Subscribe Us

समीक्षा-गोद्री-कुंभ


 समीक्षा

हिंदू गोर बंजारा व लभाना / नायकडा समाज कुंभ गोद्री २०२३

मुद्दे१.कुंभमेळा २.गोर बंजारा संस्कृती

३.आयोजन नियोजन चोख पण प्रयोजन वेगळं

४.गोद्री कुंभातून बंजारा संस्कृतीवर घाला घालण्याचा षडयंत्र

५.हा कुंभ गोरधर्माच्या विरोधातला

६.धार्मिक कुंभाला राजकीय स्वरूप

७.गोद्री कुंभाला बंजारांचा अखेरपर्यंत विरोध

८. बंजारा समाजाचे मोजकेच साधू संत उपस्थित समाजाचे प्रमुख चेहरे दिसलेच नाही.

९.समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा नाही

१०. गोरधाटी आणि गोरधर्माशी कटीबधं असलेला बंजारा समाज.

१.कुंभमेळा

कुंभमेळा हा धार्मिक सोहळा असतो.कुंभमेळा म्हणजे ठरावीक काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.दर तीन वर्ष, सहा वर्ष आणि दर बारा वर्षांनी प्रयागराज,उज्जैन,नाशिक आणि हरिद्वार अशा तीर्थक्षेत्री कुंभमेळा भरत असतो.अनेक भाविक हजेरी लावतात पवित्र स्नान करतात.नदीची पुजा होते. शोभा यात्रा निघते.सूर्याला अर्घ्य दिला जातो.कुंभमेळा हा धार्मिक उत्सव किंवा सोहळा असून त्यांचे औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. परंतु गोद्री कुंभात तसे दिसले नाही.साधू संतांचे विविध आखाडे आणि त्यांचा सहभाग असतो.होम हवन वैदिक मंत्राचे पठन लोकप्रबोधन यातून केले जाते.असा कुंभ हिंदू परंपरेत प्रचलित आहे.

२.गोर बंजारा संस्कृती*हजारो वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे मूळ वारस असलेला गोर बंजारा समाजाची विशिष्ट संस्कृती असून समाज कोणत्याही धर्माशी निगडित नाही. व कोणत्याही धर्माला मानत नाही.म्हणून कुंभ ही संकल्पना बंजारा समाजाला कोणत्याही परिस्थितीत लागू पडत नाही.बंजारा समाज आपल्या पवित्र गोरधाटी नुसार दैनंदिन जीवन जगत आहे.यात पुजापाठ कर्मकांड याला थारा दिलेला नाही."सेन सायी वेस"अशी जगाच्या पाठीवर विश्व कल्याणकारी प्रार्थना करणारा हा एक मात्र समाज आहे.गोरधाटीनुसार बंजारा समाजात कुंभ परंपरा नाही. आपल्या धर्म गुरूंच्या शिकवणावर वाटचाल करणारा समाज संत सेवालाल महाराज पुण्यभूमी पोहरागडाला आपली काशी मानतो.पोहरागडच गोर बंजारा समाजासाठी सर्वोच्च स्थान आहे.

*३.आयोजन नियोजन चोख पण प्रयोजन वेगळं*गेल्या वर्ष भरामध्ये गोद्री कुंभाची मोठ्या प्रमाणामध्ये तयारी BJP/RSS सह सरकारचा सहभाग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पासून अनेक मंत्र्यांनी ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन वातावरण गरम केले.त्यात मोठमोठ्या संघटना सहभागी झाल्या.समाजावर चाल करण्यासाठी सरकारी करोडो रुपये खर्च करून गोद्रीचा कुंभ घेण्यात आला.बंजारा,लभाना व नायकडा हा विषय घेऊन देशातील प्रत्येक बंजारा तांड्यामध्ये हा कुंभ पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला.या कुंभाचं आयोजन चांगलं होतं.नियोजन उत्तम होतं पण बंजारा संस्कृती समूळ नष्ट करण्याचा प्रयोजन होतं.म्हणून गोरधाटीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला.

