Subscribe Us

हरित क्रांतीचे प्रणेते, कृषि औद्योगिक क्रांतीचे जनक,महानायक ,माजी मुख्यमंत्री वसंतराव नायक साहेब


जै गोर      जै  सेवालाल       जै वसंत


 हरित क्रांतीचे प्रणेते, कृषि औद्योगिक क्रांतीचे जनक,महानायक ,माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त हा लेख लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.


“आपणांस जर बदल घडवायचा असेल तर सुरुवात स्वत:पासून करा”

-माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक 

 वसंतराव नाईक यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या तांड्यात 1 जुलै, 1913 रोजी एका सधन शेतकरी कुटूंबात झाला.  वसंतराव नाईक यांचे प्राथमिक शिक्षण सुरुवातीला पोहरादेवी, उमरी, भोजला, बान्सी आणि विठोली या ठिकाणी झाले. नाईक साहेबांनी नागपूरच्या निल सिटी हायस्कूल मधून मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण केली आणि मॉरिस कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला.  या महाविद्यालयातून 1937 रोजी बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण केली.  त्यांनतर 1940 साली नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. ची पदवी परिक्षा उत्तीर्ण केली. नागपूर येथील वत्सलाताई घाटे यांचेशी 6 जुलै, 1939 रोजी नाईक साहेबांचा विवाह संपन्न झाला. तत्कालिन विदर्भातील प्रख्यात वकिल आणि पुढे केंद्रिय कृषिमंत्री बनलेले डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यासमवेत अमरावती येथे आणि पुसद येथे त्यांनी आपला वकिली व्यवसाय सुरु केला. त्यांची 1943 रोजी पुसद तालुका काँग्रेस समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झाली. नंतर ते पुसद कृषि मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (1943-47). याशिवाय हरिजन वसतीगृह व राष्ट्रीय वसतीगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. तदनंतर पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी त्यांची नियुक्ती झाली (1951-52). देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नाईक साहेबांना पुसद विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी प्राप्त झाली. तत्कालीन मध्य प्रदेशातील पुसद विधानसभा मतदार संघातुन प्रथमत: ते निवडून येऊन,  त्यांची पं. रविशंकर शुक्ल यांच्या मंत्रीमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून निवड झाली. 1956 मध्ये झालेल्या राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ,मराठवाडा हे प्रदेश द्विभाषिक मुंबई राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळात सहकार मंत्री झाले. 1957 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत निवडून आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळात त्यांच्या आवडीच्या खात्याचे कृषि खात्याचे कृषिमंत्री म्हणून नाईक साहंबानी शपथ घेतली.  कृषिमंत्री असताना त्यांच्या भगिरथ प्रयत्नांमुळे यवतमाळ जिल्ह्यातुन जवळपास 1 लाख 37 हजार एकर जमिन भूदान चळवळीला प्राप्त झाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर प्रथमत: ते महसूल मंत्री झाले. नंतर तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवारांच्याही मंत्रीमंडळात ते महसूल मंत्री होते.  पण तत्कालिन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर 5 डिसेंबर, 1963 रोजी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर 6 मार्च, 1967 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 1972 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  असे जवळपास सलग ते 12 वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा अत्यंत चोखपणे, सक्षमपणे सांभाळली. वसंतराव नाईक यांना शेतकऱ्यांविषयी अतिशय तळमळ, शेतीची आवड होते, शेतकरी हा कारखानदार बनला पाहिजे असेही त्यांचे मत होते. नाईक साहेबांना शेती विषयी असलेली तळमळ, प्रेम नाशिक येथील शिबीरात 7 मार्च, 1972 रोजी केलेल्या भाषणातील वाक्यावरुन “शेती मोडली तर देश मोडेल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल” दिसून येते. 1966 साली झालेला दुष्काळ, 1965 सालचे युद्ध अशा परिस्थितीत अन्नधान्याचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. शेतकरी हा अत्यंत संकटात होता. तेव्हा नाईक साहेबांनी पुण्यातील शनिवारवाडा येथे “महाराष्ट्र येत्या दोन वर्षात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक फासावर जाईन” अशी घोषणा केली. घोषणा करुन थांबले नसून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध देशांचे दौरे करुन संकरीत बियाणे आणले.  हायब्रीड ज्वारी लावण्यासाठी ते शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत.  अमेरिकेतून येणारा पीएल्-480  या गव्हापासून मुक्तता मिळण्यासाठी संकरीत गव्हाचे वाण निर्माण केले. त्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. शेती क्षेत्रात नवनवीन शोध करता यावा,भरघोस उत्पन्न मिळावं, यादृष्टीने महाराष्ट्रात चार ठिकाणी राहूरी (अहमदनगर), अकोला, दापोली (रत्नागिरी) आणि परभणी येथे कृषि विद्यापीठाची स्थापना केली.  शेती क्षेत्राचे उत्पन्न वाठविण्याकरिता शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असल्याने सिंचन योजना, ग्रामिण विद्युतीकरणासाठी प्रयत्न केले.  आज हा महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला आहे याचे श्रेय नाईकसाहंबांना जाते. या राज्यात हरीतक्रांती करून राज्याला स्वयंपुर्ण करण्याचे महान कार्य नाईक साहेबांनी केले आहे. म्हणून आज त्यांचा गौरव हरीत क्रांतीचे प्रणेते म्हणून केला जातो.

