Subscribe Us

संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सवः विदारक व धक्कादायक सत्य


 संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सवः विदारक व धक्कादायक सत्य

           डॉ. दिनेश सेवा राठोड

बंजारा समाजाचे प्रेरणा तथा श्रद्धास्थान क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती ही दरवर्षी प्रमाणे दि. 15 फेब्रुवारीला समाजातील लहान-मोठ्या सर्व घटकाच्या सहभागाने मोठ्या उत्साहात शासन स्तरावर  व तांडा-शहरात साजरी करण्यात आली. सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण म्हणून सदर जयंतीला मान्यता मिळाल्याचे सध्याचे स्वाभाविक व सामाजिक चित्र आहे. ही स्वागतार्ह बाब आहे.

जयंती निमित्तांने आपल्या महापुरूषाच्या कार्यांचा, विचारांचा उदोउदो व्हायलाच हवे. जयंती दिवशी संत सेवालाल महाराज क्रांतिकारी  महापुरुषाची रॕली काढून काहीतरी वेगळे प्रदर्शन करण्यापेक्षा जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचे विचार, शिकवण आचरणात आणले तथा त्यांच्या शिकवणीनुसार विधायक कामे समाज हितावह हाती घेतली तर खऱ्या अर्थाने ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी भले करण्या आपले जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल. 

  या संदर्भात *कविवर्य कैलास पवार सर* यांची काल समाजमध्यमावर प्रस्तुत केलेली एक मार्मिक कविता बरेच काही सांगून जाते. जसे,

*डफडा  छोडन टांडो* 

*डिजेलार  लागो* 

*घरपिचे  वरगणी* 

*केरसारू  मांगो??*

*पंगत पाणी  हारतुरा* 

*झंडा  मोटेमोटे* 

*हारगे  नाचनाचन*  

*बियर बारेम  बेटे ?*

*जयजयकार कररे जेर* 

*वोंदुर  झला  विचार* 

*सेवालाल महाराज*

*लदेनीती  किदो बेपार!सोबततच  कविवर्य निरंजन मुढे* यांची *"तांडेर जयंती"* ही कविता  तेवढीच समर्पक आहे.

*डफडा छोडन तांडो,*

*काल डीजेप नाचरोतो...!*

*सपनेम आन भाया,*

*काल घणोंज हासरोतो...!!*

*विचारे लागो भाया* 

*कतं छ मार पाच पारा...!*

*कतं मेलदीनेरे गोरो,*

*मार थाळी नंगारा...!!*

*बायीबापडी ढेर कलागो,*

*बाणे गेणेम जचरीती..!*

*नायकेर बोडी छू केन,*

*मिसकालेपर नाचरीती...!!*

*याडीभेनेर नाचगाणो यी*

*डफडापरज शोभच...!*

*लोकगीदे माइतीज,*

*गोरुरो इतिहास लाबच..!!*

*मान पाने सारु,*

*कती कार्यकर्ता लडे..!*

*कती कती देशी कती,*

*इंग्रजी पीलेन पडे...!*

*सरकारी आफीसेवाळ तरी*

*मनं समजन लेरेते..!*

*मार क्रांतिकारी विचार,*

*कोरीकारेन समजान केरेते...!!*

*डफडा, झांज थाळी नंगारान,*

*आतरा सहज हेट मत पाडो..!*

*मार जयंती पुरता तरी,*

*तांडेम डीजेर नाद छोडो..!*

उपरोक्त दोन्ही काव्यातील आशय लक्षात एकंदरीत संत सेवालाल बापूच्या जंयतीचे समाजातील सध्याचे स्वरूप विशद करते.

कारण म्हणजे जयंतीचा हल्ली दिखावा याला समाजात जास्त महत्त्व दिले जाते.

