Subscribe Us

जातीवंत सर्जनशील साहित्याची भाषा,गोरमाटी बोलीभाषा


 *वाते मुंगा मोलारी*

             My swan song



*जातीवंत सर्जनशील साहित्याची भाषा;'गोरमाटी बोलीभाषा'...!*


             *गोरमाटी* बोलीभाषेला समृद्ध लोकसाहित्याची मौखिक परंपरा आहे.तांडा अर्थिकदृष्ट्या दुर्बल असला तरी साहित्याच्या अंगाने तो श्रीमंत आहे."गद" म्हणजे बोलणे या धातूपासून "गीद"हा शब्द निघालेला आहे. 

            गीद म्हणजे गोरमाटी बोलीभाषक गोरमाटी गणसमाजी जीवनगाथा,गद्य वाङ्मय होय. 

                लेखन कला अस्तित्वात येण्यापूर्वी आपले लोकजीवन,इतिहास आणि संस्कृती आपल्या मौखिक परंपरेतून जतन करून ठेवण्याची प्राचीनकाळी एक पद्धत होती गीद हे त्याच परंपरेचे अवशेष होय.ज्याला वाङ्मय शास्त्राच्या भाषेत 'गद्यवाङ्मय म्हणता येईल. जेष्ठ अभ्यासक अशोक राजाच्या भाषेत गीद म्हणजे प्रारंभीचा वाणीचा व्यापार...!

             गोर स्त्रियांचे गीद आणि गीत म्हणजे अक्षर साहित्यच..! 

            गोर स्त्रियांच्या मौखिक साहित्यातून व्यक्त होणाऱ्या जीवनानुभवाला सामाजिक संदर्भ आहे. मौखिक परंपरेने जतन असलेल्या या साहित्याची बंडखोरी विषमताधिष्ठित समाज व्यवस्थेच्या विरोधात आहे.

           माणसाने माणसाशी सलोख्याने वागावे,जाती,वर्ण आणि वर्गभेद नष्ट व्हावा हा या गोरमाटी लोकसाहित्य आणि धाटीचा आग्रह आहे.

             गरिबी आणि श्रीमंती या विषमताधिष्ठित संस्कृतीवर  गोरमाटी लोकसाहित्य जोरदार हल्ला करते... 


*सण लं फकिरी...*

*कांयी दलगिरी..*

*सदा भजू हरि हरि ये..*

*कांयी जन खाणो सीराये पूरी*

*कांयी जन सीळे टकडा मळेनी बायीये..!*

*कांयी जन सोणो गादी गलीचा*

*कांयी जन गोदडी मळेनी बायीये..!*

*कांयी जन रेणो माडी हावेली*

*कांयी जन झुपडी मळेनी बायीये..!!*


         ऐक फकिरी! ही कसली सामाजिक व्यवस्था रूढ झाली गं?नतीजा ठनठन गोपाल? (सदा भजू हरि हरि) 

         एकीकडे उपासमारीने तडफडणारी माणसं तर दुसरीकडे पक्वाच्या मैफिली झुडणारी माणसं.एकीकडे गादी गालीचावर लोळणारी माणसं तर दुसरीकडे धड गोधडी सुद्धा पांघरायला भेटत नाही अशी माणसं ही सामाजिक विषमता गोर आया बहिणींना अस्वस्थ करते. आणि या व्यवस्थे विरूद्ध तांडा लोक साहित्यातून एक दिलगिरीचा सूर साक्षात होतो.

              प्रस्तुत लोकगीद म्हणजे हजारो वर्षे भोगलेल्या दाहक वेदनांचा आविष्कार असुन सामाजिक विषमतेतून उत्पन्न होणाऱ्या वेदनांची जाणीव करून देणारे आहे. 

           वस्तुस्थितीचा आविष्कार गोरमाटी मौखिक साहित्यातून साक्षात होतो यात कुणाची उसनवारी नाही कुण्या साहित्याची झेरॉक्स नाही,गोरमाटी लोकसाहित्य हे गोरमाटी गण समाजापुरतेच मर्यादित नाही तर या साहित्याचे क्षेत्र व्यापक आहे,विश्वबंधूत्वाची बांधिलकी या बोलीभाषा साहित्याने स्विकारलेली आहे. 

         मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो की, गोरमाटी लोकसाहित्याचा हाच वारसा जर गोरमाटी शब्द सैनिकांच्या लेखणीने स्विकारला तर उद्याचा शोषणमुक्त समाज रचनेचा सर्वांग सुंदर असा भारत उभा करण्याचे सामर्थ्य गोरमाटी शब्द सैनिकांच्या लेखणीत निश्चित असणार आहे!

              गोरमाटी लोकगीते म्हणजे गोरमाटी स्त्रियांचे स्वाभाविक बोलणेच.या लोकगीतांचे सौंदर्य रानगंध केसुलासारखे टवटवीत असलेले एकुण आयुष्याविषयीचे ते सांगणेच असतात.

          नवरी वधूचे "ढावलो"ऐकताना स्त्री मनातल्या भावनेला खेटून जाणारे शब्दही भेटतात.नवरी वधूचे 'ढावलो,मळ्णो,हावेली'गीद हे करूण रसाचे अथांग सागरच.स्त्री जीवनाचे ह्रदय उलगडून दाखविणारे ढावलो ऐकल्यानंतर नेत्र पाणावल्या शिवाय राहत नाही.कावळा,कोंबडा,भ्रमर आणि सोनपाखरू याचा  वापर स्त्री रचीत गीतातून मोठ्या प्रमाणात झालेला आढळतो.

