Subscribe Us

अजरामर ठरणारा 'बंजारा भाषागौरव' गीत (जागतिक मातृभाषा दिनानिमित्त)


 अजरामर ठरणारा 'बंजारा भाषागौरव' गीत 

     (जागतिक मातृभाषा दिनानिमित्त)

   

बंजारा भाषिक अस्मितेला जागवण्यासाठी , नव्याने उभारी देण्यासाठी आज प्रज्ञावंत, लेखणीचे शिलेदार सज्ज झालेले आहेत. यापैकीच  एक प्रज्ञावान शिलेदार म्हणजे बंजारा भाषा , साहित्य संस्कृतीचे अभ्यासक , विचारवंत तथा   प्रसिद्ध साहित्यिक  एकनाथ पवार होय. या प्रतिभावंत शिलेदारांनी बंजारा भाषा गौरव गीताची  निर्मिती  केली आहे. जी रचना अतिशय प्रगल्भ असून जनमाणसात आणि बंजारा साहित्य विश्वात 'बंजारा भाषागौरव गीत' म्हणून लोकप्रिय झालेली आहे. या  बंजारा भाषागौरव गीताची सुरुवातच त्यांनी 'केसुला' अर्थात पळस फुलांपासून केली आहे , त्यात ते म्हणतात -


केसुला नै मोरारी 

मायड भाषा बंजारा री 

चांदा सुर्यासू अमरा री

तू तो जीवेस्यू प्यारी...


बंजारा समाज हा संघर्ष, आनंद, उत्साह आणि सृजनात्मकतेचा प्रतिक म्हणून ज्या वृक्षाला , फुलाला मानतो ते म्हणजे ओसाड माळरानावरही जोमाने बहरणारे , भर उन्हाळ्यात उन्हाचा कडाका सोसत लालभडक, केशरी रंगाची उधळण करणारे पळस फुल होय. ओसाड माळरानावर, कठीण खडकावर तर कुठे शेताच्या बांधावर पाण्याचा थेंबही जिथे मिळणार नाही अशा ठिकाणी कठीण परिस्थितीत आपले स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतो. माती आणि माणसाला सौंदर्याने मोहून टाकतो. संघर्षातही नव्या उमेदीने बहरण्याचा संदेश देतो. अगदी तसंच बंजारा समाजाची 'मायड भाषा' ( मातृभाषा) , बदलत्या परिस्थितीतही आपले वेगळे अस्तित्व टिकवून ताठ मानेने, स्वाभिमानाने बहरत आलेली आहे. आपल्या लेकरांच्या मनी , हृदयी ती अमृताचे बोल प्रसवत आहे. ज्याप्रमाणे या पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य अजरामर आहे. अनेक ग्रहणाला सामोरे जाऊन त्याची प्रखरता आणि शितलता जशी अबाधित राहते, त्याचप्रमाणे बंजारा भाषा अजरामर आहे. कवी एकनाथ पवार आपल्या मातृभाषेला आई समान मानतो आणि माझी प्रिय मायड भाषा जीवासारखीच प्रिय असल्याचे कृतज्ञताही व्यक्त करतो. बंजारा , गौरमाटी भाषा ही आई समान समुपदेशक असल्याचे कवी म्हणतो. या गौरव गीतातील बंजारा मायड भाषेचे विविध पैलू वाचकाला मंत्रमुग्ध करणारे आहे.


आंधारेमं वाट वतायी

जीवे जीवेनं जुटायी

सायी वेगी तू मुकेनं

हारो भरो किदी तू सुकेनं

सोने पितळ देसेरी

तू तो बोली जीवे जीवेरी..


 संघर्ष आणि काळ्याभोर अंधारात जीवनगाडा चालणाऱ्या माणूस नावाच्या तांडयाला वाट दाखवणारी तूच आहेस असे कवी म्हणतो. या मायड भाषेची कारुण्य माया समस्त बंजाराला कवेत घेणारी आहे. विस्थापितांना , बहिण भावंडाना , गणगोताला तू मायेच्या करुणेने एका छताखाली एकत्र आणणारी तूच मायमाऊली आहेस. कोणत्याही अनोळखी प्रदेशात गाठभेट करून गळ्यात गळा घालायला लावणारी तू जीवनवाहिनी आहेस. ज्या जिव्हाला शब्द फुटत नव्हते , त्यास तू अभिव्यक्तीचे शब्दबाण बहाल केलेस. उजाड ओसाड झालेल्या अभिव्यक्ती, भावभावनांच्या प्रदेशात हरितक्रांती घडवून आणणारी वसंतमाऊली तूच आहेस. वैभवशाली इतिहास जपणारी स्वर्णिम समृद्ध राजवीरांच्या देशाची तू एक रणरागिणी असून प्रत्येक जिवाजीवाची बोली आहे असे कवी म्हणतो. या निमित्ताने प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार , नागपूर यांनी आपल्या मातृभाषेचे औदार्य आणि महात्म्य प्रत्येक शब्दाशब्दातून प्रकर्षाने अधोरेखित केलेले आहे.  


