Subscribe Us

राखेतून जन्मलेला फिनिक्स पक्षी अर्थात कथा सुदी गावाची*


 (अनटोल्ड वसंतराव नाईक)

राखेतून जन्मलेला फिनिक्स पक्षी अर्थात कथा सुदी गावाची

बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!

ही कथा नव्हे तर इतिहास घडविणाऱ्या सुदी गावाची!पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील व आता वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील सुदी गावाने घडविलेल्या पाणीदार पराक्रमाची!

"भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्य कडा!गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा!

दारिद्र्य, अज्ञान व पाचवीलाच पुजलेली गरीबी पण कांहीतरी चांगले व उदात्त घडविण्याची उर्मी मनात बाळगुन असलेली इथली माणसं!आणि याच माणसांनी लिहिला सुदी गावाचा इतिहास व वर्तमान!आळीपाळीने व एकमेकांचा आसरा घेवुन उभी असलेली गवत व सनकाडीने शाकारलेली झोपडीवजा १०० ते१२५ घरे बंजारा, पारधी बहुल वस्ती म्हणजे सुदी हे महाराष्ट्राच्या नकाशावरील गांव. गावात जायला धड रस्ता नाही. पांदण रस्ते. अनसिंग दहा की मी वरील ग्रामीण बाजारपेठ!पण इथली माणसं अपार कष्ट करणारी व मनानं, विचारानं समृद्ध व श्रीमंत अशीच होती. बदलाची स्वप्न पाहणारी व त्या दिशेने जाण्यासाठी धडपडणारी माणसं इथलं खरं ऊर्जास्त्रोत ठरलं आहे. अनेक पिढ्यांना पुरेल एवढा ऊर्जासाठा त्यांनी निर्माण करुन ठेवल्याचे जाणवते आहे. प्रेम, परस्पर सहकार्य, सांघिक भावना,गावातील वाद स्थानिक पातळीवर सलोख्याने मिटविणारी न्याय पंचायत व्यवस्था, घामाची फुले होतात ही इच्छा शक्ती व यावर ठाम निष्ठा हे सुदी खेडे वजा गावाचे अलंकार असल्याचे जाणवते.पण ५ मे १९८८ ह्या दिवशी सुदी गावावर काळाची अवकृपा झाली, सोसाट्याचा वारा सुटला या वावटळीत विद्युत तारांचे घर्षण होवून भर दुपारी आग लागली, क्षणातच आगीने अवघे गाव कवेत घेतले. जिवाच्या आकांताने लोक सुरक्षित दिशेने अंगावरील कपड्यांनिशी धावत सुटले.११० घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आक्रोश, गुराढोरांचे तडफडने सगळे मन हेलावून सोडणारे दृश्य!पंचक्रोशीतील मदतीसाठी धावणारे माणसांचे लोंढे, चहुकडून माणसांच्या गर्दीचा ओघ सुरूच होता. ज्यांनी आपले सर्वस्व गमावले ते अश्रू भरल्या डोळ्यांनी हताशपणे धगधगत्या ढिगाऱ्यांकडे केविलवाणी नजरेने पाहत होते. चिल्यापाल्यानी आपल्या आईवडिलांच्या कुशीत भयभीतपणे आश्रय घेतला होता.पैसा अडका, धान्य व कपडेलत्ते सर्वकाही गमावले होते. नवा संसार उभा करावा लागणार होता, इथली माणसं जरूर खचली होती पण धैर्य व आत्मविश्वास ढळला नव्हता. "कॉमन डेंजर मोल्डस अ कॉमन फिलॉसॉफी"सामुहिक संकटातून त्यांनी समूहाच्या एकीचे तत्वज्ञान शोधले व परस्परांच्या सहकार्याने गावाची नव्याने, एकजुटीने बांधणी केली. गावाची उभारणी करत असतांनाच मनेही जोडली.