जयंती निमित्ताने काही तांडा-पाडा शहरातील जयंतीचे समाज माध्यवर व्हायरल झालेले फोटो व व्हिडीयोतुन जयंतीच्या नावाखाली आपली गौरवपूर्ण इतिहास व संस्कृतीचे विदृपीकरण होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. मोठे स्टेज लावून व किती मोठे स्पीकर/डीजे यावरून जयंतीची मान व प्रतिष्ठा ठरविली जाते. काही अपवाद वगळता जयंतीला राजकीय रंग सुद्धा पाहायला मिळतो. जयंतीच्या संयोगाने दारूच्या गुत्यावर गर्दी करणारे लोकं...आता हेच लोकं रस्ता अडवून मोठमोठ्या ध्वनिवर्धकांवर लावलेल्या गाण्यांवर नाचूनच जयंती साजरी होते अशातच धन्यता मानत असतील तर अशल्या जयंतीला अर्थ काय?

 मोठ्या थाटात निघालेल्या मिरवणूकी मध्ये महीला- पुरूष  तरूण मुले-मुली एकत्रित आधुनिक फिल्मी गाण्यावर चौका-चौकात ठेका धरतात, थिरगतात...नाचतात...! पोटातील झिंगलेल्या तळीरामाने तर जयंतीला अधिकच रंगत आलेली असते? मग संत सेवालाल महाजांच्या आपल्या भविष्यावाणीतील "दार्शनिक बोल" यास काय अर्थ? सोबतच मिरवणूकीतील आमच्या तरूण मुलीचे तर अंगविक्षेप करणारे डान्स यातुन खरेचं यातुन आपल्या बंजारा संस्कृतीचे दर्शन घडते का? आमच्या महीला व तरूणीच्या खांद्यावर/डोक्यावर साधी ओढणी सुद्धा नसते. (आजकाल या नवीन फॕशनचे अनुकरण करण्यात आम्हीच का मागे असू ? ऐकेकाळी आमच्या स्रिया वरीष्ठा समोर डोक्यावरील ओढणीचा पदर खाली पडू देत नसे.) जयंतीतील तरूणीचे अंगविक्षेपकृत नृत्य बघताना लाज वाटते. आजकाल असे जवळपास तांड्या-ताड्यात पहायला मिळते. कुणाच्या वैयक्तिक बाबी विषयी बोलने गैर आहे मात्र सामाजिक जीवनात अशा फालतु बाबींना खतपाणी घालण्याचे काम सध्या समाजात जोमात आहे. खरोखरच आपण जयंती साजरी करतो का? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

 अनेक महापुरूषाची आदर्श जंयंती साजरी होताना आपण बघतो. उदा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल एक प्रमुख भारतीय सण व उत्सव म्हणून दरवर्षी भारतासह जगभरात साजरी केली जाते. या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करते. ज्यामध्ये व्याख्यानमाला. पुस्तक विक्रीचे स्टाॕल, वाचन संस्कृतीला वाव, सांस्कृतिक व ज्ञानवृद्धीला वाव मिळेल अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची चंगळ असते. मिरवणूकीला मूक मोर्चाचे स्वरूप असते. कुठेही धांगडधिंगा नसतो.. आम्ही मात्र इतरांकडुन कधी बोध घेणार ? जयंती च्या कितीतरी दिवस अगोदर मोठे बॅनर त्यालावून त्यात कार्यकर्त्यांचे नाव व फोटो झळकत असतात. आमच्याकडे जंयतीच्या निमित्ताने सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम फारच कमी ठिकाणी पाहायला मिळते. अवाजवी आर्थिक उधळपट्टीने समाज पोखरला जात आहे याचेही भान आम्ही विसरत चाललो आहो. केवळ कर्कष आवजातील डिजेसह मोर्चा काढूनच खरी जयंती साजरी करता येते असे काही नाही.

