करून जात,भाषा,धर्म निहाय जनगणना घेण्यास सरकारडे मागणी करणे आवश्यक आहे,त्याशिवाय गोरमाटी भाषिक गण समाजाला आणि त्यांच्या मातृभाषेला संविधानिक ओळख मिळणार नाही..!! 

            गोरमाटी भाषिक गण समाज हा राष्ट्रीय पातळीवर 'एक भाषिक गण समाज'असताना २०११च्या खानेसुमारीत हिंदी भाषेची पोट भाषा म्हणून बंजारी,लमानी,लंबाडी,लभानी अशी मातृभाषा म्हणून हिंदी भाषेच्या शेड्युल्ड मध्ये

नोंद झालेली आहे.आणि एके ठिकाणी कोकणी भाषेच्या रकान्यात मातृभाषा म्हणून 'गोर बोली'ची नोंद झालेली आढळते.एकंदरीत गोरमाटी भाषेचे स्वतंत्र संख्यांक अस्तित्व खानेसुमारीत नाकारण्यात आलेला आहे. 

          राष्ट्रीय पातळीवर गोरमाटी भाषिक गण समाजाची लोकसंख्या १५ करोडच्या आसपास असताना २०११ च्या खानेसुमारीत बंजारी,लमानी,लंबाडी,लभानी, गोर बोली अशा नावाखाली फक्त  50,79065 (पन्नास लाख एकोनांशी हजार पासष्ट)इतकी गोरमाटी भाषिकांची नोंद झालेली आहे.बाकी गोरमाटी भाषिक गण समाज गेला कुठे?हा प्रश्न उपस्थित होतो. 

     तरी गोरमाटी भाषिक गण समाज 'उपर बोले बाबडीया;तोनं कू आवं घेरी नींद..?'

      अशा अवस्थेत जगतो आहे.. 

           सद्यस्थितीतील पारंपरिक राजकीय चळवळीतून संसदेत जाणारे दोन च्यार खासदार गोरमाटी भाषिक गण समाजाच्या अस्तित्वाला आणि गोरमाटी भाषेला संविधानिक ओळख मिळवून देण्यास असमर्थ ठरणार आहे,हे उघड आहे... 

       बोली भाषेला भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी घटनेत कोणतेही निकष किंवा अट असल्याचे आढळत नाही. 

        सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक प्रभावाने बोली भाषेला भाषेचा दर्जा मिळविता येतो.हा कोकणी भाषेचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून,गोरमाटी भाषेला घटनात्मक संरक्षण मिळविण्यासाठी या गण समाजाचे सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात वर्चस्व निर्माण होणे आवश्यक आहे..! 


उठा जागे व्हा...


           सद्यस्थितीतील प्रचलित असलेली गोरमाटी भाषिक गण समाजातील पारंपरिक राजकीय चळवळ गोरमाटी भाषिक गण समाजाला आणि त्यांच्या मातृभाषेला संविधानिक ओळख मिळवून देण्यास असमर्थ ठरणार असून,गोरमाटी भाषिक गण समाज पुन्हा ७७ वर्ष मागे जाणार...येवढे मात्र खरे...!!! 



               भीमणीपुत्र

       मोहन गणुजी नायक

Post a Comment

0 Comments