Subscribe Us

हिंदू गोर बंजारा का---?


 *अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लभाना - नायकडा समाज कुंभ - एक चिंतन*


           *-फुलसिंग जाधव, औरंगाबाद.*

=========================

*(टीप : लेख थोडा मोठा आहे. वेळ काढून शेवटपर्यंत वाचणे.)* -------------------------------------

    गोद्री, तालुका जामनेर जिल्हा जळगांव येथे  २५  ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत "अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लभाना - नायकडा समाज कुंभचे" आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या समाजात जेंव्हा जेंव्हा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तेंव्हा समाजातून  वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात. या कार्यक्रमाबद्दलही समाज माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया पुढे  येत आहेत. बहुतांश प्रतिक्रिया या अपूर्ण महितीच्या आधारेच येत आहेत. जसे की- पोहरादेवी येथील महंतांना विचारले नाही ,  गोर धाटी संस्कृती नष्ट होणार आहे, पोहरादेवीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षडयंत्र आहे,  पोहरादेवीला कार्यक्रम का घेतला नाही ? यांना का विचारले नाही, त्यांना का विचारले नाही, अमुक मंत्र्याला का विचारले नाही. या कुंभमुळे समाजाचे कोणते प्रश्न सुटणार आहेत ? या कार्यक्रमाला मदत करण्यामागे आरएसएसचा हेतु काय ? कुंभ काय आपली संस्कृती आहे काय ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. असे प्रश्न विचारले जाणे अजिबात गैर नाही. ते विचारायलाच हवे. प्रश्न विचारणाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये. हेही तेवढेच खरे आहे.  गोद्री कार्यक्रमासंदर्भात पूर्ण माहिती न घेता समाज मध्यमांमध्ये चुकीची माहिती देणे हे मात्र गैर आहे. उदारणार्थ -  एक प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, "पोहरादेवी येथील कोणत्याही महंतांना विश्वासात घेतले गेलेले नाही, त्यांना विचारलेले नाही." वास्तविक पाहता या कार्यक्रमाची गोद्री  येथील पहिली बैठक श्री बाबुसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेली होती. पोहरादेवी येथील बैठकीला पोहरादेवीचे जवळपास सर्वच महंत, महाराज व्यासपीठावर  उपस्थित होते. तसे फोटो समाज माध्यमातून बघायला मिळालेले आहेत. एवढे ढळढळीत सत्य असतांना या महंतांना विचारलेलेच नाही अशी खोटी माहिती समाजात कोणी पेरत असेल तर  तो खोडसाळपणाच नाही तर आपल्यातील विकृतीचे प्रदर्शन करण्याचा प्रकार आहे. दुसरी अफवा अशी पसरवली जात आहे की, पोहरादेवीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षडयंत्र आहे ! हे तर खुपच हास्यस्पद आहे !

      जर लभाना समाज एखाद्या नवीन ठिकाणी  समाजाचे एखादे धार्मिक स्थळ उभे करीत असेल तर त्यात वावगे काय आहे ? किंवा या कार्यक्रमाद्वारे आमच्यातील ज्या पोट जातीशी आम्ही अनेक पिढ्या भेदभावाचा व्यवहार केलेला आहे त्या पोट जातीतील  श्री रामेश्वर नायक सारखा  एखादा कार्यकर्ता राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामामुळे छाप पाडत असेल तर कोणाच्या पोटात पोटसुळ उठण्याचे कारण काय आहे ? दुसरे असे की त्यांच्या प्रयत्नाने समाजाचे कांही प्रश्न मार्गी लागत असतील तर आम्हाला थयथयाट करण्याची गरजच काय  आहे ?