             लग्नानंतर माहेराशी कायमची अंतरणार या धास्तीने अस्वस्थ झालेल्या नवरीवधूला उद्याचा दिवस उजाडू नये,यासाठी अख्खा तांडा गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास नवरीवधू ढावलो गीद गात रडत रडत कोंबड्याला विनवते... 


*ढावलो-*


दु:खद प्रसंगी किंवा आप्तसंबंधातील व्यक्तीचे निधन झाल्यास काव्यात्मक प्रकारे गीद गात रडत रडत आपल्या भावना व्यक्त करण्याच्या प्रक्रियेस 'ढावलो'म्हणतात.

             ढावलो या प्रक्रियेत स्त्री मात्र एकटीच असावी लागते,त्यात सहभागी होणाऱ्या  अधिक असल्या तरी प्रत्यकींने स्वतंत्ररीत्या ढावलोच्या माध्यमातून आपल्या व्यथा व्यक्त करावयाचे असतात. 


नववधू ढावलोतून कोंबड्याला विनवते या मध्यरात्रीच्या ढावलोस "आदी रातेरो ठणको" म्हणतात. 


*डाच मंडा दू कुकडो तारी सोना रूपेरी..*

*दसी आंगळी मंडा दू तारी सोना रूपेरी..*

*घडी एक मत बोलरे....*

*मारो बेटो वीरा..समण वचारी छ;सणच्..रे...!*


कोंबडा!तुझी चोच आणि पायाचे दहाही बोटे मी सोन्याचांदीने मढवून देईन फक्त तू उद्या सकाळी आरवू नकोस.तू का आरवला नाहीस याचा विचार माझा भाऊ करेल. तो भविष्याचा जाणकार आहे आणि माझा उद्याचा बिदाईचा प्रसंग टळेल..! 

          गोर स्त्रियांना दु:खद प्रसंगी कावळा,कोंबडा हे आपले मित्र वाटतात.आपल्या मनातील गुपित कोंबडा,कावळ्याला सांगून आपले दु:ख हलके करतातकरतात या शिवाय त्या दुसरे काहीच करू शकत नाही..! 


*कागला कंकर मारो देस..रे...*

*कागला मारी याडीनं खबर केस..रे..*

*तारी बेटीनं वनवास..रे..!*


कावळ्या,मी सद्या बस्तर कंकरमध्ये असून मी सासरी खुप दु:खी आहे.कावळ्या माझा हा निरोप माझा आईला सांग.. 

            कावळा हा भविष्याचा वेध घेणारा पक्षी म्हणून गोरमाटी संस्कृतीत मानल्या गेला आहे. 

        याच संकेताचा वापर गोरमाटी स्त्रियांनी आपल्या रचीत लोकगीदमधून केलेला आहे. 

          याच संकेताचा वापर ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या अभंग रचनेतून केलेला आढळतो. 


*उड उड रे काउ*

*तुझे सोन्याने मढिन पाउ*

*पाहुणे पंढरी राहो घरा कै येति!*


कावळा,कोंबडा आणि भ्रमर हे तांडा गणराज्याच्या प्रशासन व्यवस्थेतील भविष्याचे जाणकार आणि संदेशवाहक म्हणून मान्यता पावलेले आहेत.

          भाषिक आकलनाच्या पद्धतीचा अभ्यास करताना नववधूचे बिदाई प्रसंगी रडत रडत गायील्या जाणाऱ्या 'ढावलो'गीदातील भाषेचाही या ठिकाणी चर्चा होणे आवश्यक आहे. 

        तांड्याला शेवटचा निरोप देताना नववधू आपल्या जीव्हाळ्याचे आई,वडील,भाऊ,भावजय, बहिणी,काका,काकी,मामी,मामा,नायक,नायकण,वृषभ,वृक्ष,कोंबडा इत्यादीशी ढावलो मधून संवाद साधताना नववधूने कोणत्या भाषाशैलीत वा भाषिक रूपात आपल्या भावना व्यक्त कराव्यात याचे शिक्षण नववधूस आपल्या भावजय कडून दिले जाते यास "ढावलो सीकायेरो" म्हणतात. 

          ढावलोचे प्रशिक्षण रानावनात काम करताना सोयरीक झालेल्या मोटीयार मूलीस दिले जाते. 

            ढावलो सीकायेरो ही प्रथा देखील ध्वनीचे अर्थासह संप्रेषण,संदेशन आणि भाषिक उत्पादन या हेतूने रूढ झालेली ही बोलकी प्रथा होय.

            गोरमाटी बोलीभाषेचा हा भाषाविज्ञानही याठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे.

          अशा या प्रौढ गोरमाटी बोलीभाषेला अजूनही घटनात्मक संरक्षण मिळालेले नाही.आणि या पुढेही कधीही मिळणार नाही कारण खानेसुमारीने तिला केराची टोपली दाखवून तिचा *डाटा* केंव्हाच नष्ट करून टाकलेला आहे. 

          गोरमाटी बोलीभाषेचा समावेश घटनेच्या ८ व्या परिशिष्टात व्हावा ही मागणी सुद्धा भविष्यात करता येणार नाही. *ना रहेगा बास ना बजेगी बासरी!* अशी गत झालेली आहे. 

         वाङ्मयीन गोर धाटी आणि गोरमाटी बोलीभाषा हे इतिहास जमा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे...!


*संदर्भ-*


गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन

- भीमणीपुत्र

संपादन- प्रा.भारती अनिल मुडे,कोल्हापूर


              *भीमणीपुत्र*

     *मोहन गणुजी नायक*


Post a Comment

0 Comments