Subscribe Us

दीक्षाभूमी एक प्रेरणास्थान


 विचाराचं ,ज्ञानाचं खंर सोनं लुटण्याचं एकमेव प्रेरणास्थळ- दीक्षाभूमी.


पाच कोटी रूपयाची पुस्तक विक्री.



याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372*


काल दसरा आणि धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. मी सकाळी सकाळी बाजारात फेरफटका मारला असता. आपट्याची पानं,झेंडुची फुल ,आंब्याची तोरणं घेण्यासाठी बहुजनाची प्रचंड गर्दी उसळली होती . तेवढ्यात माझा *परिवर्तनवादी मित्र इंदल राठोड भेटला!*. दोघांनी एकमेकाला  दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि  *इंदल राठोड ने सांगितले की, दीक्षाभूमीवर गेल्या दोन दिवसात पाच कोटी रुपयांची पुस्तके विक्री झालेली असून खरं विचाराचं,ज्ञानाचं सोनं लुटण्याचं प्रेरणास्थळ- दीक्षाभूमी आणि माँ जिजाऊसृष्टी आहे!*

. या इंटरनेट जगातही दीक्षाभूमी वर दरवर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने  लाखो आंबेडकरवादी बांधव एकत्र येतात. आणि दोन-तीन नव्हे तर पाच-सहा कोटीची पुस्तके घेऊन जातात.ही फार मोठी उपलब्धी आहे.  *अगदी तसेच 12 जानेवारीला सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊसृष्टीवर सुद्धा मराठा बांधव जमतात. आणि दोन ते तीन कोटीची पुस्तके खरेदी करतात.!*

 हा आकडा निश्चितच या इंटरनेट युगात  चक्रावणारा असला तरी तो पटण्यासारखा आहे. भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, मोक्ष, स्वर्ग, नरक, देव ,देवी, देवता हे सर्व त्यांनी नाकारलं .*अप्त दीप भव* स्वंय प्रकाशित हो.असे सांगून त्यांनी अंधश्रद्धेत बुडालेल्या हजारो जनजातींना प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखविला.आणि संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला. म्हणून *भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी हिंदू धर्मात जन्मलो. तरी हिंदू धर्मात मरणार नाही. अशी घोषणा केली. आणि ती 14 ऑक्टोबर 1956 रोजी अमलात आणून नागपूर मध्ये बौद्ध धम्म स्वीकारला*.  आणि  हिंदू धार्मातिल मानवनिर्मित मनुस्मृतीने अधोरेखित केलेल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शुद्र या चातूर्वण्य व्यवस्थेला नष्ट करण्याकरिता आणि क्षमतेवर आधारित नवसमाज निर्मीती करीता आपले आयुष्य वेचले. मनुवादी व्यवस्थेने महार ,मांग, चांभार अशा अनेक जातींना न्याय, हक्क ,अधिकार यापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय, बंधुता हे संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. त्याचीच फलश्रुती म्हणून हा आंबेडकरवादी समाज आज सगळ्याच जाती-जमातींना मागे टाकून तो फार पुढे गेलेला आहे. वाचाल तर वाचाल या म्हणी प्रमाणे आंबेडकरवादी समाजाला पुस्तकाचे महत्त्व कळले. त्यामुळेच ते ऐवढी मोठी खरेदी करतात. एवढेच नव्हे तर *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही!*. ही गोष्ट हेरून  या आंबेडकरवादी समाजाने शिक्षणामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे.आज सगळ्या विभागात या समाजाचे मोठमोठ्या पदावर लोक दिसतात. हे सर्व डॉ. बाबासाहेबांची देन आहे. परंतु मला दुर्दैवाने या ठिकाणी सांगावसे वाटते. की आमचा बहुजन समाज आजही सर्वच आघाडीवर फार मागे आहे. एकीकडे आंबेडकरवादी समाज मिळेल त्या साधनाने तो दीक्षाभूमीची रस्ता धरतो. बाबासाहेबाच्या या रक्तहिन  क्रांतीला आणि अस्थिकलशाला  अभिवादन करण्यासाठी  उपराजधानीतील सर्व रस्ते भीम अनुयायांनी फुलुन गेले आहेत.निळया पाखराचे हे थवे  पाच-सहा कोटी रुपयाची पुस्तके खरेदी करतो. आणि आपण त्याच जुन्याच परंपरा आणि रुढीला चिकटून आपट्याची पानं घरोघरी  वाटण्यात धन्य मानतो. ही फार मोठी शोकांतिका आहे? खंर विचाराच सोन आपण कधी लुटणार आहो बांधवांनो?