*कोण आहेत हे लभाना/ मथुरा बंजारा ?*


        लभाना/ मथुरा बंजारा  ही  गोर बंजारा समाजातील एक उपेक्षित पोट जात आहे. जसे- ढाडी, ढालिया, सनार  या  गोर बंजारा समाजातील उपेक्षित पोटजाती आहेत.याच गटात मोडणारी लभाना/मथुरा बंजारा पोटजात आहे. या वर्गाला  स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या गोर बंजारा समाजाने पिढ्यांपिढ्या हीन आणि कनिष्ठ दर्जाची वागणूक दिलेली आहे. या पोट जातीशी पूर्वी रोटी - बेटी व्यवहार होत नव्हता. अलिकडच्या काळात रोटी व्यवहार होतो पण बेटी व्यवहार होत नाही. आमच्याच समाजातील या भेदभावाविरुद्ध सामाजिक समतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी किती बैठका, मेळावे, झुम मिटिंगा घेतलेल्या आहेत ?आम्ही आमच्या समाजातील या भेदभावाविरोधात किती लिखान केलेले आहे ? याचा लेखाजोखा  समाजासमोर ठेवला पाहिजे.  आमच्याच भावंडाशी आपण मानवतेचा व्यवहार केला नसेल तर स्वकियांकडून भेदभावाच्या जखमा सहन केलेल्या पोट जातीतील एखादा तरुण समाजाच्या व्यापक हितासाठी धडपड करीत असेल तर आम्ही कोणत्या तोंडाने  किंवा नैतिकतेच्या आधारावर त्यांना प्रश्न विचारणार आहोत किंवा विरोध करणार आहोत? उलट त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व्हायला पाहिजे . 


  *कार्यक्रमाची पार्श्वभूमी*


  लभाना समाजाचे कार्यकर्ते श्री रामेश्वर नायक यांनी दिलेली माहिती अशी आहे की,  लभाना / मथुरा बंजारा समाज संत सेवालाल महाराजांबरोबरच 

तिरुपती बालाजी, स्वामी हाथीराम बाबाजी, श्री गुरुनानक, श्री गुरुगोविंदसिंग, श्री चंद्र बाबा यांना विशेष करुन मानतो. श्री गुरुनानक यांचे मोठे चिरंजीव श्री चंद्र बाबा यांचे मंदिर  गोद्री येथे  बांधण्यात आलेले आहे. आणि त्यानिमिताने ६ दिवस भंडाऱ्याचे नियोजन करण्यात आलेले होते.  पण त्यांनी समाजाच्या व्यापक हितासाठी गोर बंजारा आणि लभाना समाज एकत्रीतपणे हा कार्यक्रम घेण्याची त्यांनी चाचपणी केली. आणि  या कार्यक्रमाला मोठे स्वरुप देण्यासाठी त्यांनी  आरएसएसच्या

धर्म जागरण विंगची मदत मागितली. या धर्म जागरणच्यावतीने धर्म जागरण कुंभ  हैदराबाद येथे आयोजित करण्याची तयारी होती. श्री रामेश्वर नायक यांच्या आग्रहास्त्व गोद्री येथे हा कार्यक्रम घेण्यात  येत आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाचे आयोजन हे जिल्ह्यापुरतेच मर्यादित होते. पण त्यांनी व्यापक  विचार करुन या कार्यक्रमाला व्यापक स्वरुप देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरएसएसच्या

धर्म जागरण विंग आणि दोन्ही समाजाचे साधु संत त्यांना मदत करीत आहेत. अशी ढोबळ माहिती आयोजकांकडून मिळालेली आहे.


