Subscribe Us

जागतिक गोर बंजारा दन

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
● *8 एप्रिल -' विश्व रोमा बंजारा दिवस '* 
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 
       ▪️8 एप्रिल हा *'विश्व रोमा बंजारा दिवस'* म्हणून साजरा केला जातो. *8 एप्रिल 1981* या दिवशी रोमा व जिप्सी बंजारा समुदायाची जागतिक बैठक *जर्मनीमध्ये* संपन्न झाली होती. या जागतिक बैठकीत भारतातून स्व. रामसिंग भानावत व स्व रणजीत नाईक यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत रोमा बंजारा समुदायाच्या एकतेसाठी  *विश्व रोमा बंजारा दिवस* साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंजारा समाजाची एकता आणि रोमा बंजारांच्या प्रश्‍नांकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रोमा समुदायाविषयी भेदभाव नष्ट करणे व मानव अधिकाराचे  हनन या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दरवर्षी 8 एप्रिल हा दिवस 'विश्व रोमा बंजारा' दिवस म्हणून साजरा केला जावा असे ठरले. 
      रोमा बंजारा हे लोक भारताचे मूळ निवासी असून ते आपल्या संस्कृतीचे मूळ बंजारा संस्कृतीत शोधतात. इसवी सन सहाव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत त्यांचे वास्तव्य भारतातच होते, परंतु पुढच्या काळात अफगाणिस्तान मार्गे ते युरोपमध्ये गेल्याचे मानले जाते. युरोप खंडातील विविध देशांत रोमा बंजारांची लोकसंख्या जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक असून रोमानी भाषा ही भारतातील *'इंडो-आर्यन'* भाषा कुळातील आहे. रोमानी भाषेत बंजारा, गुजराती, राजस्थानी या भाषेतील बहुसंख्य शब्द आढळतात. *' Center for secular and Modicular biology institution, Hyderabad '* या संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीरज रॉय यांच्या नेतृत्वाखाली जगातील अनेक युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांनी पूर्व युरोप मधील रोमा लोकांची D.N.A. Test केली असता भारतीय गोरबंजारा, शिकलीगार समाजाच्या डी. एन. ए. शी याचे साम्य आढळले होते.
    दुसऱ्या जागतिक महायुद्धात या समाजाला लक्ष्य करण्यात आले होते व त्यांचा अमानुषपणे छळ करण्यात येत होता. या युद्धकाळात त्यांना विशिष्ट शिबिरांमध्ये कैदेत ठेवण्यात आले होते व त्यात उपासमार आणि भूकबळीमुळे रोमा बंजारा समाजातील माणसे, स्त्रिया व बालके मिळून एकूण 20 हजारांच्या वर लोक मृत्युमुखी पडले होते. आज रोमा बंजारांची युरोपमधील सर्वाधिक गरीब व अल्पसंख्यांक समुदायातील लोक म्हणून गणना होते. हे लोक युरोपमध्ये भटक्या स्वरूपाचे जीवन जगत असल्याने त्यांना *' जिप्सी '* असेही म्हणतात. युरोपमध्ये या लोकांना नागरिकत्व प्राप्त करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वांशिक भेदभाव केला जात असून त्यांचे मानवाधिकार पायदळी तुडवले जात आहेत. फ्रान्स या देशाने काही महिन्यापूर्वीच रोमा बंजारा लोकांना रोमानिया आणि बल्गेरियामध्ये हुसकावून लावले होते. काही मानवाधिकार संघटनांनी व 'युरोपियन रोमन राइट्स सेंटर' (ERRC) या स्वयंसेवी संघटनेने हा मुद्दा लावून धरला होता. 
       युरोपमध्ये गेल्यानंतर रोमा समुदाय युरोपमधील *बायजेंटाईन* साम्राज्याचा एक भाग बनला. रोमा बंजारा हे स्वत:ला रोमन साम्राज्याचे वारसदार मानतात म्हणून या लोकांनी स्वत:  *' रोमा '* हे नाव धारण केले. रोमा बंजारा समुदाय आजही युरोपमध्ये अतिशय हालाखीचे व कष्टप्रद जीवन जगत आहेत.
                     ~~•~~

     _सर्व गोर बंजारा बांधवांना विश्व रोमा बंजारा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!_ 
             ________________________
              ● *डॉ.सुभाष राठोड, पुणे*
             ________________________

Post a Comment

0 Comments