Subscribe Us

अनटोल्ड वसंतराव नाईक-आय लव्ह यु डियर बर्ड


 अनटोल्ड वसंतराव नाईक


( आय लव्ह यु डियर बर्ड )


साधारणपणे १९७७ चा तो कालखंड असेल,मी बी ए तृतिय वर्षात शिकत होतो. दिवाळीच्या सुट्या संपुन कॉलेज पूर्ववत सुरू झाले होते. आम्ही पिरियड ऑफ असला म्हणजे कॉलेज परिसरातील आंब्याच्या झाडाखाली अभ्यास व गृहपाठ करीत असु. आंब्याच्या झाडाभोवती सिमेंटचे ओटे केलेले असल्याने ते सोयीचे असे. असेच एकदा मी, डी डी राठोड, धुमा रामू जाधव, रोहिदास चव्हाण,वाघुजी सुगदेव खिल्लारी, गजानन भास्करराव देशमुख,विश्राम काशिराम जाधव, देविदास मंगु पवार ओट्यावर बसलेलो होतो. कांहीजण  गृहपाठ करत असताना कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारातुन एक अँबेसिडर गाडी परिसरात आली.कोशाचा नेहरू सदरा व पैजामा परिधान केलेले, डोळ्यावर चष्मा लावलेले नाईक साहेब गाडीतुन खाली उतरले, सोबत मुलगा अविनाश सुद्धा होता.अगदी साधी राहणी. आम्ही त्यांच्या जवळ जावून त्यांना गराडा घातला. दर्शन घेतले. नाईक साहेब आमच्या बरोबर चालत आले. ओट्यावर येवून बसले. तोपर्यंत कोणालाही खबरबात नव्हती. माहीत झाल्यानंतर प्रा मनोहर थारकर व प्रा पुंडलिक धुमाळे आले, खुर्ची घेवून एक शिपाई आला. नाईक साहेबांना आम्ही त्यांच्या बालपणातील गोष्टी सांगाव्या म्हणून गळ घातली. एखाद्या आजोबांनी नातवांना गोष्टी सांगाव्यात तसे नाईक साहेब ओट्यावर बसूनच सांगु लागले. आम्ही जमिनीवर बसून ऐकू लागलो."गहुलीत शिक्षणाची सोय नसल्याने मला अनेक ठिकाणी जावून प्राथमिक शिक्षण घ्यावे लागले. येणे जाणे करण्यासाठी आमच्या वडिलांनी आम्हा दोन्ही भावंडांना घोडी घेवून दिली होती. कधीकधी घोडी आम्हाला खाली पाडून गावाकडे धावत निघून जायची. मग आमचा जंगलातुन पायी प्रवास सुरू व्हायचा. आम्ही कधीही शाळा बुडविल्याचे मला आठवत नाही. साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबर हा भोरी,सुगरण, शिंपी या पक्षांचा विणीचा काळ असतो.घरटी बांधण्याचा व अंडी घालण्याचा तो काळ असतो.काटेरी झुडपात खोपा बांधून भोरी हा पक्षी त्यात अंडे घालतो. गावातील कांही मुले या पक्षाची शिकार फासे टाकून करतात हे आम्ही पाहिले होते. एक तीळ सात भावानी वाटुन खाल्ला व एक तीळ चोरी गेल्याची  दंतकथा बंजारा समाजात प्रचलित आहे.भोरी पक्षाने एक एक तीळ जमा करुन सात तीळ आपल्या घरट्यात जमा केले. तिने मोजले असता सहाच तीळ भरले. तिने पिल्ले पक्षांना मारहाण केली व घरट्यातून हाकलुन लावले, पिल्ले उडून गेली, परत तिने तीळ मोजले आता ते तंतोतंत सात भरले. पिल्लांना हाकलुन देण्याचा तिला पश्चाताप झाला. तेंव्हापासून आजपर्यंत अजूनही भोरी पक्षी आपल्या खोप्यातुन उडून गेलेल्या पिलांना साद घालते "पित्या र पित्या ओव तल्ली पुरssपुर ss!अशी हाक देते.तुम्ही घरट्याकडे परत या!आम्ही सुद्धा घोडीच्या शेपटीचे दोन-तीन केश काढले व त्याचा फासा तयार केला. अलगदपणे भोरीच्या अंड्यावर पसरवून त्याची टोके जाड फांदीला बांधली. केसाचा रंग काळा असल्याने तो फासा भोरीला दिसत नसल्यामुळे ती अलगद जाळ्यात अडकते. आम्ही पुढे शाळेला निघून गेलो. सायंकाळी ५-०० वा शाळा सुटल्यानंतर आल्या पाय वाटेने गावाकडे परत येत असतांना पाहिले तर भोरी पक्षी फडफडतांना दिसून आली. थोडावेळ थांबुन पक्षाचे फडफडणे न्याहाळले. जीव वाचविण्यासाठी त्याचा आकांत सुरू होता. मला त्याचे डोळ्यातील कारुण्य दिसले. जीवनमरणाचा संघर्ष दिसला. हळूहळू माझे मन द्रवत चालल्याचे मला जाणवत होते. माझ्या वडील भावाची सुद्धा तीच स्थिती होती. आम्ही दोघांनी परस्परांकडे पाहून खोप्याकडे नजर टाकली आता मात्र भोरी निपचित पडली होती. तिची हालचाल मंदावली होती. अलगद आमच्या डोळ्यातुन अश्रुंचे थेंब पडले. निष्प्राण होण्यापूर्वी तिलाही जगण्याचे स्वातंत्र्य आहे. तिचे हे नैसर्गिक स्वातंत्र्य आम्ही का हिरावून घ्यावे? असा प्रश्न आम्हाला पडला अन त्या पक्षाभोवती आवळलेला फास आम्ही अलगदपणे मोकळा केला.पक्षी केविलवाणे आमच्याकडे पाहत होता. त्याला ओंजळीत घेवुन आकाशात सोडले. एक उंच भरारी घेवून पक्ष्याने मोकळा श्वास घेतला. "आय लव्ह यु डियर बर्ड"न कळत माझे मुखातुन शब्द बाहेर पडले.बंदीवानास मुक्त करणारा आमचा निर्णय अत्यानंद देवून गेला."शिक्षण घ्या!दुसऱ्याचे हक्क हिरावून घेवू नका!

