Subscribe Us

आयुस्य जगतांना



आयुष्य जगताना’ विषयी दोन शब्द..

डॉ. सुभाष राठोड, पुणे

   *‘आयुष्य जगताना’* ही आत्मकथनपर कादंबरी म्हणजे बंजारा तांड्यावर जन्मलेल्या, आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या शिवाजी जाधव नावाच्या एका उमद्या नवयुवकाची यशोगाथा आहे. मराठी कथा, कविता, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णने याबरोबरच आत्मचरित्र, आत्मकथन या साहित्य प्रकारानेही मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. आत्मकथन लिहिणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत असते. लेखकाचे हे आत्मपरीक्षण असते. अंतर्मुख होऊन लेखकाने घेतलेला अंतर्मनाचा ठाव, स्वतःचा शोध असतो. मानवी जीवनाकडे वळून पाहिल्यास असे दिसते की, माणसाला स्वतःच्या बालपणाच्या व ऩंतरच्या काळातील आठवणी कधीतरी येतच असतात. काही कडू असतात तर काही सुखावणाऱ्या असतात. त्या आठवणी इतरांना सांगताना मनुष्य पुन्हा त्या काळात हरवून जातो. संवेदनशील माणसाच्या बाबतीत हा प्रकार अधिक प्रमाणात व वारंवार घडतो. मनुष्य आपल्या गतकाळाचे सिंहावलोकन करुन या आठवणी जिवंत करण्याच्या प्रयत्नातूनच आत्मचरित्र, आत्मकथन जन्माला येते. 

     स्वातंत्र्योत्तर काळात साहित्यिक, संगितकार, चित्रपट कलावंत, तरुण, राजकीय नेते, नवतरुण, सनदी अधिकारी इत्यादींनी आत्मचरित्रे लिहिलेली पाहायला मिळतात. स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खूली झाली. सर्वसामान्य वर्गातील तरुण वर्ग उच्च शिक्षण घेऊ लागला, नोकऱ्या करु लागला. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या वाट्याला आलेले खडतर जीणे साहित्यातून मांडू लागला. विशेषतः १९६० नंतर कथा, कविता, कादंबरी, नाटक या साहित्य इ. प्रकारासोबतच दलित आत्मकथनाचे दालन समृद्ध झालेले दिसते. गावकुसाबाहेर राहणाऱ्या उपेक्षित, भटक्या जाती – जमातीतील तरूण लेखकानी साधारणतः तारुण्याच्या उंबरठ्यावर, आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ही आत्मकथने लिहिलेली दिसून येतात. यात विशेषतः ‘तराळ – अंतराळ' – शंकरराव  खरात, ‘बलुतं’ – द्या पवार, ‘उचल्या’ – लक्ष्मण गायकवाड, ‘उपरा’ – लक्ष्मण  माने, ‘काट्यावरची पोटं’ – उत्तम  बंडू तुपे, ‘आठवणींचे पक्षी’ – प्र. ई. सोनकांबळे, ‘अक्करमाशी' – शरणकुमार  लिंबाळे, ‘कोल्हाट्याचं पोर' – किरण शांताबाई काळे, ‘बिराड' – अशोक  पवार इत्यादी आत्मकथनाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ही आत्मकथने वाचणीय व वाचकांना अंतर्मुख करणारी आहेत. 

   नेमका हाच धागा पकडून गोर बंजारा समाजातील काही मान्यवर साहित्यिकांनी सुद्धा खास बंजारा स्टाईलने आपली आत्मकथने लिहिलेली आहेत. यात विशेषतः ‘तांडा’ – आत्माराम राठोड, ‘याडी’- पंजाब चव्हाण, ‘गोठण’- रावजी राठोड, ‘लदेणी' – नामदेव चव्हाण, ‘वादळवाट'- नामदेव राठोड, ‘अंधारयात्रीचे स्वप्न’ – राजाराम जाधव (तसेच प्रा. डॉ. वसंत राठोड यांचे नुकतेच प्रकाशित झालेले 'कल्लोळ') इत्यादी ही सर्व आत्मकथने वाचनीय व वाचकाला अंतर्मुख करणारी आहेत.