  सोने सरीख पिवळ

  जळे सरीख तू निथळ

  भाग्य लाभगो हामेनं

  करा तोनं नवंळं

  जिनगानीरी चितांळी

  लिंबडासू तू लेरारी..


कवी एकनाथांची मातृभाषा ही गोर पाखरांच्या निरंतर प्रगतीचे स्वप्न रेखाटणारी असून ती सोन्यासारखी मौल्यवान असणारी सौंदर्याची खाण आहे. कवी म्हणतात , प्रत्येक जीवाच्या ओठावर तुझेच अमृततुल्य बोल असतात. सरितेच्या पाण्यासारखी तू निर्मळ आहेस. प्रवाही आहेस. दीनदलित, गरीब श्रीमंत, लहान मोठे, राव रंक, स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता तू सर्वांना आपल्या प्रवाहात सामावून घेतेस. म्हणूनच आम्हा बंजारा भाषिकांना सौभाग्याचे , गोरत्वाचे लेणे प्राप्त झाले आहे. आम्हाला भाग्य लाभले आहे की , तू माझ्यासमवेत पंधरा कोटी जीवाची माऊली आहेस. हे माऊली ! आम्ही सर्व तुझी लेकरे तुझ्या चरणी नतमस्तक होऊन तुला साष्टांग दंडवत करतो आहोत. कडूलिंबाच्या मोहोरा प्रमाणे उंबराच्या झाडाप्रमाणे तू सदैव विस्तारत आहे. गुणकारी आहेस. तू सदोदित आमच्या स्मृतीत रहावीस, हीच आमची मनोकामना आहे. आमच्या करोडो जनांचा वारसा जपणारी , इतिहासाची पवित्र साक्ष तूच आहेस. अतिशय मार्मिक शब्दांत कवीने बंजारा भाषेचे चित्रण केले आहे.



संकट हजार फेरी

थांबी कोनी चाकं थारी

सिर कटे धड लडावे

याडी क्षत्राणी तू प्यारी

काळ आवे काळ जावे

तू तो नंगारा घोरारी



प्रतिभावंत साहित्यिक एकनाथांच्या लाघवी आणि हृदयस्पर्शी साहित्यशैलीने या गौरवगीताने कमालीची उंची गाठल्याचे शब्दाशब्दातून दिसून येते. कवी  एकनाथ पवार म्हणतोय.  माझी मातृभाषा ही पुरातन काळापासून आजपर्यंत हजारो संकटावर मात करीत स्वाभिमानाने लढणारी एक क्षत्राणी आहे. जीवनवाहिनी असणारी माझी प्रिय बंजारा मायड भाषा! तुझ्यावर हजारो संकटे कोसळली परंतु तू संकटाबरोबरच मुघल, ब्रिटीश असोत की , इथले सरंजामी शोषक असोत , त्यापुढे तू झुकली नाहीस. वाकली नाहीस आणि पराभूत तर तू झालीच नाहीस. इतक्या कठीण परिस्थितीत प्रवास करताना तुझी चाके कधी थांबली नाहीत. गाळात रुतून बसली नाहीस. समोर आलेल्या संकटावर मात करत करत आजपर्यंतचा तुझा हा खडतर प्रवास अव्याहत चालू आहे. त्यामुळेच कवी एकनाथ आपल्या मातृभाषेचा 'याडी , माऊली , रणरागिणी , क्षत्राणी' अशा शब्दात वर्णन करतो. म्हणूनच आपल्या 'मायड भाषेला' संवर्धित करण्याचा आज विडाही उचलतांना तिचे लेकरे दिसून येतात. जसे क्षत्रियाला त्याचे शस्त्र आणि शुरत्व प्राणप्रिय असतात ; त्याप्रमाणे आमची 'मायड भाषा' (मातृभाषा) आम्हाला प्राणप्रिय आहे. या निर्व्याज प्रेमातूनच कवी एकनाथांनी एक अप्रत्यक्ष निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला आहे की, आमच्या मातृभाषेला संपविण्याचा कोणी कटकारस्थान रचल्यास तिथे शब्द सुद्धा शस्त्र होऊन लढा पुकारेल. कित्येक संकटे आली गेली. परंतु अनेक आव्हानांना घेरलेल्या रणांगणावरही तू लढण्यास सज्ज होतेस. तू उदघोष केलेल्या तूझ्या क्रांतीचा गगनभेदी नगारा दऱ्याखोऱ्यात, शेत-वनात निनादतोय. अशा स्फुर्तीदायी आणि आपल्या प्राचीन वारसाच्या प्रतिबिंबाबरोबरच भावनिकतेचे एक हृदयस्पर्शी गोंदण सुद्धा कवी एकनाथाने या गौरवगितात समर्पकपणे उमटवीलेले आहे. 