१९७० साली राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सुदी या खेड्याला भेट दिली. रावसाहेब राजूरकर गोविंदराव सरनाईक, रामराव झनक, वाशीमचे राठीजी, कुसुमताई सरनाईक,कृषीशास्त्रज्ञ शेषराव बढे,कवरदरीचे वसंतराव राठोड,सुखलाल जाधव, पांडु नाईक व तत्कालीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व परिसरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. पाच हजारावर जनसमुदाय होता. रिधोरा येथुन दमनीने ते राजुरा मार्गे सुदीला पोहचले. राजुरा येथे रावसाहेब राजूरकर यांनी भव्य स्वागत केले. जयराम नाईक वडते धुरकरी होते. दमणीच्या बैलांना सजविण्यात आले होते. रस्त्यावरील गावागावातुन आलेल्या लोकांचे अभिवादन व स्वागत स्वीकारत नाईक साहेब सभास्थळी पोहचले. जोधु नाईक, सवजी कारभारी, शंकर भोयर, महादनी भोयर, मेराम नाईक, सवाई नाईक, हरिदास जाधव यांनी नाईक साहेबांचे स्वागत केले. राजुरा राव,पिपलवाडी,खैरखेडा, अनसिंग व परिसरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.मुख्यमंत्री यांची भेट असल्याने शासकीय यंत्रणेतील अधिकारी यांचीही उपस्थिती होती पण आजच्या सारखी सिक्युरिटी व पोलिसांचा राबता नव्हता. सामान्य माणूस सुद्धा नाईक साहेबांपर्यंत पोहोचून आपले गाऱ्हाणे मांडत होता.खेड्यातील मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून नाईक साहेबांनी प्राथमिक शाळा सुरू करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत असे संबंधित यंत्रनेस सांगुन तुम्ही मुलाबाळांना शिक्षण द्या, व्यसनापासून अलिप्त रहा, एक संघ भावनेने रहा, रोजगार हमी योजनेतून सर्वाना काम दिले जाईल,दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांना धान्य वितरित केले जात आहे. कष्ट करून अधिक धान्य पिकवा,विवाह,मृत्यु भोजन यावर अधिक खर्च न करता सामुहिक विवाहात मुलामुलींचे विवाह करा,अंधश्रद्धेच्या आहारी जावु नका. महाराष्ट्र सरकार तुमच्या अडीअडचणीत सर्वोतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे, हिम्मत हारु नका हे सांगण्यासाठी व तुमच्या समस्या समजुन घेण्यासाठी मी तुमच्या पर्यंत आलो आहे. आज सुदी गावात चार पाझर तलाव व वसंत सागर याची ग्वाही देत आहे. उपसा जल सिंचना द्वारे दोन ते अडीच हजार एकर जमीन पाण्याखाली आली आहे. शेतकऱ्यांनी दुबार तिबार पिके घेवून जीवनमान उंचावले आहे. गावातील मुले मुली शिकुन नोकरीच्या निमित्ताने मुंबई, नागपूर,पुणे,दुबई सारख्या शहरात स्थिरावली आहेत. गावाने चेहरामोहरा बदलला आहे. डांबरी रस्ता होवून वाहने धावू लागली आहेत. जयराम नाईक वडते या अशिक्षित माणसाने सुदी-अनसिंग गट ग्रामपंचायतचे अविरोध सरपंच होण्याचा बहुमान मिळविला. गाव व लोकांच्या गरजा ओळखुन शासनाच्या योजना राबविल्या. पुढे त्यांच्याच परिवारातील श्रावण जाधव शिक्षक म्हणून जिल्हापरिषद शाळेत रूजू झाले. समाजसेवेचे संस्कार आजोबाकडून मिळालेले असल्याने त्यांच्या धर्मपत्नी कामिनी श्रावण जाधव १९९७ ते २०१२ पर्यंत १५ वर्षे अविरोध सरपंच पदावर विराजमान राहिल्या व गावाला जिल्ह्यात ओळख निर्माण करुन गाव पाणीदार केले.निर्मल ग्राम योजनेत उत्कृष्टपणे काम केल्यामुळे महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.महात्मा गांधी तंटामुक्तअभियानातून या खेड्याने आताच्या वाशिम जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करुन २५ जोडपे अत्यल्प खर्चात विवाहबद्ध झाले.देवादिकांच्या नावावर गावात सामुहिक बोकड बळी प्रथा बंद करण्यात येवुन खिरपुरीचा मिष्ठान्न नैवेद्य देण्याची परंपरा निर्माण केली आहे.सुदीच्या दहा-बारा घरे असलेल्या दत्तनगर या नव्या वसाहतीत नव्याने जिल्हापरिषद प्राथमिक शाळा सुरू केली आहे.गावात महिला सांस्कृतिक मंडळ असुन त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल सह्याद्री वाहिनीने घेवुन अवघ्या महाराष्ट्राला सुदी (सिद्धेश्वरगड) गावाची ओळख करून दिली आहे. युवक मंडळ, ज्येष्ठ नागरिकांचा गप्पागोष्टी कट्टा,भजन मंडळ यांचे माध्यमातुन सामुहिक कार्यक्रम आयोजित केले जातात.जयराम नाईक वडते यांना नाईक साहेबांशी कांही घटिके पुरता सहवास लाभला,लोखंड या धातूला परीसाचा स्पर्श होवुन त्याचे सोने व्हावे तसेच या परिवाराचे भाग्य उदयास आले आहे. श्रावण कनिराम जाधव या ध्येयवेड्या शिक्षकाने आजोबांकडुन मिळालेले संस्कार व नाईक साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीत वसंत विचारांची बीजे पेरण्याचे काम निष्ठेने सुरू केले आहे, त्याचा अभिमान वाटतो. कोणे एके काळी राख होवून पडलेल्या घराची व अख्ख्या गावाची कहाणी आजही चर्चेत असतांना राखेतून फिनिक्स पक्षाने जन्म घेवुन भरारी घ्यावी अशी थक्क करणारी कहाणी वसंत विचारात असल्याचे सांगत श्रावण कनिराम जाधव हा ध्येयवेडा शिक्षक गावोगावी आपल्या कवणाद्वारे गात फिरतांना दिसतो.माझी बांधिलकी माझ्या जन्मभूमीशी तर आहेच पण ज्या समाजात मी जन्म घेतला त्याचेही मला देणे लागते. तुम्हाला मोठी मोठी शहरे आकर्षित करत असतील, निसर्गरम्य डोंगर तुम्हाला खुणावत असतीलही पण डोंगर कपारीत लपलेले अडवळणावरचे माझ्या सुदी गावाने मला मोहिनी घातली आहे. म्हणून"भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्य कडा!

गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पुजिन रायगडा ! ह्या गीतांच्या ओळी मुखात येतात.

माझ्या सुदी अर्थात  "सिद्धेश्वरगड" गावाला वसंतराव नाईक यांच्या विचारातील गाव  बनविण्याचा ध्यास घेतलेल्या या कर्मठ कविवर्य प्रबोधनकार श्रावण कनिराम जाधव या शिक्षकाच्या संवादातून जाणवले आहे.कविवर्य श्रावण भारावले होते व सारा वृत्तांत कथन करत होते.आज कांही लोक या घटनेचे साक्षीदार आहेत, अनेक काळाच्या पडद्याआड गेली आहेत पण नाईक साहेबांनी पेरलेले व अंकुरलेले विचारांचे बीज आज डौलदारपणे मातीला घट्ट पकडून ताठ मानेने उभे राहिले आहे.हिरवा शालु नेसलेल्या नव परिणतेला प्राणसख्या पतीने आपल्या बाईक गाडीवर बसवुन उभयतांनी वसंत जलाशयाचे विहंगम दृश्य व हा परिसर जरुर न्याहाळावा व हवेलीतील झोपाळ्यावर बसुन कृषिक्रांतीच्या वसंत युगंधराचे गीत गावे.अन धरणी मातेच्या पोटी पुन्हा हिरवे स्वप्न फुलावे.

प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला 

(लेखक ख्यातनाम वक्ते व अनटोल्ड वसंतराव नाईक या स्तंभ सदरचे प्रस्तुतकर्ते आहेत)


Post a Comment

0 Comments