Subscribe Us

किताबे कुछ कहना चाहती है


 "किताबे कुछ कहना चाहती है" या सदराखाली आज उद्याचा मराठवाडा पेपर मध्ये "कवी विनायक पवार यांच्या कवितासंग्रहाची" ओळख आपणासाठी...

**************

बिघडलेल्या वर्तमानाच्या पाऊलखुणा!: "नामुष्कीचे पिढीजात वर्तमान."


  आपण ज्या काळात जगतो, वावरतो तो काळ ललित साहित्यातून मांडणे कठीण काम असते.त्यातही तो काळ जर अधिक गुंतागुंतीचा असेल, जगण्याचे, विचार करण्याचे संदर्भ बदलत असतील तर हा काळ शब्दातीत व्यक्त होणे अधिकच कठीण होऊन जाते. आपण सर्वजण सध्या ज्या काळात वावरत आहोत तो काळ असाच व्यामिश्र जीवनानुभवाचा आहे. अपवाद वगळता आज सर्वत्र आणि सर्व क्षेत्रांत जागोजागी नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे, अशा नामुष्कीचे जीवनानुभव नव्या पिढीतील कवी, गीतकार विनायक पवार यांनी आपल्या कवितेत प्रभावीपणे उभे केले आहे.

  मौज,नव अनुष्टुभ, कविता रती,काव्याग्रह,खेळ, प्रतिष्ठान, उद्याचा मराठवाडा... या सारख्या दर्जेदार नियतकालातून विनायक पवार यांची कविता मराठी रसिकांपर्यंत पोहचली होती.या सर्व कविता अथर्व पब्लिकेशन, धुळे ने मार्मिक मुखपृष्ठासह कवितासंग्रहाच्या रूपाने आपल्या समोर पुन्हा एकदा आणली आहे.आम्ही गावाकडचे लोक,शेतीची माती होते तेव्हा,अभावाचे डोहाळे,बळावणारं दुखणं,ज्याचा त्याचा पाऊस, पावसाळ्याचा वाढदिवस,दिवसांधळं, बाकी समदं ठीक....या कवितेच्या शीर्षकावरूनच आपणास त्यांच्या कवितेचे वेगळेपण लक्षात येते.समकालीन वर्तमान कवेत घेताना कवीला जागोजागी नामुष्की दिसते.'तुम्ही गायी पाळा' म्हणणारे 'स्वत: तलवारी पाळत आहेत,याच दुःख कवीला नाही पण "नाग चावला अन् बाप गेला, तरीबी माय न चुकता पंचमीला वारूळाला जाते"(पृ.११)याच कोडं कवीला उलगडत नाही.नाग हा प्रतिकात्मक आहे.ज्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उभे राहावं तेथे शरण जाणारी माणसंच आजूबाजूला दिसत आहेत.अशावेळी,"सर वर्गात शिकवीत असताना, एका लोकशाही विद्यार्थ्यांनं विचारलं,सर! हे बदलणार नाही का?, तेवढ्यात घंटा वाजली.."(पृ.२५)प्रश्नच हवेत विरून जात आहेत.आभासी जगाची आम्हाला एवढी सवय झाली आहे की, आम्ही ज्या पात्रांचे अभिनय करतो त्या पात्राच्या अगदी विरुद्ध जीवन जगतो. 

"गणपत रावण झाल्ता

परवा त्याची बायको पळून गेली,

खंड्या श्रावण झाल्ता

दारू पेवून मायीला शिव्या घालतो"(पृ.४४) लक्ष्मण चे पात्र करणारा शाम  वाटणी करताना भावाच्या डोक्यात दगड घालतो...असा हा सर्वत्र नामुष्कीचा काळ आहे.

राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक.. सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने बदल होताना दिसतो आहे.हा बदल अस्वस्थ करून जाणारा आहे.प्रेरणा घेऊन पुढे जाणारा नाही.'पारावर रिकामं बसून राजकारण शिजविणारा','हा गाभडत जाणारा काळ,चिभडत जाणारी वेळ आहे',झोपडी शेजारीच एकशे तेहतीस के.व्ही.उपकेंद्र असूनही झोपडीत मात्र शेतकानुशतके अंधार आहे','धोंडिबाचं पोरगं नवकरीला लागलं, धोंडिबा आता भीक मागतो' कारण हे सर्व 'बिघडलेल्या वर्तमानाच्या पाऊलखुणा' आहेत.म्हणून कवी चिडीला येऊन म्हणतो,"एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर, मोक्याच्या ठिकाणी,एखादा दर्गा, एखादं मंदिर, अथवा एखादे विहार बांधा.धक्का लागला म्हणून तणाव निर्माण करता येईल,भरत आलेल्या जखमांवर मीठ चोळता येईल'.

   कवितेत आलेल्या प्रतिमा, प्रतिके कवितेच्या आशयाला उंचीवर नेऊन ठेवतात.सहानुभूतीचं तेल,वेदनांचे वृक्षारोपण, व्यवस्थेचं एन्काऊंटर,वांझ मळा, हिरवळीचे डिजिटल बॅनर,डिटोनेटरच्या ओव्या, ढसाळ पाऊस,

वाशांचे ठिगळ... अशा असंख्य प्रतिमा कमी शब्दात अर्थाचे अनेक वलय शब्द घेऊन वाचकांना विचार करायला भाग पाडतात.आजची शेती आणि शेतकरी हा कवीच्या चिंतनाचा विषय आहे.पाऊसाची विविध रूपे, दारिद्र्य, गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा जसा कवी आपल्या कवितेतून मांडतो तसा पूर्वीचा गाव राहिला नाही ही खंतही त्याला आहे.

    "वाघ होता गाव तेव्हा,आग हाती घ्यायाचा,घाम होता देव त्याचा,त्याला फुले वाहायचा"

पण आजचा माझा शेतकरी बाप कासऱ्यालाच मरणाचा आसरा मागतोय. हे भयावह वर्तमान तो आपल्या समोर उघडे करतो.

थोडक्यात 'भारत जागतिक महासत्ता' होणार म्हणून आभासी जगात वावरणारे आपण, आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे हे विसरून चालणार नाही. याचं भान कवी आपल्याला कवितेच्या विविध प्रतिमातून करुन देतो.


प्रा डॉ शंकर विभुते नांदेड.

भ्र.७५८८०६८०५६.

Post a Comment

0 Comments