संत मुनीरे दोहामं

तू तो गुरुरे वाणीमं

चार चांद लगायी

एकनाथारे लखंळीम

गहुली इटली रायबरेली

तू तो च्यारी वडी फेलरी..



बंजारा भाषेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक वलय लाभलेला आहे. साहित्य , संस्कृती विश्वातही आपणास बंजारा दिसून येते. कवी एकनाथ बंजारा भाषेचा गौरव करतांना म्हणतात की संत , महात्मा, ऋषी मुनींच्या कवनामध्ये, दोहात तुझे गुणगान गायीले आहे. तुझ्या या खडतर प्रवासाने, निर्मळ प्रवाही स्वभावाने , मायेच्या करुणेने कवीच्या सृजनशील लेखणीला सुद्धा 'चार चांद' लावून यशोशिखरावर पोहचवले आहे ; म्हणूनच हे माऊली ! तुझे हे उपकार मी कित्येक जन्म घेतल्यावरही फेडू शकणार नाही. मी आणि हा तुझा समस्त बंजारा भाषिक लेकरांचा गोतावळा तुझे अनमोल उपकार कधीच विसरू शकणार नाहीत. परतफेडही करु शकणार नाहीत. तसे पाहिले तर कोणतीच आई लेकरावर परतफेडीचा हिशोब करून जन्म देत नसते, हा जगातील ममतेचा स्वाभाविक गुण आहे. 

        हरित क्रांतीचे जनक , महानायक वसंतराव नाईक यांची जन्मभूमी असलेल्या गहुली गडापासून तर उत्तर प्रदेशातील रायबरेली पर्यंत , इतकेच नव्हेतर तर देशाबाहेरील इटली पर्यंतचा अर्थात आशियाई-युरोपीय देशापर्यंतचा मानवी मूल्यांचे जपणूक करणारा तुझा हा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. स्वाभिमानाने मान उंचावणारा आहे. त्यामुळे आजच्या जागतिकीकरणातही तुझा प्रवास सर्वदूर सदोदित सुरूच राहावा. तुझ्या मानवी मूल्यांच्या सुवासिक सुगंधाने हे साहित्य, संस्कृतीचे गोरगड . तांडा नंघरी , समस्त आसमंत दरवळत राहो; अशी आशा या गौरव गीताच्या निमित्ताने सर्जनशील साहित्यिक एकनाथ पवार करतो आहे.


देशभरातील बंजारा तांडा नगरीत , गोरगडावर बोलली जाणारी , आचारविचारांचे आदानप्रदान करणारी, मनातील भावनांचे प्रचलन करणारी, करोडो जनांच्या मुखी असणारी , जीवा जीवांना जोडणारी , मायेच्या ममतेने जीव लावून मायेने हृदयाशी कवटाळणारी , सौंदर्याची खाण असणारी ही कवीची मायड भाषा अर्थात मातृभाषा मात्र आज भाषेच्या दर्जा पासून वंचित आहे. संविधानाच्या आठव्या सूचीत लवकरच तिला स्थान मिळो अशी आशा या निमित्ताने करुयात. प्रख्यात साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ पवार जसे शब्दामधून आपल्या मातृभाषेचे गोडवे गात आहे, ते इतक्या पर्यंतच थांबले नाहीत, तर आपल्या मायडभाषेला भाषेचा दर्जा देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी राज्यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्याबाबत मागणी सुद्धा केली. बंजारा भाषेला वैभव आणि भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी तमाम बंजारा भाषा बोलणाऱ्यातच नव्हे तर, जगणाऱ्या तमाम बंजारामध्ये , भाषाप्रेमीमध्ये अस्मिता जागवणारे हे भाषागौरव गीत नक्कीच साहित्य विश्वात एक अजरामर 'बंजारा भाषागौरव गीत' म्हणून ओळखल्या जाईल.

_________________________


- कवी - पि.के.पवार , सोनाळा जि.बुलढाणा 

_________________________

Post a Comment

0 Comments