*४.गोद्री कुंभातून गोर बंजारा संस्कृतीवर घाला घालण्याचा षडयंत्र*सबंध भारत देशात विखुलेल्या गोर बंजारा समाजाची आपली वैभवशाली संस्कृती आहे. जन्मापासून मरेपर्यंत अनेक संस्कार आहेत.गोरमाटी साकी,साकतर,केणावट,भजन,आरत,विंती,आरदास,धुंड,येकळ, सगाई,वदायी, वायानातरा,तांगडी,ढावलो,गोट-घुगरी,देवधरम,मुईमटी,सिकवाडी,होळी,दवाळी,दसराव,तिज अशा स्वतंत्र वहिवाटीवर आघात करण्याचा षडयंत्र यातून रचला गेला.जे की बंजारा समाज आपली गोरधाटी सोडून कोणतीही संस्कृती आत्मसात केली नाही.मानवी मूल्ये आणि मानवता जोपसणाऱ्या समाजामध्ये सनातन धर्म, कर्मकांड व अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.परंतु काही केल्या अशा थोतांड गोष्टीला बंजारा समाज थारा देत नाही.

*५.गोरधर्माच्या विरोधातला कुंभ आणि गोरधर्माला दाबण्याचा प्रयत्न*मागील काही वर्षांपासून बंजारा समाजाने स्वतंत्र गोरधर्माची मागणी करत आहे.काहींचे म्हणणे आहे की धर्माची व्याख्या गोरमाटी समाजाला लागू होत नाही.आम्ही ना हिंदू,ना मुस्लिम, नाही ख्रिश्चन, ना जैन कारण आम्ही फक्त गोरधाटी नुसार जगत आहोत. कोणत्याही धर्माशी आम्हाला बांधण्याचा प्रयत्न करू नये.जर तसे केल्यास आम्ही गोरधर्म आत्मसात करू या उद्देशाने मागील काही वर्षांपासून गोरधर्म चळवळ संपूर्ण देशात सक्रिय झाली आहे.म्हणून गोरधर्माला दाबण्यासाठी त्याच्या विरोधात हा कुंभ घेण्यात आला.परंतु याच कुंभात मुख्य व्यासपीठावरून सर्व साधू संतांच्या उपस्थितीत हजारो लोकांसमोर एका मोठ्या संताने "गोर धर्म की जय" चा नारा देऊन संपूर्ण सभामंडप दणाणून सोडले.त्यामुळे गोरधर्माच्या विरोधातला कुंभ की गोर धर्मासाठी कुंभ हा संभ्रम समाजात निर्माण झाला आहे. एकंदरीत बंजारा समाजामध्ये धर्माबद्दल अनभिज्ञता होती. जागृती नव्हती,या माध्यमातून संपूर्ण समाज माध्यम ढवळून निघाल्यामुळे लोकांना धर्माबद्दल माहिती मिळू लागली आणि धर्म कळू लागला त्यातून आत्मसन्मान जागृत होऊन आम्ही मुस्लिम,सिख,ईसाई,जैन नाही तर काही लोकांचे आम्ही हिंदुही नाही मग "आमचा धर्म गोरधर्म" या मुद्द्यावर बऱ्याच लोकांचा एकमत होताना दिसून आले.या संदर्भात गोर धर्माच्या प्रचारकांकडून जाणून घेतले असता त्यांचे म्हणणे असे आले की आज आम्ही हिंदू धर्मात आहोत पण आमची गोरधर्माची मागणी आहे.जसे सिख,जैन आधी हिंदू होते त्यांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाल्यानंतर ते त्यांचा धर्म स्थापन झाला. आमच्या गोरधर्माला मान्यता मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या रक्षणासाठी सज्ज राहू.परंतु सिख,जैन वा गोर असे कोणतेही धर्म निर्माण झाले तरी ते हिंदुस्थानाच्या अखंड हिंदुत्वाचाच भाग असणार आहेत.त्यामुळे अखंड हिंदुत्व आणि हिंदूराष्ट्र या संकल्पनेशी आमची एकमत आहे. आम्ही त्यासाठीच प्रयत्न करत आहोत.त्यामुळे हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र ही गोरधर्माची देखील मागणी आहे.असे अनेक गोरधर्म प्रचारकांनी सांगितले.

