Subscribe Us

प्रेरणा


 प्रेरणा

1969-70 च्या सुमाराची घटना असेल, आमची चवथ्या वर्गाची सामायिक परीक्षा होती. त्या काळी जवळपासच्या आठ-दहा शाळांचे एकच परीक्षा केंद्र असे. गावापासून लांब अंतरावर केंद्र असल्यामुळे रोज रोज जाणे -येणे शक्य नव्हते. अशावेळी सर्व मुलांची परीक्षा केंद्रावरच राहण्याची व्यवस्था शिक्षक करीत असत.  आमचे परीक्षा केंद्र शेंदुरजना या गावातील केंद्र शाळेत होते.*

आमच्या गावातील आणि केंद्रात समाविष्ट सर्व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी परीक्षेला तेथेच आली होती. परीक्षेत रोज वेळापत्रकानुसार पेपर घेतले जात व त्याचदिवशी त्याची तपासणी केली जात असे. परीक्षा 3 ते 4 दिवस चाले व शेवटच्या दिवशी अंतीम निकाल.*

आमचा निकाल शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आला. माझा केंद्रातील सर्व शाळांमधून पहिला क्रमांक आला होता. पास झालेली सर्वच मुले आनंदली होती, तसा मलाही आनंद झाला होता. बाबा दररोजच माझा व माझेसोबत आणखी इतर मुलांचाही डबा घेवून रोज यायचे. इतर दिवशी डबा देवून परत जायचे, पुन्हा दुसर्‍या दिवशी यायचे. आज परीक्षा संपणार व निकाल लागणार म्हणून ते सायंकाळपर्यंत थांबणार होते. मी पास झालो व माझा पहिला क्रमांक आला हे मी कधी बाबांना सांगतो, असे मला झाले होते.*

मी माझ्या इतर मित्रांसोबत पुढे चालत होतो. आमच्या मागून कांही मुलामुलींचा घोळका येत होता. आम्ही सर्व आपल्याच तालात पुढे चालत असताना मागाहून येणाऱ्या मुलामुलींचा घोळका गमतीजमती करीत होता. अशातच कुणीतरी मुलीने विचारले,.....*

अग पहिला नंबर कोणाचा आला".*

एकीने उत्तर दिले........

आपल्यासमोरुन चालला आहे व ज्याच्या मागाहून लाईट लागले आहेत त्याचा."*

माझ्या चड्डीला फाटल्यामुळे आईने "ठिगळ" लावून दिले होते. मी मागे वळून पाहिले, कोण बोलले हे जरी दिसले नसले तरीही आवाजावरून समजले, हे कोणी सांगितले असावे. त्यांना त्याचे काहीही देणेघेणे नव्हते, ते माझी टिंगलटवाळी करण्यात आनंद घेत होते.* 

ज्याच्या चड्डीला मागाहून ठिगळ लागले आहेत त्याचा पहिला क्रमांक आला"*

हा माझा करून दिलेला परिचय मी आजही विसरू शकत नाही. आताही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो.*

नकळत का होईना, पण माझ्या त्या भगिनीने केलेली शेरेबाजी माझ्या आयुष्यातील मोठी बाब ठरली. मी वयाने मोठा होत होतो, तसतसा जास्त गंभीर होऊन या बाबीकडे पाहत होतो. कदाचीत तीच घटना मला प्रेरणा देत गेली असावी, आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, व्यक्ती आल्या, ज्यांना पाहून आपणही असेच व्हावे असे वाटायचे, कळत नकळत त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी झालोही, पण ही लहानशी घटनासुद्धा माझे आयुष्य बदलण्यासाठी कारणीभूत ठरली असे मला आजही वाटते.* 

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी मुलगा व मुलगी असा भेद समजण्याच्या व ते कळण्याच्या वयात नव्हतो, पण जसजसे आयुष्य पुढे सरकत गेले, त्यावेळी त्यातील अंतर कळायला लागले व मनाला अस्वस्थ करायला लागले.

हीच कदाचीत मला यशाचा मार्ग दाखविणारी प्रेरणा होती.

राम पवार,अमरावती

*भ्रमणध्वनी :9284196496*



Post a Comment

0 Comments