 *गौतम बुद्धाची मानवता*

  *सम्राट अशोकाचा विजय*

   *माँ जिजाऊचे सुसंस्कार*  

 *शिवरायाचा अतुल पराक्रम*


 ह्या गोष्टीकडे आपण कानाडोळा करत असून थोर समाजसुधारकांनी सांगितलेल्या वचनाचे आपणास विसर पडलेला आहे. खरं  बघितलं तर हजारो वर्षापासून मनुवादी व्यवस्थेने तमाम बहुजन समाजाला न्याय, हक्क, अधिकारापासून वंचित ठेवून आपले जगणे मुश्किल केले होते. कुत्रा, मांजर आणि डुकरालाही पाणी पिण्याची मुभा असतांना आपल्याला मात्र पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कुटुंबाची देखभाल न करता ते बहुजन समाजासाठी अहोरात्र झटले. आणि चवदार तळ्याच्या माध्यमातून आपणास तो हक्क मिळवून दिला. एवढेच नव्हे तर बहुजनांना मंदिरात जाण्याचा प्रवेश सुद्धा नव्हता. तो सुद्धा काळाराम मंदिर प्रवेशाने बाबासाहेबांनी मिळून दिला. हे आपल्याला विसरून चालता येणार नाही.


 *तुकोबाच्या गाथेची सत्यता*

 *सेवालाल महाराजांचे उपदेश*

 *ज्योतिबाचे कृतिशील कार्य*

 *क्रांतीज्योती सावित्रीचे शिक्षण*


 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तमाम स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी झाली. असताना आज बहुजन समाजातल्या माझ्या भगिनी हिरवी साडी, पिवळी साडी, अशा नवरंगाच्या साड्या  नवदिवस घालून उपास -तपास, होम हवन, पूजा- अर्चा करून स्वतःचा जीव तर धोक्यात घालत आहे. पण येणाऱ्या पिढ्या सुद्धा त्या बरबाद करत आहे. हे अत्यंत खेदजनक असल्याचे मला वाटते. श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नको. माझ्या काही भगिनी हप्त्यातील चार चार दिवस उपास तपास करून अगदी मनाने नाही. तर सरळ शरीराने सुद्धा त्या खचलेले आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडल्यानंतरही या माझ्या भगिनी कोण कोणत्या देवीच्या पूजा करतात हे इथे न सांगणेच बरे होईल? 

*संत सेवालाल महाराज आपल्या वचनात म्हणतात  भजो मत। पुजो मत।। भजने पुजनेम वेळ घाले पेक्षा करणी करेर शिको.कोई केती मोठो छेणीं कोई केती नानक्या छेणीं. मार गोरशिकवाडीप ध्यान दिजो जाणंजो..छाणंजो...पचंच..माणंजो।* शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे अंतिम सत्य असल्यानंतरही आपण जर देवधर्म, कर्मकांड, उपास- तापास पूजा-अर्चा यांचे मागे लागत असू तर निश्चितच आपली प्रगती नाही. तर अधोगतीच होणार? 


 *शाहू राजांची समान समता*

 *बाबासाहेबांची उत्तुंग विद्वता* 

 *माता रमाईची त्याग्यी वृत्ती*

 *संत गाडगेबाबाचा मूलमंत्र!*


 संत गाडगेबाबांनी आपल्याला विज्ञानवादी जिवन जगण्याचा खरा मूलमंत्र दिला. अनेक गोष्टी सांगून त्यांनी देव, धर्म,स्वर्ग,नरक,ग्रंथ, पोथी ह्या सगळ्या भाकड कथा आहे. हे आपल्या कीर्तनातून पटवून दिल्यानंतरही आपण गणपती उत्सव, देवी उत्सव ,यामध्ये अमाप पैसा खर्च करतो.  बहुजनाचीच मुले कावडयात्रा, गणपती उत्सव, देवी उत्सव आणि वेगवेगळ्या जयंतीमध्ये डीजेवर थिरकतांना दिसतात. मला या ठिकाणी सांगावसे वाटते की, या सगळ्या उत्सवांमध्ये स्वर्णजातीची मुले का येत नाही. कारण त्यांना शिक्षणाचा मूलमंत्र गवसलेला आहे. त्यामुळे बहुजनांची मुले जेव्हा गणपती उत्सव, देवी उत्सव, जयंती ,दहीहंडी,कावडयात्रा  करत बसतात. त्यावेळेस स्वर्णाची मुले एमपीएससी, यूपीएससीची तयारी  करतात. आणि मोठ्या पदावर जातात. त्यामुळेच त्यांची प्रगती दिवसेंदिवस होत असून बहुजन समाजाची प्रगती चा आलेख मात्र दिवसेंन दिवस कमी कमी होताना दिसतो आहे. त्याचे कारणच असे की आपण विचाराचा,ज्ञानाचं सोनं लुटतच नाही ?  तर भाकड कथा, अंधश्रद्धेच सोनं आपण दरवर्षी लुटत असतो. 

