Subscribe Us

होळीर धुंड


 *वाते मुंगा मोलारी*

             my swan song


*गोरमाटी संस्कृतीतील धु़ड प्रथा आणि अश्लील लेंगी एक मानववंशशास्त्रीय आलेख-*


गोरमाटी वाङ्मयीन संस्कृतील नवजात शिशुवर केल्या जाणाऱ्या संस्कारा पैकी 'धु़ड' हा एक अतिप्राचीन आणि महत्त्वाचा संस्कार असल्याचा मानला जातो.सर्व प्रथम धुंड म्हणजे काय?हे समजून घेणे आवश्यक आहे.धुंड या शब्दाचा गोरमाटी बोलीभाषेला अभिप्रेत असलेला अर्थ "शोध" असा आहे. 


*धुंड संस्कार म्हणजे मुलगा कोणा पासून झाला किंवा त्याचा बाप कोण?याचा घेतलेला शोध होय.*

  

          याला कारण असे की,आदिम काळातील मुक्त लैंगिक समाज व्यवस्थेत जैविक पिता Biological Father ओळखता येत नसे.आदिम मानवाला शरीर संबंधामुळे गर्भधारणा होते.आदिम मानवाला शरीर संबंधामुळे पिता हे नाते पुरूषास मिळते याचेही ज्ञान नसते.गर्भधारण होण्यास काही दैवी शक्ती कारणीभूत असाव्यात असा आदिम लोकगणांचा समज असतो. 

       मुक्त लैंगिक समाज व्यवस्थेत कालांतराने नवजात शिशुच्या पालन पोषणाची निकड आणि वृद्धावस्थेत अपल्याही पालन पोषणाची निकड आदिम मानवाला भासू लागली आणि पिता या नत्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.आणि पितृपद बहाल करण्यासाठी आदिम समाजात धार्मिक विधी करण्याची प्रथा रूढ झाली.अशा पितृपदाला समाजशास्त्राचा अभ्यासकांनी *समाजिक पिता* Social Father असे संबोधले आहे. 

            दक्षिण भारतातील 'तोडा'या समाजात स्त्री गरोदर राहिली तर तिचा पती त्या स्त्रीस भेट म्हणून विधिपूर्वक धनुष्यबाण देतो.पितृत्व जाहीर करण्यासाठी गरोदर स्त्रीस धनुष्यबाण देण्याच्या या धार्मिक विधीला तोडा समाजात "पुरसुतपिमी" असे म्हणतात.या विधी नंतर त्या स्त्रीस होणारी मुले आपलीच असल्याचे धनुष्यबाण भेट म्हणून देणारा मानत असतो.मग ती मुले दुसऱ्या पुरुषापासून झालेली असली तरी हरकत नसते. 

             आदिम लोक नात्याच्या बाबतीत जीव शास्त्रीयदृष्ट्या नाते प्रस्थापित करण्या पेक्षा धार्मिक विधी लाच अधिक महत्त्व देत असतात. 

         गोरमाटी संस्कृतीत रूढ असलेला "धुंड" हा संस्कार देखील मुलाचा पिता म्हणून सामाजिक प्रतिष्ठा मिळवून घेण्याच्या दृष्टीने रूढ झालेला;मुक्त लैंगिक समाज व्यवस्थेच्या काळापासून चालत आलेला हा अतिप्राचीन संस्कार होय. 

           कुटुंब संस्था अस्तित्वात येण्यापूर्वी आदिम लोकगणात स्त्री-पुरूषा़चे संबंध स्वैराचाराचे होते,लैंगिक संबंधांवर त्या काळात कोणतेच नियंत्रण नव्हते त्यामुळे गर्भधारणा झाली तरी कोणत्याही एका निश्चित पुरूषाचा उल्लेख करता येत नसे.मुक्त लैंगिक जीवन पद्धतींच्या काळात पितृपद Biological Father लक्षात येत नसे या विचारसरणीतून आदिम लोकगणात पितृपद बहाल करण्यासाठी धनुष्यबाण भेट देणे,हासली अलंकार भेट देणे अशा प्रथा परंपरेने जोपासल्या गेल्या. गोरमाटी गणसमाजात आदिम काळी मुक्त लैंगिक जीवन पद्धत अस्तित्वात असलेल्याचे अश्लील लेंगीवरून स्पष्ट होते. 


*टाळ टाळ गेरीया तोपर छोडीया!*

*छोरा काडये गेरणी धुंड करावा!!*


धुंड असलेल्या मुलाच्या घरी रात्रभर तांड्यातील गेरणी पुऱ्या तळत असतात आणि कामोत्तेजक लेंगी गात असतात. 