 *गोद्री कार्यक्रमाची धास्ती घेण्याचे कारण काय ?*


    लभाना समाजाच्या श्री रामेश्वर नायक या कार्यकर्त्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना म्हणजे गोद्री कार्यक्रम. प्रारंभी एका जिल्ह्यापुरते मर्यादित असलेला हा कार्यक्रम व्यापक करण्यासाठी  त्यांनी त्यांच्या व गोर बंजारा समाजातील साधु संतांची भेट घेऊन या कार्यक्रमासंदर्भात भूमिका मांडली. आणि त्यांना पुढे करुन या कार्यक्रमाची घोषणा केली. विशेष म्हणजे सुरुवातीला श्री श्याम महाराज हे जामनेर तालुक्यातील असूनही या कार्यक्रमाची त्यांना भनकही नव्हती. पाल येथील  ब्रह्मलीन  संत लक्ष्मण चैतन्य बापूजीचे उत्तराधिकारी श्री बाबाजी यांनाही याची माहिती नव्हती. पण  लभाना समाजाचे कार्यकर्ते श्री रामेश्वर  यांनी त्यांच्या व  गोर बंजारा समाजातील साधु संतांना एक प्रकारे गळ लावून पुढे केलेले आहे. त्यानंतर पोहरादेवीचे संत, महंत, महाराजही त्यात सहभागी झाल्याची अधिकृत माहिती पुढे आलेली आहे.  


 *आरएसएसची भूमिका काय ?*


         आरएसएसची  धर्म जागरण विंग श्री रामेश्वर नायक आयोजित या कार्यक्रमाला यांच्या आग्रहास्त्व सर्व  प्रकाराची मदत  उघडपणे करीत आहे. गुप्त पद्धतीने नव्हे तर आरएसएस उघडपणे त्यांच्या पाठीशी आहे. आरएसएस वेगवेगळ्या राज्यात अशा कार्यक्रमाला मदत करीत असते. त्याच आधारावर  हा कार्यक्रम होत आहे. अशी माहिती हाती आलेली आहे


 *हिंदू गोर बंजारा का ?*


    आज ८०% गोर बंजारा हिंदू धर्मात आहे. तो स्वतःला बदलत्या काळानुसार "हिंदू गोर बंजारा" म्हणून ओळख देत असेल तर त्यात गैर काय आहे ? समाजातील घृणा द्वेषाचे विष पेरणाऱ्याना उत्तर म्हणून २०१७ मध्ये  मी "हिंदू गोर बंजारा" या नावाचे एक संघटन उभे करायचे ठरवलेले होते. फेसबुकवर त्याचा लोगो आणि बैनर आजही उपलब्ध आहे. ते आज वास्तवात उतरत आहे याचा मला आनंद होणे साहजिकच आहे.  काळानुसार समाज बदलत असेल तर आम्ही त्यांना रोखणारे कोण आहोत ? दुसरे महत्वाचे असे  की, आपल्या समाजातील नास्तिक आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या आणि धाटीच्या आडून आपला छुपा एजेंडा समाजावर लादणाऱ्या वर्गाकडून  आपल्या समाजातील  साधु संतांची वारंवार अप्रतिष्ठा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. हा प्रकार दिवसेंदिवस अधिक वाढत चाललेला आहे. या देशाचे संविधान जर धर्म, उपासना पद्धती निवडण्याचे स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक नागरिकांना देत असेल आणि त्यानुसार कोणी वागत असेल तर संविधान डोक्यावर घेऊन फिरणाऱ्यांना साधु संतांची अप्रतिष्ठा करण्याचा कोणताही अधिकार नाही. या लोकांकडून  आमच्या समाजाच्या साधु संत, महंतांची अप्रतिष्ठा करणारे हे लिखान पहा -

 " *ऐतखाऊ,फुकट खाऊ, अंधविश्वासी, पाखंडी ( बुवा, बापू ,सत्संगी साधु ,महंत ) यी तांडे र अवलाद छेनी, तांडे र उत्पत्ती छेनी ! तांडा संस्कृती म ऐतखाऊ लोकु न स्थान छेनी!!*

" *आपने समाजेर कांयी भगत, भोपा, सत्संगी, बुवा, साधु, महंत समाजेम कांयी कर रेछ? समाजेन कुनसे दिशासी लेजारे छ?*

    समाजाच्या साधु - संत, महंतांबाबतची ही गलिच्छ भाषा जेवढी निंदनीय आहे तेवढीच चिड आणणारी आहे. कदाचित या विकृत प्रवृतीच्या लोकांना "हिंदू गोर बंजारा" हे उत्तर असावे ! एखाद्या जातीला, धर्माला, समाजातील साधु-संत, महंतांना शिवीगाळ करुन किंवा समाजात घृणा , द्वेष, तिरस्काराचे  विष पेरुन पुरोगामीत्व सिद्ध होत नसते. हे बुद्धिभ्रष्ट लोकांना कोणी सांगावे !