   नुकतेच प्रकाशित होत असलेल्या शिवाजी जाधव या़ंच्या ' आयुष्य जगताना' या आत्मकथनाच्या रुपाने मराठी आत्मकथनाच्या दालनात मोलाची भरच पडेल, यात यत्किंचितही शंका नाही ! कोरोना काळातील लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग करुन शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य जगताना' या आत्मकथनात एकूण ३१ प्रकरणे असून आपल्या जीवनप्रवासातील विविध घटना, प्रसंग, क्षण आपल्या या आत्मकथनात मांडलेले आहेत. श्री. शिवाजी जाधव यांनी आपल्या जन्मापासून ते सेवेत रुजू होईपर्यंचा संपूर्ण जीवनपट यात मांडलेला आहे. आपल्या आईं – वडिलांच्या, आजी - आजोबांच्या व ताईंच्या विविध आठवणी या आत्मकथनात मांडलेल्या आहेत. हे आत्मकथन म्हणजे बंजारा समाजातील नवतरुणांनाच नव्हे तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या समस्त नवतरुणांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरावे असे आत्मकथन आहे. ध्येयाचा पाठलाग करताना आपले पाय परिस्थितीच्या खडतर रस्त्यावरून चालताना रक्ताळले तरी थांबायचे नाही, आपल्या प्रयत्नांचा प्रवास अविरतपणे चालू असला पाहिजे, हा मोलाचा संदेश लेखकाने या आत्मकथनातून नवीन पिढीला दिला आहे. लेखकाने आपले तांड्यावरील प्रारंभिक जीवन, बालपणीचे दिवस, शालेय जीवनातील विविध अनुभव, शिक्षकांनी केलेले संस्कार, बालपणीचे सवंगडी, एम.सी.सी, एन.सी.सी.चे अनुभव, शालेय जीवनात भाकरीच्या शोधार्थ आपल्या आई-वडिलांची झालेली ससेहोलपट, अशा विविध आठवणी अगदी सहजपणे वाचकांसमोर मांडलेल्या आहेत. 

   जीवन हे जसे सुंदर असते तेवढेच ते खडतरही असते. यशस्वी झालो की, सुंदर वाटते, परंतु जीवनात अपयश आले की, हेच जीवन भयानक खडतर वाटू लागते‌. बिकट परिस्थितीच्या जंगलातून सुद्धा आपल्या जिद्दीच्या, प्रयत्नांच्या जोरावर वाट काढता येते. इच्छा असेल तर आपणास त्यातून नक्की मार्ग सापडतो, हा सुंदर विचार शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य जगताना’ या आत्मकथनाच्या केंद्रस्थानी आहे.

    एखाद्या होतकरू विद्यार्थ्यांला ज्ञानाची भूक काय असते, हे आत्मकथन वाचल्यावर लक्षात आल्यावाचून राहत नाही‌. ‘असाध्य ते साध्य, करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे । ह्या संत तुकारामांच्या अभंगांच्या ओळी याबाबतीत तंतोतंत लागू पडतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या शिवाजी जाधव यांनी पुण्याच्या अनेक आठवणी लालित्यपूर्ण भाषेत आपल्या या आत्मकथनात मांडलेल्या आहेत. आयुष्याला कलाटणी देणारे पुणे, पुण्यातील स्पर्धा परीक्षा केंद्रावरील अॅडमिशनपासून ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास लेखकाने लालित्यपूर्ण भाषेत मांडलेला आहे. एखाद्या चित्रपटातील पटकथेप्रमाणे एक – एक क्षण वाचकांच्या डोळ्यांसमोर दृग्गोचर करण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रावर कमी शुल्कात प्रवेश मिळावा यासाठी केलेली धडपड, तेथे राहण्यासाठी कमी पैशात रुम कशी मिळेल यासाठी केलेली प्रयत्नांची शिकस्त, एका सायकल दुरुस्तीच्या दुकानातून घासाघीस करून सातशे रुपयाला विकत घेतलेली जुनी सायकल, पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीत प्रवेश मिळविण्यासाठी केलेली धडपड, तेथे भेटलेले जीवाला जीव देणारे जीवाभावाचे मित्र, स्वतःला अभ्यासात झोकून देऊन केलेली स्पर्धा परीक्षेची तयारी असे अनेक क्षण, प्रसंग इत्यादी हे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक युवकांना आपलेच अनुभव वाटावेत यांची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. पुण्याहून जेव्हा शिवाजीराव रत्नागिरीला महसूल सहाय्यक पदाची परीक्षा देण्यास जातात तेव्हा प्रवासातील केलेली निसर्गवर्णने वाचताना जणू आपण प्रवासवर्णन वाचल्याचा भास होतो. 