*६.गोद्री कुंभाला बंजारांचा अखेर पर्यंत विरोध*जेव्हा पासून बंजारा कुंभ ही संकल्पना उदयास आली तेव्हा पासून समाजामध्ये कुंभाला विरोध व तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला.कारण समाजामध्ये हिंदू धर्माचा आमच्यावर होत असलेला आक्रमण असा सूर आला.आम्हाला धर्माची आवश्यकता नाही असा एक सूर होता. तर आम्ही गोरमाटी आमचा धर्म गोरधर्म हा एक सूर होता. पण आयोजकाने या तिन्ही पातळीवर विशेष लक्ष देऊन काम करताना आढळले नाही.त्याचा परिणाम म्हणून गोद्री कुंभाकडे समाजानी पूर्णपणे पाठ फिरवली. या कुंभात पंधरा ते वीस लाख लोकं जमतील अशी वल्गणा करण्यात आली. पण प्रत्यक्षात सभामंडप भरण्याइतपत गर्दी जमवता आली नाही आणि तो आकडा कधीच पूर्ण झाला नाही. गर्दी काही प्रमाणात दिसली ती स्थानिक लोकांची आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची ती पण जेवणावळीसाठी आलेल्या लोकांची गर्दी दिसली. ज्यामध्ये बंजारा सोडून इतर जातीचे धर्माचे लोकं मोठ्याप्रमाणात मध्ये असल्याचे बोलले गेले. एकंदरीत समाज माध्यमातून कायम स्वरूपी विरोध राहिला. विरोधाची धार कमी झाली नाही. त्यामध्ये धर्माचे आक्रमण पोहरागडाचे महत्व कमी करणे किंवा साधू संतांचा अपमान असे अनेक गोष्टी लोकांच्या समोर मांडण्यात आल्या. याच्यावर विशेष मेहनत आयोजकाने केल्याचे दिसून आले नाही.

*७.धार्मिक कुंभाला राजकीय स्वरूप*गोर बंजारा संस्कृती परंपरेनुसार कुंभ हा नसतोच तरी देखील राजकीय स्वार्थापोटी कुंभ घेण्यात आला.ते पण कोणतेही धार्मिक पार्श्वभूमी नसलेल्या गोद्रीत. हे तेथील स्थानिक नेत्यांची झोळी भरण्यासाठी केलेला उठाठेव आहे. कुंभ हा साधू संतांचा असतो परंतु गोद्री कुंभात राजकारण्यांची लुडबुड दिसून आली.सरकारी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला.

*८.समाजातील मोजकेच साधू संत उपस्थित समाजाचे प्रमुख चेहरे दिसलेच नाही*या कुंभातून पोहरागडाचे महत्व कमी करत असल्याचे समजताच आणि समाजातील तीव्र विरोध पाहता.बऱ्याच साधू संतांनी या कुंभाकडे पाठ फिरवली.काही मोजकेच साधू संत उपस्थित होते.त्याचबरोबर या कुंभाला मोठमोठे नेते मंडळी जाताना दिसले पण गोर समाजातील प्रमुख चेहरे या ठिकाणी दिसलेच नाही.कारण त्यांना देखील हे कुंभ मान्य नव्हतं.

*९.समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा नाही.*या कुंभात धर्मांतरणावर बोलण्यात आले नाही.धर्मांतरण कायद्याविषयी भाष्य केले गेले नाही.किंवा समाजाचे आरक्षण असो की गोरबोली मान्यता असो की तांडा वस्ती सुधार असो किंवा बेरोजगार तरुण पिढी असो.अशा प्रलंबित प्रश्नावर चर्चा नाही. म्हणून याच्यातून समाजाला ठोस असे काहीच मिळाले नाही.

*१०. गोरधाटी आणि गोरधर्माशी कटीबद्ध असलेला बंजारा समाज.*कोणी कितीही प्रयत्न करून गोर बंजारा समाजावर इतर धर्म लादण्याचा प्रयत्न केला तरी गोर बंजारा समाज आपली पवित्र गोरधाटी कदापि विसरणार नाही.म्हणून धाटी टिकविण्यासाठी गोरधर्माची मोठ्या प्रमाणात गरज आहे.म्हणून समाज अशा कुंभाकडे फिरकले नाही.

                 म्हणून गोद्री हिंदू गोर बंजारा हा कुंभ यशस्वी झाला नाही.एकंदरीत हा कुंभ फेल झाल्याचे बोलले जात आहे.

*गोर मिथुन गणपत राठोड*

*गोर विचारधारा सोलापूर*

📞९६३७४६०१४८

Post a Comment

0 Comments