       टीकाकार आणि प्रबोधनकार हे दोन घटक  समाज व्यवस्थेत  फार मोठी  भूमिका पार पाडत असतात. कोणत्याही सुज्ञ आणि परिपक्व समाजात या घटकाला विशेष स्थान असते. टीकाकाराला नेहमी दोन गोष्टिंचे भान ठेवावे लागते. एक म्हणजे सामाजिक शिष्टाचार आणि दुसरे म्हणजे टीकेतील शालीनता. या दोन गोष्टीना बगल देऊन केली जाणारी टीका ही टीका प्रकारात न मोडता ती विकृती आणि  घृणा द्वेषाचे प्रगटीकरण असते. टीकेचा रोक चारित्र्य हननाचा असता कामा नये. समाजातील किधर भी चलोवाला हा वर्ग नेहमी त्यांच्या रक्तात भिणलेल्या विकृती आणि  घृणा - द्वेषाचे प्रगटीकरण करीत असते असे म्हटले तर ते अतिशयोक्तिचे ठरु नये. आणि कदाचित यांच्या  या विकृतीला लागलेले गोड फळ म्हणजे "हिंदू गोर बंजारा" हे नामकरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      संत सेवालाल महाराजांना घराघरात पोहोंचवण्याचे महान कार्य संत रामरावजी बापू यांनी आयुष्यभर केलेले आहे. तसेच आपल्या समाजाला परिपूर्ण सामाजिक न्याय मिळावा म्हणून थेट पंतप्रधानाची भेट घेणे, वेगवेगळ्या नेत्यांना भेटणे, समाजाच्या व्यथा वेदना त्यांच्या समोर  मांडणे म्हणजे ऐतखाऊपणा होतो काय ?

      संत लक्ष्मण चैतन्य बापूजींनी समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी केलेले कार्य ऐतखाऊपणा कसा काय ठरतो ? त्यांचा चैतन्य साधक परिवार हा शुद्ध शाकाहारी आणि निर्व्यसनी आहे. त्यांचे लाखों भक्त आज मांसाहार आणि व्यसनमुक्त  जीवन जगत असतील तर बापूजींचे हे महान कार्य नजरेआड करण्यासारखे आहे का ? व्यसनाधीनता ही आज आपल्या समाजासमोरील किती मोठी समस्या आहे. हे का या लोकांना दिसू नये ? 

    मांसाहार , तंबाखू, गुटखा, बीडी, सिगारेट, दारुवर एखादी व्यक्ती एका महिन्याला साधारणपणे एक हजार रुपये खर्च करीत असेल तर त्या व्यक्तीचा वर्षा काठीचा खर्च होतो बारा हजार ! संत लक्ष्मण  चैतन्य बापूजींचा परिवार हा लाखोंच्या संख्येत आहे. त्यातील एक लाख साधक घेऊ या . एक लाख गुणीले बारा हजार केले तर ती रक्कम  - 100000x12000 1,200,000,000/- एवढी येते. एका वर्षात दारु आणि मांसाहारात खर्च होणारी  एवढी मोठी रक्कम  बचतीत रुपांतरीत होऊन ती परिवाराच्या चांगल्या कामासाठी उपयोगी पडत असेल तर हे चुकीचे काम आहे काय ? अशा कामाची नोंद ऐतखाऊत करणार काय ?  साधु संतांविषयी थोडेफार तारतम्य ठेऊन शब्द वापरायला हवे . 