  आपण निवडलेल्या करिअरच्या क्षेत्राला अनेक पर्याय सुद्धा असणे गरजेचे आहे हा अभिनव विचार शिवाजी जाधव यांनी आपल्या या आत्मकथनात मांडलेला आहे. सध्याच्या युगात करिअरचा विचार करताना केवळ एकच पर्याय असता कामा नये. आपण आपल्या करिअरच्या ‘प्लॅन – ए’ मध्ये अयशस्वी ठरलो तर अपयशाने खचून न जाता 'प्लॅन – बी', ‘प्लॅन – सी’ अशा विविध पर्यायांचा सुद्धा आवर्जून विचार केला पाहिजे हा विचार आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी खूप मोलाचा आहे. ध्येय संपणे म्हणजे आयुष्य संपणे नव्हे. खरेतर ध्येय कधीच संपत नाही. ध्येयाला आपणच संपवत असतो. यशाप्रमाणे अपयश सुद्धा पचवता आले पाहिजे. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांशी आपण ठाम राहायला हवे. आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर आपला विश्वास असायला हवा. फाजिल आत्मविश्वास सुद्धा असता कामा नये. कारण फाजिल आत्मविश्वास हा नेहमीच आत्मघातकी असतो. आपण इतरांशी तुलना न करता स्वतःची स्वतःशीच तुलना करता आली पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या अपयशाची कारणे शोधता येतात. अपयशाने खचून न जाता प्रयत्नातील सातत्य चालू ठेवले तर व्यक्ती एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होतो, असे अनेक आदर्शवादी विचार आजच्या नवयुवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. 

    आपल्या जीवनातील अनेक घटना, प्रसंगांची मांडणी लेखकाने अगदी सहजपणे, साध्या व सोप्या भाषेत केली आहे. समर्पक व अर्थपूर्ण वाक्यरचना करताना लेखकाची कुठेही दमछाक झालेली दिसत नाही. भाषेला कोठेही कृत्रिमतेचा लवलेशही दिसत नाही. अधूनमधून आपल्या आई व ताईच्या तोंडचे बंजारा बोलीभाषेतील संवादाच्या पेरणीमुळे  ‘आयुष्य जगताना’ या आत्मकथनाच्या भाषेला एक प्रकारचा गोडवा प्राप्त झाला आहे. साधी, सोपी मनाला भिडणारी सहजोत्स्फूर्त भाषा,  अधून मधून आलेले सुविचार, वाक्प्रचार, म्हणी तसेच वीर रस , करुण रस, शांत रस, बिभत्स रस इत्यादी रसांची प्रचिती हे या आत्मकथनाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल ! हे आत्मकथन वाचायला सुरुवात केल्यानंतर ते संपूर्ण वाचून झाल्याशिवाय हातातून खाली ठेवूच नये असे वाचकाला वाटत राहते. स्पर्धा परीक्षांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे हे आत्मकथन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी, तसेच चोखंदळ वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी निश्चितच प्रेरक व मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. मराठी आत्मकथनात मोलाची भरच पडेल हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. मी लेखकाला सुयश चिंतितो ! शिवाजी जाधव यांना आगामी लेखन प्रपंचासाठी मनस्वी शुभेच्छा ! 

डॉ. सुभाष राठोड, पुणे( लेखक, अभ्यास मंडळ सदस्य, बालभारती, पुणे )

▸ रविवार,दिनांक : १२ मार्च २०२३

Post a Comment

0 Comments