आम्ही अविनाश भाऊंना बोलण्याचे सांगितले, त्यांनी भाषण न करता कॉलेजच्या गरीब विध्यार्थी फंडासाठी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली.

प्राणिमात्रावर दया, हीच ईश्वरसेवा होय हा लाख मोलाचा मंत्र दिला. मला आठवले ते संत सेवालाल महाराज की ज्यांनी उनकेश्वर च्या जंगलात मोराला अभय दिले होते. आत्म्याचा आत्म्याशी संवाद झाला की मानवता अखंडपणे,निर्मळपणे प्रवाहित होते.तेथे द्वेष किंवा मत्सरांचा लवलेशही राहत नाही.मन प्रगल्भ झालं की जाणिवा बदलतात व माणुस पशुपक्षांच्या बाबतीतही अधिक सहिष्णू व भावनाप्रधान होतो.पशुपक्षी आपापल्या अधिवासात मुक्तपणे विहार करतात पण आपण त्यांच्या अधिवासात अतिक्रमण करतो त्याचे काय ! खरेतर १८-१९ वर्ष वयोगटातील मुलांशी झाडाच्या सावलीत बसून ज्ञान हे व्यासंगातुन मिळविण्याच्या गप्पागोष्टी करणारा मुख्यमंत्री या राज्यात होवून गेला यावर भल्याभल्यांचा विश्वासही बसणार नाही. पण हे घडले आहे.त्यांचा स्वच्छ व्यवहार,मानवता, जाज्वल्य देशप्रेम, सामाजिक बांधिलकी,निसर्ग प्रेम व शेती निष्ठता मला सदैव वंदनीय वाटत आली आहे.


प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला

Post a Comment

0 Comments