जगात कुठेही झाले नाही, असे महाराष्ट्रात घडले.  “एकदा बाजारात ज्वारीचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले, शेतकरी हवालदिल झाला, शेतकरी संकटात सापडला. या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्वारी खरेदीची शासकीय योजना आणली, बाजारात ज्वारीचे भाव रु. 35 प्रति क्विंटल होते, ती ज्वारी शासनाने 65 रुपये क्विंटलला खरेदी केली आणि तीच ज्वारी रेशनवर 35 पैसे प्रति किलो या भावाने सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिली. यामधुन त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जगविण्याचे काम ज्वारी खरेदी योजनेतून केले.” कोयनाच्या भुकंपाच्या वेळी अवघ्या 3 महिन्यात 10000 घरांचे बांधकाम करण्यात आले. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न नाईक साहेबांनी केले.  महाराष्ट्र वीज निर्मितीच्या बाबतीत स्वयंपुर्ण व्हावा त्याकरिता कोराडी, पारस, खापरखेडा, भुसावळ येथे औष्णिक विद्युत केंद्र निर्माण केले.  तसेच मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम नाईक साहेबांनी केले.  शेतीच्या सिंचनाकरिता व पाण्याच्या साठवणुकी करिता जायकवाडी, ऊजनी, अरुणावती अशी धरणे बांधली.  राज्याला औद्योगिकदृष्ट्या विकसित करण्याचे कार्य नाईक साहेबांनी केले.  एकदा भूम पारंडा येथे एका गृहस्थाच्या घरी एकाने नाईक साहेबांना पाणी आणून दिले, ते गढूळ होते, तेव्हा त्याच्या भावाने कोकाकोला आण असे सांगितले पण त्याचवेळी नाईक साहेबांनी सांगितले की, “तुमच्या गावात कोकाकोला पोहोचला पण स्वच्छ पाणी पोहोचले नाही, हा आमच्या सरकारचा पराभव आहे.” म्हणून नाईक साहेबांनी लोकांना स्वच्छ पाणी मिळावे याकरिता ग्रामिण पाणीपुरवठा योजना भूम परांडातून राबविली. नाईक साहेब बंजारा समाजातील असल्याने त्यांना हा भटकंती करणारा समाज जोपर्यंत स्थिर होणार नाही, तोपर्यंत प्रगती होणार नाही, याची परिपुर्ण कल्पना त्यांना होती.  त्यामुळे भटक्या विमुक्तांच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा/आश्रमशाळा संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु करुन शिक्षणापासून वंचित घटकाला शिक्षण देऊन मुळ प्रवाहात आणण्याचे महत्वपर्णु कार्य त्यांनी केले. पुसद येथे उच्च शिक्षणसाठी फुलसिंग नाईक महाविद्यालय सुरु केले.  गुन्हेगारांनाही मुक्तपणे जगता यावे यासाठी पहिले खुले कारागृह पैठण येथे स्थापन केले व गुन्हेगारांना माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखविला. शेतकऱ्यांना कापसाचा योग्य प्रमाणात मोबदला मिळावा याकरिता दलाली बंद करुन कापूस एकाधिकार योजना राबविली.  रोजगार हमी योजना, जलविद्युत प्रकल्प योजना, औष्णिक विद्युत प्रकल्प योजना, धवलक्रांती योजना अशा असंख्य योजना राबवून या महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात प्रगती करण्याचे महान कार्य वसंतराव नाईक साहेबांनी केले. त्याकाळी लोकांचा ग्रामिण भागातून रोजगारा निमित्त, व्यवसाया निमित्त मोठ्या प्रमाणात शहरी भागाकडे येण्याचा कल वाढला होता. नवी मुंबई, नविन औरंगाबाद ची निर्मिती हि त्यांच्याच काळातली. संयुक्त महाराष्ट्राच्या नियुक्ती नंतर राज्याला वैचारिक वारसा, खाजगी उद्योग, औद्यागिक, व्यवसाय, विद्युतीकरण, अन्नधान्य आणि दुग्ध, सहकार क्षेत्र, रस्ते, कृषि क्षेत्र, तंत्रज्ञान, शिक्षण इत्यादी क्षेत्रात हा महाराष्ट्र अग्रेसर करण्यात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.  

 नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त तत्कालिन राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी यांनी नाईक साहेबांचा गौरव “देशाचे महान सुपूत्र” असा केला आहे.  हरित क्रांतीचे प्रणेते, कृषि औद्योगिक क्रांतीचे जनक,महानायक ,माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 

***********************

श्री. निलेश गणेश जाधव,

सहाय्यक कक्ष अधिकारी,

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

मंत्रालय, मुंबई- 32 

मोबा. 9527930517

Post a Comment

0 Comments