Subscribe Us

तांडा'कार : बंजारा साहित्य सागराचा दीपस्तंभ


 तांडा'कार : बंजारा साहित्य सागराचा दीपस्तंभ



[आज २३ मे 'तांडा'कार आत्माराम राठोड, या युगंधर साहित्यिकांचा स्मृतीदिन हा 'बंजारा साहित्य दिवस' म्हणून साजरा करण्याचा घोषित केला जात आहे. याप्रसंगी त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा साहित्यिक व विचारवंत एकनाथ पवार -नायक यांचा हा प्रासंगिक लेख..]

 www.tandesamuchalo.in



मुंबईच्या ऑगस्ट क्रांतीपासून शिक्षण आणि स्वराज्य संस्कृतीचा यात्री बनणार्‍या संविधाननिष्ठ थोर समाजसुधारक महानायक वसंतराव नाईकांच्या आधुनिक विचारसंगरामुळे तांडयात विचारवंत, इतिहास संशोधक बळीराम पाटीलाच्या साक्षीने सृजनशील विचारांचे पहिल्यांदा दीपप्रज्वलन झाले. तर याच पुरोगामी निखार्‍यानी पेटून उठणार्‍या विद्रोही नायकांचा जन्म १३ जानेवारी १९४८ रोजी यवतमाळ जिल्हयातील एका तांडयात झाला. अभावग्रस्त जीवनाच्या  धगधगत्या अग्नीज्वालात पुरोगामी विचाराची चिकीत्सा करून मुक वेदनांना शब्द देणारा हा शब्दयोगी, बंजारा साहित्य सागराला लाभलेला दीपस्तंभ म्हणजे 'तांडा'कार आत्माराम कनिराम राठोड होय.


      त्यांच्या पासष्टी जयंतीनिमित्याने दैनिक सकाळ मध्ये नऊ वर्षापूर्वी  'साहित्यातला क्षेपणास्त्र' या शिर्षकाखाली माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. यानिमीत्याने माध्यमजगतात पहिल्यांदाच तांडाकार प्रकर्षाने समोर आल्याचे जाणवले. पुसदच्या चौकात आणि तांडयात सकाळ पेपर आनंदाने वाटल्याचे फोन मला त्यांच्या कुटुंबातील एका युवकांनी कळवीले. आणि दुसरा प्रसंग म्हणजे त्यांचा भ्राता शंकर राठोड यांनी गत तिन वर्षापुर्वीच्या स्मृतीदिन कार्यक्रमात मला चक्क मिठ्ठी मारत म्हणाले, ''साहेब, असा तांडाकार मी पण पहिल्यांदाच ऐकला'' असे म्हणून आपल्या पाणावलेल्या डोळयावर त्यांनी हात ठेवला. खरच 'तांडा'कार तांडयाला माहित होणे अतिशय गरजेचे आहे. म्हणून हा लेखनप्रपंच.


     'तांडा' आणि 'लदेणी' ही त्यांची नावाजलेली तसेच बहुधा तांडयाला पहिल्यांदाच साहित्याशी जोडणारी ही विचारसंगरातील अभेद्य दूर्ग. बंजारा समाजाला साहित्याची परिभाषाच तांडाकारामुळे गवसली. 


          ''मातीचा गौरव 


           भूमीची स्तोत्रे खूप झाली


          आता माणसाविषयी 


           लिहिणे आहे.'' 


ही माणुसकीची आर्त हाक त्यांच्या शब्दात होती. बंजारा संस्कृती ही तशी वैविध्यतेनी नटलेली जणू एक सौंदर्यवती. तांडा भावविश्वात गातही होता.परंतु आता तांडयाने या गीताला सर्जनशीलतेची, अस्मितेची नव्या आशयाची युगंधर आयुधे  दयायला सुरुवात झाली. त्यामुळे  एक चिंतनशील आयुध म्हणजे तांडाकार म्हणता येईल. 


       ''अजून तर , 

      आमच्यापर्यंत यायची आहे

      बैलांनाही मिळणारी विश्रांती वर्षातून एक दिवस पोळयाची.'' 