जयंतीची मिरवणूक असावी मात्र उपरोक्त बाबीला वाव नको. सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे आवाजाचा किंवा रहदारीचा त्रास होईल असे वर्तन होता कामा नये. जयंती निमित्ताने संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविधांगी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न व्हावे. सध्या समाज अनेक समस्यातुन मार्गक्रमण करतोय,त्यायोगे वैचारिक मंथन घडावे.नव्या पिढीत सामाजिक, ऐतिहासिक  व सांस्कृतिक आदर्शाचे बिजारोपण व्हावे. वक्त्याची भाषणे वा  व्याख्यानमाला आयोजित करता येतील. संस्कृती संवर्धन व वृक्ष लागवडीसारखे काही उपक्रम सुरु करता येतील. आमच्या साहित्यिकांनी/महापुरुषांनी लिहिलेली पुस्तके विक्रीस ठेवता येतील. मात्र हाॕटस्अॕपच्या जमान्यात पुस्तके विकत कोण घेणार? महापुरूषाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागायचेच नाही तर ही सगळी सोंग कराण्याची गरज काय ? 

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व संस्काराचा अभाव याला जबाबदार म्हणता येईल.

आधी जयंती साजरी करण्यात एकवाक्यता घडायला हवी. प्रतेक जयंतीला तांड्यातील विद्यार्थीच्या शैक्षणिक हिताला पुरक असे विविध उपक्रमाचे आयोजन करावे. लाउडस्पीकर किंवा डिजे वगैरे लावून रस्त्यावर आमच्या तरुण-तरूणीने बंजारा संस्कृतीचे विदृपीकरण करून धिंगाणा करू नये. असल्या धांगडधिग्याने आपले कर्तृत्व सिद्ध करण्यात काय उपयोग? तांड्यातील लग्र कार्यात याची पुनरावृत्ती होत आहे. मोठ्या श्रद्धेने संत सेवालाल महाराजाचे विचार आचरणात/व्यवहारात आणण्यासाठीच जयंतीचे प्रायोजन असावे. समाजाच्या संस्कृतीस ठेच पोहचेल असे काही घडू नये. एकीकडे समाज आर्थिकदृष्ट्या  कमकुवत होत आहे. परंतु दिखावा बडेजाव तसेच प्रतिष्ठा व मान या मध्येच आपण अडकत आहोत. जरी सोशल मीडिया वरून आरडाओरडा केल्या गेले तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याची किती अंमलबजावणी होईल याची कमीच शाश्वती असेल.

बहुतेकांना माझे लिहिणे  हे अयोग्य वाटेल मात्र हे विदारक, कटू वा धक्कादायक सत्य आहे. माझ्या मते अशा जयंती साजरीकरणाला काहीही अर्थ नाही. खरेतर महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावरून गेल्यास समस्त मानवजातीचे कल्याणास आपला थोडाफार हातभार लागू शकतो.

संत सेवालाल महाराज यांनी आपली अलौकिक  बुद्धिमत्ता, सत्यनिष्ठाआणि सामर्थ्याच्या बळावर बंजारा गण समाजात बदल घडवून आणले. समाजाला योग्य दिशा दिली. त्यांनी समाजाच्या शुद्धीकरणाचे व प्रशासकाचे काम केले. जगाच्या घटनाचक्रात ते विपरीत परिस्थितीत जगले. आपल्या कर्तृत्वाने बंजारा समाजाची पुनर्रचना करीत समाजाला प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण केले.

समाज व संस्कृतीचा जाज्वल्ल्य अभिमान हा संत सेवालाल महाराज जयंतीच्या माध्यमातूनअधिकाधिक वृद्धीगत होत राहावे. याबाबतीत दिसणारी अनास्था ही फार वेदनादायी आहे. आमचा समाज, इतिहास व संस्कृती बद्दल असलेल्या आस्तिकतेच्या संकल्पनेतील हे मोठे पाखंड म्हणता येईल. 

    *चला तर या पुढे.. संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करू या..  असल्या धांगडधिंगाण्याला वाव न देणारी, व्यसनाधिनतेला प्ररावृत्त करणारी, बेरोजगाराला रोजगाराकडे प्रेरित करणारी, तर महत्त्वाचे म्हणजे संस्कृतीचे विदृपीकरणाला पोषक नसणारी....!! तर असावी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी...!!* 

 डॉ. दिनेश सेवा राठोड

               वसंतकार

Post a Comment

0 Comments