*सीपाईडालाल पलंग रोळालं आसी वकतेपं..*

*सीपाईडालाल बीडलो मंगालं आसी वकतेपं!*


  ए तरूण गड्या!वातावरण खुप छान आहे.गड्या धुंद अशा घटकेला (आसी वकतेपं)माझ्या सोबत पलंग रोळवून घे.. काय पाहतोस.. आजची रात्र आपण खुप मजेत घालवूत... तू पानविडा पण मागवून घे.. गड्या सुवर्ण संधी दवडू नकोस... मला मनसोक्त लुट.. धुंद अशा घटकेला... आसी वकतेपं...! 


      गोरमाटी संस्कृतीतील धुंड संस्कारांच्या अनुषंगाने लेंगी नावाचे मुक्त काव्य गाण्याची ही प्रथा गोरगणांच्या आदिम जीवनातील मुक्त लैंगिक जीवन पद्धतीचे अवशेष होय. 

         लेंगी म्हणजे मुक्त काव्य होय. लिंग > लैंगिक > लेंगी असा हा लेंगी या शब्दाच्या उत्पत्तीचा प्रवास म्हणता येईल. ही अश्लील लेंगी फक्त होळी दरम्यानच गायली जातात. लैंगिक उत्तेजन निर्माण करण्यासाठी अश्लील लेंगी गाण्याची ही प्रथा गोरमाटी संस्कृतीत आदिम काळी रूढ झाली. 

       या संदर्भात डॉ.कसबे यांनी व्यक्त केलेले मत विचारात घेणे आवश्यक आहे. "हे तथाकथित भारतीय विचारवंत आदिम माणसाच्या आचारामागील उद्दिष्ट निट समजून घेत नाहीत हिच त्या मागील अडचण आहे.कोसंबीनी होळी सणाचे उदाहरण दिले आहे,जो होलिकोत्सव आज जनमत आणि कायद्याच्या दृष्टीने घृणास्पद,बेबंद आणि अश्लील मानला जातो तो अतिप्राचीन रानटी युगात उगम पावल्याचे दिसते,पण ज्या काळी अन्न गोळा करणे हा सामान्य जीवनक्रम होता,अन्नाचा पुरवठा अपुरा आणि बेभरवशाचा होता त्या काळात प्रजोत्पादनाला उद्दुत करण्यासाठी बरीच बाह्य चेतना निर्माण करणे आवश्यक होते त्याकाळी वंश जमविण्यासाठी अश्लीलता अनिवार्य होती"या डॉ.कसबे यांच्या विचारावरून असे निश्चित मानता येईल की,गोरमाटी संस्कृतीत रूढ असलेली लेंगी गावयाची ही प्रथा देखील शास्त्रीय असून कामवासनेला जागृत करण्यासाठी मुक्त लैंगिक जीवन पद्धतीच्या आदिम काळापासून रूढ असलेली ही बोलकी प्रथा असल्याचे मानता येईल.

             लिंग भेदान्वये धुंड हा संस्कार करावयाचा असतो,असे असले तरी धुंड संस्कारांत मुलाच्या गळ्यात हासली नावाचा स्त्रीयांचा अलंकार घालावयाचा असतो हा अलंकार त्या मुलाच्या आईस भेट म्हणून संभाव्य पती कडून आलेला असावा लागतो असे डायीसाण सांगतात. 

         आज मात्र या साऱ्या गोष्टींचा गोरमाटी गण समाजाला विसर पडलेला दिसतो.हासली अलंकार भेट देण्याची प्रथा लोप पावलेली असून धुंड संस्कारांत मुलाच्या गळ्यात हासली घालण्याची प्रथा आजही कायम आहे. 

           पितृत्वाचे नातू निश्चित करण्यासाठी कोणत्या धातूची हासली प्राचीन काळी वापरत असावे?हे कळायला मार्ग नाही;पण पितृत्वास सामाजिक मान्यता मिळावी या दृष्टीकोनातून धुंड संस्कारांत हासली अलंकार वापरण्याची प्रथा मुक्त लैंगिक जीवन पद्धतीच्या आदिम काळापासून या लोकगणात परंपरेने जोपासल्या गेली.

         गोर संस्कृतीतील मुलाच्या गळ्यात हासली अलंकार घालण्याची ही प्रथा आणि धुंड संस्कार हा सामाजिक पिता म्हणून मान्यता मिळविण्याच्या प्रथेचे हे निदर्शक होय. 


*हासलो मोलायो सेताबी बणजारा...*


    ले़ंगीतील या चरणातून डोकावणारी ही संकल्पना माझ्या वरील विधानाला पुष्टी देणारी आहे...! 


             *भीमणीपुत्र*

     *मोहन गणुजी नायक*

Post a Comment

0 Comments