Subscribe Us

ऐतिहासिक मुल्ये-नवी चौकट* *सेवादळ ! सेवादळ!*


 ऐतिहासिक मुल्ये-नवी चौकट

सेवादळ ! सेवादळ!


मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे तो समुह व समाजप्रिय सुद्धा आहे. समाजामध्ये त्याची जडणघडण सातत्यपूर्ण होत राहते,त्यामुळे समुह व समाजाचे अलिखित नियम तो पाळत असतो व हेच नियम पुढे जसजसा समाज, समुह उत्क्रांत होत जातो, तसतसे रितीरिवाज व रुढी पुढील पिढीसाठी हस्तांतरित होत राहतात म्हणूनच समाजाचे वेगळेपण २१ व्या शतकातही ठळकपणे दृष्टीस पडते. धाटी,प्रथा, परंपरा व रितीरिवाज नुसते बोलीभाषा व लोकजीवन यामधूनच प्रकट होतात असे नाही तर त्यामध्ये संघभावनेचेही विचार दडलेले असतात,व त्या विचाराचे भरणपोषण करण्याचे काम तांडा वा समुह व्यवस्थेने करावे हे अभिप्रेत असते. तांडा, पाडा वा समुह व्यवस्था हे काम प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे करत असेल तर पुढील पिढीला वैचारिक हस्तांतरण सातत्यपूर्ण होत असते अन्यथा समाजव्यवस्था कोलमडून पडायला वेळ लागत नाही.

आपण तांडा व्यवस्थेबद्दल तपशीलवारपणे चर्चा करु या!साधारणपणे बंजारा समाजाच्या यातायात व्यवस्थेला तांडा हे नामाभिधान पडले आहे व पुढे स्थिरावल्यानंतर त्या वसाहतीला तांडाच संबोधले जावु लागले. नायक व सहकारी ही व्यवस्था ब्रिटन मधील हाऊस ऑफ लोर्डस या सभागृहासारखी आहे, ही व्यवस्था बदलत नाही. वंशपरंपरागत चालु राहते. असे असले तरी लोकशाही मुल्ये मात्र जपली जातात.न्याय नसाब तांड्याबाहेर गर्द सावलीत पाण्याचा स्रोत पाहुन घेतल्या जात असे. आता मात्र प्रत्येक ठिकाणी समाजमंदिर, सभा मंडप बांधलेले आहेत, हा बदल स्विकारता आला पाहिजे.संस्कृती म्हणून त्याला चिटकून राहू नये, या नव्याने उभ्या राहिलेल्या वास्तूंचा लाभ घ्यावा.

२)समुहाने एकाच भूभागावर वास्तव्य असले तरी वसाहत गावापासून वेगळी व उंचीवर आढळते. सर्व उगवत्या सूर्याकडे पूर्वाभिमुखी घरे हे वैशिष्ट्य. आता कालानुरूप त्यामध्ये बदल जाणवत असले तरी मुळ ढाचा अबाधित ठेवण्याकडे कल जाणवतो.

३)एकच गोरबोली व इतरांशी प्रादेशिक भाषेत संवाद.

४)इतर धर्मियांच्या प्रथा परंपरा पेक्षा वेगळी धाटी अर्थात बांधणी.

५)सण, उत्सव, तीज व विवाहादी कार्यक्रम निसर्गाशी मौलिक नाते सांगणारे घटक.

६)खगोलशास्त्राचे आवश्यक ज्ञान व भौगोलिक माहिती.

७)उच्च दर्जाचे मौखिक साहित्य, मारवाड प्रदेशातील भाषेचा प्रभाव.जात्यावरील गीते,ढावलो,हवेली गीत इत्यादी.

८)महिला व पुरुषांचा पारंपरिक पेहेराव, मुलींसाठी पोलके ओढणी इत्यादी.

९)नगारा हे पारंपरिक प्रमुख वाद्य.दररोज सायंकाळी रानातून गुरे परततांना नगारा वाजविला जात असे व तांड्यातील आबालवृद्ध जेथे असतील तेथुन हात जोडून वंदन करत असत.नीतिमूल्ये जपणारी ही परंपरा आज संपली आहे.आपण काय कमावले व काय गमावले?याचा ताळेबंद काढला तर मॉडर्न लाईफ, थोडाफार पैसा व बंगला कमावला पण हव्यासापोटी अनेक नीतिमूल्ये आपण गमावली आहेत. वास्तविकता या दोन्हीही गोष्टी करता आल्या असत्या!

सर्वसाधारणपणे आपला ताजबाज सांभाळून असलेला गोरबंजारा व तत्सम समाज आपली व्यवस्था टिकवून होता. मात्र काळ बदलत राहतो, शिक्षणाचे वारे वाहू लागतात, दूरदर्शन, दळणवळणाची साधने इत्यादी मुळें जगच जवळ आले व प्रकर्षाने सर्वच समाजात बदल दिसायला लागले. या बदलांमुळे अतिरेकही स्पष्टपणे दिसायला लागला. बदल स्वीकारून प्रगतीकडे वाटचाल करणे शक्य झाले आहे, हे मात्र नाकारता येत नाही.

व्यवस्थेच्या चौकटीची मोडतोड करुन आपण बदल स्वीकारत गेलो तर फक्त ऐतिहासिक खाणाखुणाच पुढच्या पिढीला दिसतील व पुर्ण समाज आधुनिकतेच्या नावाखाली लयाला गेलेला दिसेल, हे ५ डिसेंबर २०२३च्या"गहुली ते दिल्ली लदेणी गोरबंजारा जन जागरण २२दिवसाच्या यात्रेत दिसून आले आहे असे लदेणी टीमचे संयोजक गोर विलास रामावत यांनी स्पष्ट केले आहे.