   

*हा धार्मिक कार्यक्रम*

    

   गोद्री येथे आयोजित कार्यक्रम हा पूर्णताः धार्मिक कार्यक्रम आहे.  त्यामुळे तेथे समाजाच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित नाही. तरीही प्राप्त माहितीनुसार समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. विशेष करुन राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न, तांड्याच्या समस्या मान्यवरांपुढे मांडल्या जाणार आहेत. केवळ प्रश्न मांडले जाणार नाहीत तर त्याच्या पाठपुराव्यासाठीसुद्धा नियोजन होत असल्याचे कळते. सदरील कार्यक्रम धार्मिक जरी असला तरी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांविषयी त्यात गांभीर्याने चर्चा होणार आहे. शिवाय संस्कृती दर्शन व अन्य प्रदर्शन ही भरवले जाणार आहे. गोर बंजारा समाजाची संस्कृती आणि त्याचे राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान आदिंची माहिती या कुंभद्वारे देशाला होणार आहे.

    समाजाच्या सर्व नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. जवळपास सर्वच नेत्यांशी बोलणे झालेले असल्याची अधिकृत माहिती आहे. 

      आमच्या समाजात

 आपल्याच जातीतील स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांनी आपण ज्यांना कनिष्ठ मानत आलो त्या पोट जातीतील एखादी व्यक्ती पुढे येऊन समाजाला जोडण्याचे काम करीत असेल तर आपल्याला खरे तर आनंद व्हायला हवे! पण तसे होतांना दिसत नाही. आम्ही आमची मक्तेदारी सोडायला तयार नाही. ही खेदाची बाब आहे. 

  आरएसएसचीच मदत का ? असा  ही प्रश्न अनेकांना पडू शकतो . या प्रश्नाचे उत्तर एवढेच आहे की आम्ही  आमच्या रक्ताच्या माणसांना  कधी मदतीचा हात पुढे केला नसेल  तर त्यांनी कोणाची मदत घ्यावी, कोणाला सोबत घ्यावे हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. कटु सत्य आणि  वास्तवाकडे आम्हाला पाठ फिरवून चालणार नाही. आम्हाला कुठे न कुठे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 

   खरे तर समाज कधी एकत्र येऊच नये असेच आम्हा सर्वांचे वागणे असेल तर दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग काय ? समाजात गटातटाच्या, स्वार्थाच्या किती दुकानं सजलेली आहेत ? त्याकडे दुर्लक्ष करुन आम्हाला चालणार आहे का?आपल्यात किती तुकडे आहेत ?   आपल्यात दर दिवशी होणारे तुकडे थांबवण्यास आपण अक्षम असू तर आपण किती दिवस दुसऱ्यांच्या नावाने खापर फोडत राहणार आहोत ?

     गोद्री येथील होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल बोलतांना आपण आपल्याकडेही थोडेसे डोकावून पाहिले पाहिजे. "आपले ठेवायचे झाकुन आणि दुसऱ्याचे पहायचे वाकुन " ही मानसिकता आपण बदलणार आहोत का ? हा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होतो.

     दोन महिन्यापूर्वी सन्माननीय माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मला या कार्यक्रमा संदर्भात काय भूमिका घ्यावी ? असे विचारले होते.  तेंव्हा त्यांना मी म्हणालो होतो की, आपण तटस्थ राहू . तसे आजवर तटस्थच होतो. पण  सध्या समाजाच्या  साधु संतांविषयी ज्या गलिच्छ भाषेत लिहिले जात आहे. ते पाहुन सक्रिय व्हावे लागत आहे. गोद्री कार्यक्रमाला मी उपस्थित राहणारच आहे. आपणही  मानसन्मनाची अपेक्षा न करता, स्वतःला व्हीआयपी न समजता  समाजाचा एक घटक म्हणून प्रत्यक्ष उपस्थित राहुन वास्तव काय ते जाणून घ्यावे आणि चांगले ते घ्यावे. बाकीचे तेथेच  सोडून द्यावे. 


*चलो गोद्री ! चलो गोद्री !! चलो गोद्री !!!*


          *- फुलसिंग जाधव, औरंगाबाद*


*संपर्क : 8999098265*


==================.========

Post a Comment

0 Comments