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्चशिक्षणाकरता परदेशी गेलेले असताना ज्या माऊलीने आपल्या संसाराचा गाडा शेण गोवऱ्या वेचून  एकटीने उपसला. त्या त्यागमूर्ती रमाईने बाबासाहेबांकडे आयुष्यात एकदाच पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घेण्याची इच्छा प्रगट केली. परंतु स्वाभिमानसूर्य बाबासाहेबांना आपल्या पत्नीच्या संभाव्य अपमानाची कल्पना सहन न होऊन ते तिला पंढरपूरला जाण्यास नकार देत मोठ्या आवेशपूर्ण उद्धेगाने म्हणाले की, जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर लोटते, त्या पंढरपूरची कथा ती काय? आपल्या उभयतांच्या पुण्याइने, स्वार्थत्यागाने आणि सेवेने आपण दुसरी पंढरी निर्माण करू...!* आणि केली.  ती आज भीम अनुयायांची  धार्मिक पंढरी नसुन ज्ञानपंढरी आहे. म्हणून भिम अनुयायांची दरवर्षी अलोट गर्दी जमत असते.

भीम अनुयायी जेव्हा दिक्षामुभीवर खंर विचारचं,ज्ञानाचं सोनं लुटत असताना मात्र आज मुबंई मध्ये  दसरा मेळाव्याच्या निमित्ताने गर्दीचे सोनं लुटण्याचा आटापिटा होत आहे. आज बहुजनांच्या घरी जर आपण गेलो. तर तो प्राध्यापक जरी असेल तरी त्याच्या घरामध्ये दोन पुस्तक सापडत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. कारण वाचण्याचा आणि आपला संबंधच येत नाही. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. यासाठी आपण तमाम आंबेडकरी जनतेचे अनुकरण केले पाहिजे. आंबेडकरी समाज गरीबातला गरीब जरी असेल तरी तो चार-पाचशे रुपयाची पुस्तके दीक्षाभूमीवर खरेदी करतो. आणि  खरं विचाराचं,ज्ञानाचं सोन तो लुटत असतो.  परंतु बहुजन समाजाला हे केव्हा जमेल हे काही आजतरी निश्चितपणे सांगता येत नाही. 

*गेल्या दोन ते तीन दिवसापासून भारतातीलच नव्हे तर विदेशातील आंबेडकरी अनुयायी, विचारवंत आणि आंबेडकरी समाज जे मिळेल त्या साधनाने ऊन, वारा, पाऊस या कशाचीही पर्वा न करता .तो दीक्षाभूमीवर  जाऊन धडकलेला आहे. आणि खरं विचाराचं ,ज्ञानाचं सोनं तो दीक्षाभूमीवर लुटत आहे! त्यामुळे आंबेडकरी समाजाला आपण सॅल्यूट केलेच पाहिजे.!* 

 आणि आपण आपटयाची पान घेऊन खोटं सोन घरोघरी वाटण्यात धन्यता मानत आहो. आणि काही आपले बांधव सोने खरेदी मध्ये गुंग आहे. कसा सुधरणार बहुजन समाज ? अशी परिस्थिती जर राहिली. तर बहुजन समाजाला 400 ते 500 वर्ष प्रगतीच्या दिशेने जाता येणार नाही. ही काळया दगडावरची रेग आहे. मी काल काही अशी माणसं बघितली की, ते नवरात्रीमध्ये अनवानी चालतात .पण काही माणसे अशी आहे की, त्यांनी या नवरात्रीमध्ये बोलणं सुद्धा बंद केलेला आहे .म्हणजे मौनव्रत ठेवलेला आहे. यावरून अंधश्रद्धेच्या पायी बहुजन समाज काळयाकुट अंधाराकडे जात आहे. बरं बहुजन समाजातील अशिक्षित मंडळीच या अंधश्रद्धेला आणि कर्मकांडाला बळी पडलेली आहे असे म्हणता येणार नाही. तर बहुजन समाजातील उच्चशिक्षित सुद्धा या अंधश्रद्धेला बळी पडून अत्यंत संघर्षमय जीवन ते जगत आहेत. 

*आज शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज , प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी अंधश्रद्धेतून बहुजन समाजाला काढण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली.!* तरीही बहुजन समाज अंधश्रद्धे मध्ये दिवसेंदिवस गुरफटत जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अंधश्रद्धा, कर्मकांड यामधून बहुजन समाजाला वाचवायचे असेल तर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आंबेडकरवाद आणि विज्ञानवाद स्वीकारलाच पाहिजे. नाहीतर बहुजन समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. पाच कोटी रुपयाची पुस्तके घेणाऱ्या तमाम आंबेडकरी जनतेला धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!

जय भिम..जय..सेवालाल!



(नोट- या लेखातील सर्व ओळी कवी ताधों चव्हाण यांच्या  सोन्यासम नाते जपा या कवितेतल्या आहेत.) 


याडीकार  पंजाबराव चव्हाण पुसद -

94 21 77 43 72*

Post a Comment

0 Comments