Subscribe Us

गोरमाटी बोलीभाषा ही संस्कृतची जननी..


 

*वाते मुंगा मोलारी*

            my swan song


*संस्कृत भाषेचा व्याकरणकार  'पाणिनी'हा गोरमाटी आणि गोरमाटी बोलीभाषा ही संस्कृतची जननी..!*


या संदर्भात जेष्ठ संशोधक आणि विचारवंत डॉ.निरज साळुंखे यांनी पुरविलेली माहिती या ठिकाणी पुराव्याच्या दृष्टीने लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांचे म्हणणे असे की,"अहि आणि पणि एकच असावेत हे दर्शविणारी बाब म्हणजे महत्तम  पणिपुत्र संस्कृत व्याकरणकार पाणिनी होय.पाणिनीचा शब्दशः अर्थ पणिपुत्र होतो.संस्कृतच्या व्याकरणाचेही श्रेय ब्राम्हणेतरास जाते.ब्राह्मणाच्या संस्कृत भाषेचा व्याकरणकार पणिपुत्र आहे"(दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र- डॉ. निरज साळुंखे)

           डॉ.निरज साळुंखेच्या विधानावरून ब्राह्मणाच्या संस्कृत भाषेचा व्याकरणकार पणिपुत्र पाणिनी हा ब्राम्हणेतर गोरमाटी ठरतो आणि गोरमाटी बोलीभाषा ही संस्कत भाषेची जननी असल्याचे डॉ.निरज साळुंखेच्या विधानावरून स्पष्ट होते. 

            "गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन" हे पुस्तक लिहित असताना हा पुरावा मला उपलब्ध होऊ शकला नाही.संस्कृत भाषेला प्रमाण रूप देणाऱ्या व्याकरणकार पाणिनीचे गोरमाटी तांड्याशी संबंध आलेला असल्याचा निश्चित पूरावा अजून तरी हाती आलेला नाही आणि हा पुरावा जेव्हा हाती येईल तेव्हा मात्र निश्चित म्हणता येईल की,व्याकरणकार पाणिनीचे ऊर्जास्रोतांचा केंद्र बिंदू म्हणजे तांडा..! उशीरा का होईना पण हा पूरावा मला आज गवसला!

           संस्कृत ही जगातील कुठल्याही प्रदेशात बोलली जात नव्हती आणि कोणत्याही मानवसमूहाची ती भाषा नव्हती  आणि आजही नाही"(वंश,भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य-प्रा.मा.म.देशमुख)

            यावरून निर्विवाद स्पष्ट होते की,संस्कृत ही संस्कारित भाषा होय.आर्यांची बोलीभाषा आणि प्राकृत यांच्या संकरणातून संस्कृत भाषा जन्माला आली. हाल,राजशेखर,हेमचंद्र,वररूची या सारख्या प्राकृत ग्रंथकारांनी व व्याकरणकारांनी मूळच्या प्राकृत भाषावर व्याकरणाचे संस्कार होऊन संस्कृत भाषा निर्माण झाली,असे म्हटले आहे.राजशेखर कवीने प्राकृत भषेस संस्कृतची जननी मानले आहे."(भाषाविज्ञान आणि मराठी भाषा-डाॅ.अनिल गवळी) हे ही मत या ठिकाणी विचारात घेणे आवश्यक आहे. 

           या सर्व संदर्भावरून गोरमाटी बोलीभाषा ही मूळ प्राकृत भाषा असून संस्कृतची जनक भाषा ठरते.

          गोरमाटी बोलीभाषेला भूगोल आहे.समृद्ध मौखिक वाङ्मयीन पंरपरा आहे.'गोर'प्रांतावरून 'गोर'हे नाव रूढ झाले.आजही गोरमाटी आपली ओळख याच नावाने देतो.संस्कृत बोलणारे लोक आणि प्रदेश अस्तित्वात नव्हते,आणि आजही नाही.इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. मा.म.देशमुख यांनी पुरविलेली ही माहिती या संदर्भात महत्त्वाची ठरते. 

           गोरमाटी गणसमाजाचे मुळत्व नष्ट करण्यासाठी कावेबाज इतिहासकारांनी 'गो'म्हणजे गाय,या संस्कृत  शब्दापासून "गोर" हा शब्द निर्माण झाल्याचे म्हणतात.संस्कृत भाषा अस्तित्वात येण्या पुर्वी गोरमाटी बोलीभाषक गण समाज हा मुका होता काय?

           आर्यांच्या आधीपासून सुमारे २००० वर्ष गोरमाटी बोलीभाषक गणसमाज हा सिंधू संस्कृतीत सुखी व संपन्न जीवन जगत होता अशी माहिती जेष्ठ साहित्यिक आत्माराम कनिराम राठोड पुरवितात. 

             गोरमाटी बोलीभाषा ही रस,अलंकार,व्याकरण आणि काव्य कल्पना,अलंकारिक शब्दाने परिपूर्ण आहे.पाणिनी,राजा भरतरी,महाकवी कालिदास,राजा भोज इ.अभ्यासकांनी यांच्याच लोककथा,रस,अलंकार,काव्य कल्पना आणि वाङ्मयीन प्रतिके जसे भ्रमर,कावळा इ.घेऊनच संस्कृत भाषा आणि वाङ्मय समृद्ध केल्याचे दिसते. 

          सौंदर्य आणि रसिकता यांचे जन्मजात दृढ असल्याचे सांगणारे "भ्रमर" गीद गोरमाटी बोलीभाषा मौखिक वाङ्मयात आज ही जीवंत आहे.

             'सौंदर्य लहरी'या संस्कृत काव्याचा कर्ता राजा भरतरी आपले राजवैभव,सुंदर राणीचा त्याग करून तांड्याचा आश्रीत का होतो? इ.पू.चौथ्या शतकात काव्य,व्याकरण,अलंकार या शास्त्राचा व कलेचा प्रसार व प्रचार करणाऱ्या राजा भोजचे नाव गोरमाटी गणसभेत आजही आदराने का घेतले जाते?महाकवी कालिदासांना ता़ंड्याचे आकर्षण का? याला कारण गोरमाटी बोलीभाषा आणि समृद्ध मौखिक वाङ्मय..! 

               यावरून प्राचीन काळी गोरमाटी बोलीभाषा आणि मौखिक वाङ्मय किती प्रगल्भ आणि श्रीमंत होते याची आपणास कल्पना येईल. 

             प्राकृत गोरमाटी बोलीभाषा ही संस्कृत पेक्षा प्राचीन असून संस्कृत मधून गोरमाटी बोलीभाषा निघाल्याचे मानणे हे हास्यास्पद ठरेल. 

         ध्वनी निर्मितीच्या अवयवाला "कागला"( अलिजिव्हा), "कोबली" (स्वरतंत्री) आणि "टिटवा"(स्वरयंत्र) अनुक्रमे कावळा,कोकिळा आणि टिटवी अशी पक्ष्यांच्या नावावरून पडलेली ही नावें गोरमाटी बोलीभाषा ही कोणत्याही भाषेची उपबोली नसून ती एक प्रकृती धर्मावर आधारलेली पहिली प्राकृत असल्याचे सिद्ध करणारे लाॅजिक पासवर्ड ठरते..!! 


संदर्भ:

गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन

भीमणीपुत्र

संपादन- प्रा.भारती अनिल मुडे


             *भीमणीपुत्र*

     *मोहन गणुजी नायक*

Post a Comment

0 Comments