१२ ते १५ कोटी बंजारा समाज भारत देशात राहतो असे सांगितले जाते. फक्त महाराष्ट्रात बोलीभाषा, संस्कृती व सभ्यता, लोकजीवन टिकून आहे. मध्यप्रदेशातील इंदोर पर्यंत गोर संस्कृती व सभ्यतेचे पुसट पुसट होत जाणारे अवशेष पाहायला मिळतात. गुजरात, राजस्थान या राज्यात बोलीभाषा नष्ट झाली आहे तर उत्तरप्रदेश, हरियाणा व पंजाब राज्यात धाटी व्यवस्था पूर्णपणे विस्मृतीत गेली आहे तेथे संस्कृती व भाषेचे अवशेष सुद्धा दिसत नाहीत.तांडा व्यवस्था व भाषा टिकली नाही तर गोर बंजारा समाज मरायला वेळ लागणार नाही, ही विदारक स्थिती आहे. तेलंगणा व कर्नाटक राज्यात ५०% व्यवस्था ध्वस्त झाली आहे. कोणताही समाज मृतप्राय करायचा असेल तर त्यांचे साहित्यात इतर धर्मियांचे विचार व थोरपुरुष संपविणे हा असतो. संत सेवालाल महाराज व वसंतराव नाईक ही समाजाची सर्वोच्च श्रद्धास्थाने आहेत. दिल्ली लखिशा बंजारा यांची कर्मभूमी आहे. गहुली गौरव भूमी आहे. पोहरादेवी संत सेवालाल महाराज यांची वंदनीय भूमी आहे. यांच्या पवित्र विचाराने देश व देशाबाहेरील सकल बंजारा बांधावा लागेल.

मोठ्या प्रमाणात बंजारा समाजा मध्ये धर्मांतर घडून येत आहे. ख्रिश्चन, शीख, मुस्लिम व बौद्ध धर्माकडे लोकांना वळविल्या जात आहे, ही धोक्याची घंटा आहे. साहित्यातील घुसखोरीमुळे धर्मांतराचा वेग वाढला तर या समाजाचे अस्तित्व संपल्यात जमा होणार आहे.

बंजारा समाजामध्ये अनेक संघटना काम करत आहेत. ग्रास रूटवर जावून काम करावे लागेल. गोर बंजारा समाजातील बदललेल्या व्यवस्थेला काळानुरूप कोंदण देवून परंपरागत मुल्ये नव्या चौकटीत विराजमान करावी लागतील, त्यासाठी राजकारण विरहित उद्देशाने"नवी चौकट जुनी मुल्ये"या धर्तीवर, या विचारावर काम करावे लागेल.आपले राष्ट्रीय योगदान व सेवाभावी काम ठळकपणे दिसावे.

मुस्लिम, शिख व बौद्ध धर्मिय बांधवांनी एक नवी वैचारिक बैठक निर्माण करुन प्रगतीचे द्वार खुले करुन घेतले आहे.निराश्रित,मतिमंद,वृद्ध,गरीब,यांचे सेवेसाठी समता फाउंडेशन,लंगर,रमजान ईद व ईद उल फीत्तर मधील मदत,वैद्यकीय उपचार अशा अनेक कार्यामधून मानव सेवेचे अखंड व्रत केले जाते. कर्मयोगी गाडगे बाबांनी मंदिराऐवजी रुग्णालया जवळ मोठया शहरात धर्मशाळा बांधल्या.आज ह्या वास्तू गोरगरिबांना आधार वाटतात.माणूस बदलला पण या चळवळीत काम करणाऱ्यांनी विचार बदलला नाही, हे त्यांच्या प्रगतीचे कारण आहे. आपण मात्र इकडे तिकडे भटकत आहोत त्यामुळे बंजारा सैरभैर गोंधळलेला असल्याचे दिसून येत आहे.

सेवादळ हे नवे व्यासपीठ स्थापन करुन "नवी चौकट-व ऐतिहासिक मुल्ये"त्या दिशेने वाटचाल करावी असे वाटते कारण मुल्ये अजरामर असतात ती मरतही नाहीत, मारतही नाहीत व सरतही नाहीत. माणुस त्याच्या पौंड व किलोग्राम या वजनावरून भाजीपाला, धान्य, गरीबी श्रीमंतीचे वैभव वा वस्तूप्रमाणे मोजला जात नाही तर त्याने जतन केलेल्या मानवतेचे, मूल्यांचे व सदगुणांचे परीघ व व्यास किती विस्तारले आहे, यावरून ओळखला जातो व याच किर्तीने तो अजरामर होत असतो.थोरपुरुषांचे विचार त्रिकालाबाधित सत्य असतात,म्हणून त्यांचे जतन होवून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचले पाहिजेत.महापुरुषांनी निर्मिलेली"वाट"पुढे पुढे क्षितिजापार जात राहावी.

सेवादळ हे नवे संघटन उभारुन, पंजीबद्द करुन विश्वासाहर्ता या बळावर उभारी घेईल यात तिळमात्र शंका नाही.

आबालवृद्ध गोर बंजारा समाज या धाडसाचे स्वागत करुन

 गोर विलास रामावत व लदेणी टीम यांनी भारत भ्रमंतीतुन पाहिलेला, अनुभलेला गोरसमाज पुन्हा नव्या चौकटीत ऐतिहासिक वैचारिक मूल्याने पुढे नेवू या!



प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला

Post a Comment

0 Comments