हा एकुणच शोषणाचा प्रखर समाचार म्हणायला हवा. ज्या समाजाने आयुष्यभर व्यवस्थेला रसद पुरवीली, त्याच्या पदरी मात्र समाजवाद फिरकलाच नाही. समाजाला शेकडो वर्ष उपेक्षेचे जीवन जगावे लागले.  ही भयाण वैषम्यता, प्रखरता 'तांडा'काराने पहिल्यांदाच शब्दबद्ध केली. त्यांच्या 'तांडा' आत्मकथनाने तर एकुणच साहित्यविश्वात मुकवेदनेचा जणू एक जाहिरनामा  मांडल्यासारखेच होते. जागतिक ख्यातीचे लेखिका महाश्वेता देवीने तर पुढे 'तांडा' बंगाली भाषेतही आणला. यानंतर  १९६९ मध्ये बंजारा गोरमाटी भाषेतला 'धरतीचे धनी' हा कथासंग्रह तसेच 'हामार गोरूर बालबच्यार साकी'(२००१)  हे संपादित पुस्तक प्रकाशित करून बंजारा बोलीला साहित्यविश्वात नवे अधिष्ठान मिळवून देणारा हा त्यांचा पहिलाच अभिनव साहित्यप्रयोग होता. यामुळे साहित्यविश्वात पहिल्यांदाच बंजारा गोरमाटी भाषेला नवा आयाम मिळाला. तांडा आत्मकथनामुळे बंजारा समाजातील खदखद पहिल्यांदाच पुढे आली.


       "या पुढची घटना    

       आम्हीही लिहू

       आमची भाषाच अजूनही

       लिपीबद्ध व्हायची आहे.'' 


हा दुर्देम्य आशावाद त्यांनी अधोरेखित केला.  'तांडा'कार हे एक संवेदनशील कवी होते. हाडाचे विद्रोही कार्यकर्ते होते. 'श्री संत सेवादास लिलाचरित्र' या पुस्तकास पुणे विदयापीठाचा पुरस्कार मिळाला.  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखिका महाश्वेता देवी, यदूनाथ थत्ते आणि प्रख्यात विचारवंत डाॅ.यशवंत मनोहर यांच्याशी त्यांचे स्नेहबंध होते. केळझरा येथील आंबेडकरी साहित्य संमेलनाचे, नंदूरबार येथिल विद्रोही साहित्य संमेलनाचे व विदर्भ साहित्य संघाचे कुरखेडा येथील पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन तांडाकारांचा गौरव सुद्धा झाला. बंजाराच नव्हेतर विमुक्त-भटक्यासह एकूणच मराठी साहित्यप्रभाचे दूर्ग गौरवान्वीत केले. अशा थोर साहित्यिकाची 'एक्झिट' ही समाजाच्या, कुटुंबाच्या आणि बुद्धीजीवीच्या दुर्लक्षितपणामुळे देखिल झाली, असे म्हणायला काही हरकत नाही.  उत्तरार्धात अनेक पहाडानी चालवलेला छळवाद त्यांच्या शब्दातून ओसंडत होता. मरणाशी त्यांनी अनेकदा तह केले. प्रेम आणि कारूण्याने जगावर अधिराज्य करणाऱ्यां प्रभू येशूला स्विकारत 'डॅनियल राणा' या रूपातही लेखन मात्र थांबवले नाही. 'जळतो आहे, जळता जळता लिहितो आहे' हे त्यांचे  शब्द मनाला अतिशय चटका लावणारे ठरले. २३ मे २००५ रोजी तिव्र उष्माघाताने त्यांची प्राणज्योत मालवली. उन्हातच आयुष्य घालवणार्‍यांना उन्हामुळे मरण यावं, यामुळे कदाचित मृत्यूदेखिल भांबावला असावा. ही शोकांतिका खरच मन सुन्नं करणारी आहे. अशा प्रतिभावंत साहित्यिकांना गमावत राहणे हे समाजाला परवडण्यासारखे नाही. समाजाने प्रतिभावंताला जपले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व संजय राठोडाच्या पुढाकारातून होत असलेल्या पोहरागड येथील नंगारा वस्तुसंग्रहालयात साहित्याचा व प्रतिभावंताच्या स्मृती जपण्यासाठी स्वतंत्र दालन साकारले तर अतिशय प्रेरक ठरेल. 


       तांडा पेटून उठावा, बंजारा समाजाला प्रखर साहित्य लेखनत्वाची गोडी लागावी, साहित्याने समाजात समृद्धी यावी असा आशावाद बाळगणारे, सामाजिक न्यायासाठी जीवाचा लाहिलाही करणारे समतेचा निरंतर ध्यास जपत माणूसकीचा शब्दपताका झळकवत शोषकाविरूद्ध रणशिंग फुंकणारे 'आत्माराम कनिराम राठोड' यांच्या क्रांती मनाच्या प्रतिभेने बंजारा साहित्य चळवळ प्रदीप्त व्हावी, गतिमान व्हावी. शोषित-उपेक्षितांची मुकवेदनेला अधिष्ठान देऊन माणूस उभारणीची पेरणी व्हावी.हिच 'बंजारा साहित्य दिवस' या स्मृतीदिनी खरी आदरांजली ठरेल.


      *****


•(लेखक , 'तांडेसामू चालो' चळवळीचे प्रवर्तक आहे.)


नागपूर, इमेल : tandesamuchalo@gmail.com

Post a Comment

0 Comments